नाशिकच्या स्मार्ट सुरक्षेचे प्रयत्न मार्गदर्शक ठरावेत!

jalgaon-digital
3 Min Read

टुमदार शहरे कालौघात मोठी होतात. नगरांची महानगरे होतात. दैनंदिन गरजेच्या मूलभूत सोयी-सुविधा नागरिकांना सुलभतेने मिळू लागतात. विकासाची गंगा खळाळू लागते. व्यापार-उदीम वाढतो. पर्यटकांचा राबता वाढू लागतो. महानगरातील आणि परिसरातील जागा इमारतींसोबत झोपड्यांनी व्यापल्या जाऊ लागतात. विकासासोबत अनेक समस्याही भेडसावू लागतात. गुन्हेगारांचा सुळसुळाट सुरू होतो. गुन्हेगारीचे प्रमाण वाढीस लागते. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर होऊ लागतो. नाशिकबाबतसुद्धा अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ‘स्मार्ट सिटी’चा शिक्का नाशिकवर मारला गेला. त्याअंतर्गत शहराच्या अनेक भागात रस्त्यांच्या फोडाफोडीची देखणी कामे आजकाल जोरात सुरू आहेत. पावसाळ्यातही त्या कामांना खंड पडलेला नाही. नागरिकांची गैरसोय होत असली तरी चार-पाच वर्षे सुस्तीत घातल्यानंतर स्मार्ट सिटी यंत्रणा आता वेगाने कामाला लागली असावी. नाशिकच्या सुरक्षेबाबत पोलीस, स्मार्ट सिटी, मनपा आणि परिवहन विभाग या चारही यंत्रणा एकत्र आल्याचे सुखद चित्र सध्याच्या कोलाहलात पाहावयास मिळत आहे. देखणे शहर (स्मार्ट सिटी) बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार्‍या नाशिकची सुरक्षादेखील तेवढीच स्मार्ट असावी यासाठी नाशिक पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांच्या प्रयत्नांना स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शहराअंतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासोबतच सुरक्षाकडे मजबूत करण्याबाबत पोलीस आयुक्तालयात नुकतीच एक बैठक झाली. बैठकीला पोलीस आयुक्त, उपायुक्त, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर अधिकारी हजर होते. शहर सुरक्षेच्या दृष्टीने चारही यंत्रणांमध्ये समन्वय राहावा यावर बैठकीत चर्चा झाली. वाहतूक सुरक्षेशी संबंधित ‘झिरो माइल’ ही संकल्पना बैठकीत मांडली गेली. मोबाईल, इंटरनेट, समाज माध्यमे आदी अद्यावत तंत्रज्ञानाचा गैरवापर गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात करू लागल्या आहेत. गुन्हेगारांसाठी तो प्रशस्त राजमार्ग बनू पाहत आहे. नागरिकांच्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. रस्त्याने जाणार्‍या महिलांचे दागिने दुचाकीवरून ओरबाडण्याच्या घटना घडतच आहेत. मोबाईलवर फसवे संदेश पाठवून नागरिकांची लूट केली जात आहे. बँकांची एटीएम तसेच सोन्या-चांदीची दुकाने फोडली जात आहेत. खुनाच्या घटना वाढल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी समाज माध्यमांवर निगराणी ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा, गुन्हे अन्वेषणसाठी माहिती संकलन, व्हीडिओ कॉन्फरन्सिंग, महत्त्वाच्या चौकांतील सिग्नल तसेच पोलीस ठाण्यात अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अ‍ॅप आदी अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. पोलीस ठाण्यांसाठी स्मार्ट सिटीतून अद्यावत यंत्रसामुग्री आणि आवश्यक निधी मिळावा, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली. ही मागणी पूर्ण करण्याची ग्वाही स्मार्ट सिटी कंपनीकडून दिली गेली आहे. गुन्हेगारांवर वचक बसवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे, पण इतर यंत्रणांच्या सहकार्याने ते आव्हान पेलणे पोलिसांना काहीसे सोपे जाईल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. मुख्य चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच महत्त्वाच्या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यावर गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवणे सुलभ होऊ शकेल. नाशिकच्या सुरक्षेबाबत पोलीस आयुक्तालयाने पुढाकार घेऊन स्मार्ट सिटी, मनपा आदींना साद घालून त्यांचे सक्रिय सहकार्य मागितले. त्याला लगेच अनुकूल प्रतिसाद लाभला ही आश्‍वासक बाब आहे. सरकारी कार्यालयांमध्ये परस्पर समन्वय आणि सहकार्य अभावानेच आढळते. नाशिक पोलीस, स्मार्ट सिटी कंपनी, मनपा आणि नाशिकचा परिवहन विभाग मात्र त्याला अपवाद ठरू पाहत आहेत. चार सरकारी यंत्रणांमधील सहकार्याची भावना नाशिकसाठी आशादायक ठरावी. शहराच्या सुरक्षेबाबत नाशकात हाती घेण्यात आलेला हा स्मार्ट उपक्रम महाराष्ट्रातील इतर महानगरांमध्येसुद्धा स्वीकारून राबवला जाईल, अशा तर्‍हेने तो यशस्वी व्हावा, हीच नाशिककरांची अपेक्षा असेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *