‘माती वाचवा’ चळवळीला नाशिककरांचे पाठबळ!

‘माती वाचवा’ चळवळीला नाशिककरांचे पाठबळ!

र्यावरणाबाबत सर्वत्र जागरूकता आली आहे. पर्यावरणाचा र्‍हास, हवामान बदल, तापमानवाढ आदींबाबत लोक अधिक सजगतेने बोलत आहेत. माती हा पर्यावरण आणि जीवसृष्टीचा मूलाधार आहे. मातीशिवाय कोणतीही नवनिर्मिती अशक्य असल्याचे बहुतेक जण जाणतात. वर्षानुवर्षे, शतकानुशतके मातीचा सतत वापर होत आहे. शेतजमीन म्हणून तिचा प्रामुख्याने वापर केला जातो. वरचेवर पिके घेतली जातात. अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते तसेच औषधांचा मारा केला जातो. मशागतीसाठी बैल वा तत्सम पारंपरिक पशुबळाचा वापर करण्याऐवजी अवजड यंत्रांना पसंती दिली जात आहे. मातीच्या सुपीकतेवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. नद्यांना येणारे महापूर, वादळे, अतिवृष्टी याचेही मातीच्या सजीवतेवर दुष्परिणाम होत आहेत. मातीच्या वरच्या समृद्ध थराची झीज होत आहे. मातीचे आरोग्य बिघडत आहे. भविष्यात त्याची खूप मोठी किंमत मानवाला आणि त्यासोबत संपूर्ण सजीवसृष्टीलाच मोजावी लागण्याचा धोका वाढला आहे. या गंभीर परिस्थितीकडे समस्त मानवजातीचे लक्ष वेधण्याची नितांत गरज आहे. ती गरज ईशा फाऊंडेशनचे संस्थापक श्री सद‍्गुरू तथा जग्गू वासुदेव यांनी वेळीच ओळखली. मातीबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी ‘माती वाचवा’ चळवळ हाती घेतली आहे. दुचाकीवर स्वार होऊन सद‍्गुरू जगभ्रमणाला निघाले आहेत. मार्चपासून आतापर्यंत त्यांनी 27 देशांतून 30 हजार किलोमीटर प्रवास केला. नाशिकमधील त्यांचा 81 वा दिवस होता. विविध देशातील सामान्य जनांशी त्यांनी संवाद साधला. देशप्रमुखांच्या गाठीभेठी घेतल्या. चळवळीसाठी त्यांचे पाठबळ मिळवले. हजारो किलोमीटरचा प्रवास करून सद‍्गुरू शनिवारी नाशकात आले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नाशिकसह जिल्ह्यातील जनतेला व्हावा या उद्देशाने दैनिक ‘देशदूत’ने पुढाकार घेतला. मविप्र संस्थेच्या सहकार्याने केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. सुमारे तास-दीड तासाच्या मार्गदर्शनात सद‍्गुरूंनी पृथ्वीवरील माती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची जाणीव करून दिली. माती वाचवण्यासोबतच अधिक सकस अन्न पिकवण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि जनसहभाग या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची आवश्यकता व्यक्त करून याबाबत सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सद‍्गुरूंनी केले. मातीच्या र्‍हासाबाबत तपशीलवार माहिती देऊन श्रोत्यांना वास्तवाचे भान करून दिले. माती ही संपत्ती नसून आपल्या पिढीचा वारसा आहे. हा वारसा येणार्‍या पिढीकडे सुरक्षितपणे सोपवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. सामान्य जनांपासून धोरणकर्त्यांपर्यंत प्रत्येकाचा सहभाग या चळवळीत अपेक्षित असल्याचे सद‍्गुरूंनी सांगितले. माती वाचवण्याचा विषय एकतर्फी भाषणातून होऊ न देता उपस्थितांच्या प्रतिसादासह संवाद साधण्यावर सद‍्गुरूंनी भर दिला. सद‍्गुरू बोलत होते. श्रोते तल्लीन होऊन ऐकत होते. सद‍्गुरूंच्या आगमनाआधी नाशिकच्या कला आणि संस्कृतीचा परिचय करून देणारे कलाविष्कार स्थानिक कलावंतांनी सादर केले. नाशिक ढोलवादन, लेझीम पथकाचे सादरीकरण, मृदावंदना, सृष्टीनाद आदी कलाविष्कार श्रोत्यांच्या टाळ्या वसूल करून गेले. महिनाभरापासून नाशिककरांना आणि जिल्ह्यातील जनतेला सद‍्गुरूंच्या कार्यक्रमाची उत्सूकता होती. ईशा फाऊंडेशनसोबत अनेक प्रायोजक तसेच स्थानिक सामाजिक संस्थांच्या मदतीने हा दिमाखदार सोहळा यशस्वी झाला. श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि प्रतिसादातून त्याचा प्रत्यय आला. शेती आणि शेतकर्‍यांशी ‘देशदूत’ची नाळ घट्ट जोडलेली असल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियाही यावेळी उमटल्या. पर्यावरण आणि निसर्गाशी निगडीत प्रश्‍नांबाबत लोकांनासुद्धा जागरूकता हवी असल्याचे कार्यक्रमस्थळी जाणवले. सद‍्गुरूंनी भाषण इंग्रजीतून केले, पण मातीविषयीची त्यांची तळमळ श्रोत्यांपर्यंत अचूकपणे पोहोचल्याचे त्यांना मिळणार्‍या प्रतिसादातून स्पष्ट झाले. ‘रेडिओ विश्‍वास’ने सद‍्गुरूंचे भाषण मराठीतून ऐकण्याची सुविधा मोबाईलवर उपलब्ध केली. त्यामुळे संवाद सोपा झाला. नाशिकच्या कार्यक्रमातील श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सद‍्गुरूंचाही उत्साह द्विगुणीत होऊन ‘माती वाचवा’ चळवळ अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली असेल. परिस्थिती भीषण आहे. जैविक आणि सेंद्रिय पद्धतीचा अवलंब शेतीत करण्यासाठी सरकारकडून शेतकर्‍यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ शेतीचीच माती वाचवून भागणार नाही. शहरी भागातही मातीशी नाळ जोडलेले आणि मातीवर प्रेम करणारे लोक राहतात. माती वाचवण्यासाठी त्यांनी नेमके काय करावे? कसे योगदान द्यावे? शेतातील माती कशी वाचवता येईल? त्यासाठी कोणकोणते उपाय करावेत? याबाबतही सद‍्गुरूंनी मार्गदर्शन करावे, अशा अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहेत. चळवळीच्या पुढच्या टप्प्यात सद‍्गुरू त्याचा आवर्जून समावेश करतील, असा विश्‍वासही अनेकांनी व्यक्त केला. सद‍्गुरू तो विश्‍वास सार्थ ठरवतील, अशी अपेक्षा जनतेला असेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com