सर्वच सरकारी योजना दुर्लक्षिण्यासारख्या नसतात!

सर्वच सरकारी योजना दुर्लक्षिण्यासारख्या नसतात!

देशात आता 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती करोना लसीकरणासाठी पात्र आहे. लसींची उपलब्धताही वाढली आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्यसरकारने विशेष मोहिम हाती घेतली आहे.

8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान ‘कवच कुंडल’ योजनेची घोषणा केली आहे. या दरम्यान रोज किमान 15 लाख लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट राज्यसरकारने ठरवले आहे. राज्य सरकारकडे सध्या 75 लाख लसी उपलब्ध आहेत आणि 25 लाख उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.

लसीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य सुरुवातीपासुनच आघाडीवर आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 9 कोटी 15 लाख नागरिकांना दोन्ही डोस द्यायचे आहे. यातील 6 कोटी नागरिकांचा पहिला डोस तर अडीच कोटी नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. उर्वरित 3 कोटी 20लाख लोकांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. करोनाच्या अजुन किती लाटा येतील याबद्दल तज्ञांमध्ये एकमत आढळत नाही. सध्या संभाव्य तिसर्‍या लाटेची चर्चा सुुरु आहे. कालपासून राज्यातील मंदिरे उघडली आहेत.

शाळा देखील सुरु झाल्या आहेत. काही दिवसात सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरु होणार असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रात निर्बंध जवळजवळ शिथिल झाले आहेत. तथापि तोंडाला मुसके बांधणे, हात वारंवार धुणे आणि सामाजिक अंतर राखणे हे निर्बंध मात्र कायम आहेत. करोना लसीकरण सुरुवातीपासुनच वादविवादाचा विषय ठरले. त्यावर राजकारण देखील रंगले. करोना लसीकरणाविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमज आढळतात.

करोना लसीमुळेच करोना होता, त्यामुळे नपुंसकत्व येते, शरीरातील हाडांचे दुखणे जडते, पाय दुखतात, मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो असे एक ना अनेक गैरसमज पसरले आहेत. करोनावरच्या लस कमी कालावधीत विकसित झाल्या त्याबद्दलही अनेकांनी अनेक शंका उपस्थित केल्या. पण सरकारही हातावर हात ठेऊन स्वस्थ बसले नाही. हे गैरसमज संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागरण मोहिम हाती घेतली गेली. लसींचे दोन्ही डोस घेतले तरच लोकलने प्रवास आणि पर्यटन करता येईल अशा पद्धतीने अप्रत्यक्ष सक्तीचा अवलंबही सरकारने केला आहे.

लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे हाच करोनाला लांब ठेवण्याचा सध्याचा व्यवहार्य उपाय आहे. ङ्गकवच कुंडलफ योजना हा जनजागरण मोहिमेचाच पुढचा टप्पा आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर करोनाचा संसर्ग झाला तरी तो फारसा त्रासदायक असणार नाही. अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ञ वारंवार सांगत असतात. हे मात्र लोकांना विसरुन चालणार नाही.

करोना लसीकरण पुर्ण झाले तरी निर्बंधांची त्रिसुत्री पाळावीच लागेल असेच तज्ञांना सुचवायचे असावे. सध्याचे निर्बंधमुक्त जनजीवन अशाच पद्धतीने सुरळीत सुरु राहावे अशीच लोकांची इच्छा असणार. त्यासाठी राज्यसरकारच्या आवाहनाला योग्य प्रतिसाद देऊन लोकांनी स्वयंस्फुर्तीने लसीकरण करुन घेणेच सर्वांच्या हिताचे ठरेल. राजकारण करण्यासाठी विषयांची कमी नाही. करोना लसींचे राजकारण हे देखील जनतेचा विश्वास डळमळीत करण्याचे एक कारण आहे. त्यामुळे करोना लसीकरण हा राजकारणाचा मुद्दा न बनवण्याचे सामाजिक भान सर्वच राजकीय पक्ष दाखवतील का?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com