अवघ्या दिनांचा त्राता, बाप्पा मोरया रे!

अवघ्या दिनांचा त्राता, बाप्पा मोरया रे!

आज गणेशोत्सवाच्या प्रारंभाचा दिवस. मराठी मुलखातील घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्येही आज गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना होईल. दोन वर्षांनंतर सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. करोनाचे सावट काहीसे कमी झाल्याने घरोघरी देखील आनंदाचे वातावरण आहे. बाजारात गेले सात-आठ दिवस विलक्षण लगबग आहे. विक्रीसाठी ठेवलेल्या गणेशमुर्तींनी आणि सजावटीच्या वस्तुंनी दुकाने सजली आहेत. करोना महामारीने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली. करोना काळात बचतीच्या पैशांना लागलेली गळती कशी थांबवावी आणि त्या घटलेल्या गंगाजळीची पुर्वपातळी कशी गाठावी याच चिंतेने आजही बहुतेकांना सतावले आहे.

गणेशोत्सवाने आणि आगामी काळातील सार्वजनिक सणांनी ती संधी मिळेल अशी सार्वत्रिक भावना आहे. त्यामुळेच केवळ गणेशोत्सवाच्या दहा दिवसातच नव्हे तर सणांचे आगामी काही महिने गाठीला चार पैसे जमवण्याची धडपड बाजारातील प्रत्येक जण करताना आढळतो. पाच-दहा रुपयांच्या वस्तूंपासून हजारो रुपये किंमतीचे सामान बाजारात उपलब्ध आहे. आर्थिकदृष्ट्या ज्यांना शक्य आहे ते तर बाजारातील उलाढाल वाढवतीलच पण ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांनाही परवडेल अशी खरेदी करुन सण साजरे करता यावेत असेच बाजारातील सध्याचे वातावरण आहे.

लोकही निर्बंधमुक्त वातावरणाचा आनंद लुटत आहेत. सार्वजनिक सणांकडे बघण्याचा निकोप दृष्टीकोन हळूहळू का होईना विकसित होत आहे. सण साजरे करण्याच्या पद्धतींमुळे पर्यावरण प्रदुषण होऊ नये, सजावट करताना कोणत्याही प्रकारचे प्रदुषण करेल असे साहित्य न वापरण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींना ‘नाही’ म्हणणार्‍या लोकांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. बहुधा त्यामुळेच कलाकारांच्या सर्जनशिलतेला नवनवे पंख फुटत आहेत. शाडू मातीच्या गणेशमुर्ती बनवण्याच्या कल्पनेने छोटेसे चळवळीचे रुप धारण केले आहेच. पण बीज गणेश, सृष्टी गणेश, माती गणेश अशा नवनव्या पर्यावरणपूरक कल्पनांचा आविष्कार या उत्सवामुळे घडत आहे.

गणपतीबाप्पा हा बुद्धीदाता. सर्वाजनिक उत्सवातील त्याची नाना रुपे सर्वांनाच भुरळ घालतात. छोट्या मुलापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच तो त्यांचा मित्र किंवा सखा वाटतो असेच गजाननाचे उत्सवी रुप असते. हीच मित्रत्वाची आणि सख्यत्वाची भावना लोकांच्या मनामनात कायमची रुजावी आणि वैरभाव, दुष्टावा, हेवेदावे, परस्पर द्वेष असे जे जे अमंगळ ते ते लयास जावे हीच गणपतीचरणी प्रार्थना. गणेशाला आणखी एक खास विनंती. विद्यार्थ्यांना आणि पालकांना दप्तराच्या ओझ्याबाबत दिलासा द्यायचा प्रयत्न राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी परवाच केला आहे. दप्तराचे ओझे कमी करणार असे त्यांनी जाहीर केले आहे. पण त्यांना कदाचित कल्पना नसावी की, त्यांच्याआधीच्या 4 शिक्षणमंत्र्यांनी देखील असेच आश्वासन दिले होते.

पण ते आश्वासन देणार्‍या सर्वांचेच दात यंत्रणेने त्यांच्याच घशात घालण्याची चलाखी यशस्वी केली आहे. त्यामुळे यंदाही पालकांना आणि विद्यार्थ्यांना यासंदर्भात सरकारकडून फारशी अपेक्षा नाही. पण खात्याचा नवीनच कारभार स्वीकारल्याने मंत्रीमहोदय उत्साहाने फुरफुरत असतात. बदल घडवण्याचे श्रेय मिळवण्याची उर्मीही कदाचित त्यांना वाटत असेल. त्यामुळे सगळेच उत्साहात दप्तराचे ओझे कमी करण्याची घोषणा करतात.

पण दप्तराचे ओझे कमी होणे तर दूरच उलट ते वर्षानुवर्षे वाढतच चालले आहे. तेव्हा बाप्पा, यंदा तरी शिक्षणमंत्र्यांवर थोडीशी दया करावी आणि त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याला पुरेशी शक्ती वा कुवत त्यांना बहाल करावी. बरोबरीने सगळ्या नेत्यांनाही सद्बुद्धी द्या. नेते कधी ना कधी मंत्री होतच असतात. पदभार स्वीकारल्यावर मंत्र्यांनी भरमसाठ आश्वासने देऊ नयेत. मागचापुढचा विचार न करता एखादा निर्णय जाहीर करुन तोंडघशी पडू नये.

‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ असे सर्वांचे होऊ नये एवढी कृपा सर्वांवर करा. विद्यार्थ्यांना आपल्या विशेष दयाभावाचा लाभ होवो. सामान्य माणसाचे जगणे तुम्ही सुकर करालच याची तुमच्या तमाम भक्तांना खात्री आहे. आपली कृपादृष्टी अशीच कायम राहो हीच विघ्नेशाचरणी मराठी जनतेच्या वतीने प्रार्थना.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com