'समृद्धी’कडे जाताना...

'समृद्धी’कडे जाताना...

समृद्धी महामार्ग सध्या चर्चेत आहे. महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचा वापर सुरु झाला आहे. या महामार्गावरुन वाहन चालवताना पोटातील पाणी देखील हलत नाही अशी भावना खुद्द मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केल्याने या महामार्गावरुन एकदा तरी फिरुन येण्याची उर्मी वाहनचालकांमध्ये वाढत आहे. हा महामार्ग एकूण 710 किलोमीटर लांबीचा असून नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा आहे. नागपूर ते शिर्डी हे 520 किलोमीटरचे अंतर वाहनचालक साडेचार ते पाच तासात पार करु शकतात असे सांगितले जाते. तो अनुभव संस्मरणीय असल्याचे वाहनचालक सांगतात. तथापि या महामार्गावरुन वाहनचालक जेवढे सुसाट सुटतात तेवढे अपघातही वाढत आहेत. वाहनांच्या वेगाबरोबरच अपघातांची संख्याही धडकी भरवणारी आहे. अनेक वाहनचालक वेगमर्यादाही ओलांडतात. 11 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात वेगमर्यादा भंगाची 613 प्रकरणे नोंदवली गेली. त्या वाहनचालकांकडून साधारणत: साडेबारा लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, परवानगी नसताना वाहन उभे करणे, परवानगी नसतानाही महामार्गावरुन दुचाकी चालवणे ही कारवाईची काही कारणे सांगितली जातात. नियमभंग झाला तर कारवाई व्हायलाच हवी. त्यात कोणाचेही दूमत असणार नाही. तथापि अपघातांचे प्रमाण दंड वसूुलीशी जोडले जाईल का? वाहतुकीसंदर्भात तरी लोकांचा तोच अनुभव आहे. सर्वत्र नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करण्यावरच लक्ष केंद्रित केले जात असल्याचे रस्तोरस्ती आढळते. तोच अनुभव समृद्धी महामार्गावरील वाहनचालकांना येऊ शकेल का? वाहनचालकांना जरब बसवणे हा दंडवसूलीचा उद्देश असावा. सरकारी तिजोरीत भर घालण्याचा असू नये अशी जनतेची अपेक्षा आहे. राज्याच्या विकासासाठी उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी महामार्ग लोकार्पण प्रसंगी दिली होती. तथापि नियमपालनाशिवाय विकासाची फळे उपभोगता येतील का? फक्त समृद्धी महामार्गावरच नव्हे तर अन्यत्रही वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई करण्याबरोबरच लोकशिक्षणावर भर देण्याची खरी आवश्यकता आहे. नुसते महामार्ग वेगवान करणे पुरेसे ठरणार नाही. त्यांचा शिस्तबद्ध वापर करण्याविषयी वाहनचालकांना साक्षर करावे लागेल. त्यासाठी कारवाईपलीकडचा दृष्टीकोन स्वीकारावा लागेल. ती प्रामुख्याने सरकारची जबाबदारी असली तरी वाहनचालकांनाही सामाजिक भान राखावे लागेल. सुरक्षित प्रवास ही त्यांची पण जबाबदारी आहे याची खुणगाठ मारावी लागेल. एखाद्या छोटाशा गावात रस्ता तयार झाला तर त्यानंतर काही काळातच त्या गावचा चेहरामोहरा बदलल्याचा अनुभव गावकर्‍यांना येतो. त्याअर्थाने रस्त्यांना विकासाची गंगा मानले जाते. रस्ते दर्जेदार होत जातील. त्या रस्त्यांना योग्य वाहने बनतील. पण रस्ते, वेगमर्यादा आणि नियमपालन यामध्ये समतोल साधण्याची जबाबदारी सरकारबरोबरच वाहनचालकांची देखील आहे. अन्यथा रस्ते कितीही दर्जेदार झाले तरी त्यामुळे येणार्‍या ‘समृद्धी’ च्या विकासाचा आनंद उपभोगणे दुरापास्तच होत राहिल. महामार्गाच्या फायद्यांपेक्षा वाहनचालकांवर केली जाणारी कारवाईच जास्त चर्चेत राहील. 

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com