‘नदीबाई माय माझी...कुसुमाग्रज’!

‘नदीबाई माय माझी...कुसुमाग्रज’!

मानवी संस्कृतीच्या उत्क्रांती आणि विकासात नद्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. नदीला भारतीय संस्कृतीने माता मानले आहे. चप्पल घालून नदीच्या पाण्यात पाय बुडवायला माणसे आजही कचरतात. नदीला तिच्या काठाकाठाने बहरलेल्या मानवी संस्कृतीच्या विकासाची मूक साक्षीदार मानतात.

'नदीबाई माय माझी डोंगरात घर, लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर, माय सांगे, थांबू नका पुढे पुढे चला, थांबत्याला पराजय चालत्याला जय' असे नदीचे नेमके वर्णन कुसुमाग्रजांनी एका कवितेत केले आहे. त्या अर्थाने देशातील अनेक नद्या सध्या पराजयाच्या उंबरठ्यावर आहेत. प्रदूषणग्रस्त आहेत. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेच्या माहितीनुसार देशातील 42 नद्या सर्वात जास्त प्रदूषित आहेत. त्यात महाराष्ट्रातील पंचगंगा, कृष्णा, तापी आणि गोदावरी या महत्वाच्या नद्यांचा समावेश आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नद्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करते. त्यांच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील 49 नद्यांचा श्वास प्रदूषणामुळे गुदमरला आहे. त्यात नाशिकमधील ब्रह्मगिरी डोंगरात उगम पावलेल्या गोदावरीचाही समावेश आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण हा गंभीर चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात अनेकदा सर्वेक्षणे केली गेली. समित्या नेमल्या गेल्या. अहवालांची भेंडोळी दप्तरातून डोकावत असतील. तथापि गोदावरीचे प्रदूषण मात्र ‘जैसे थे’च आहे. नद्या प्रदूषणमुक्त करणे आणि वाहात्या ठेवण्यासाठी विख्यात जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह विविध उपक्रम राबवत असतात. त्यांनी राजस्थानच्या वाळवंटातील अनेक उपलब्ध नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक प्रयग केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गोदावरी नदी संसद लोकचळवळ’ सुरु झाली आहे. गोदावरी नदी बारमाही वाहाती ठेवण्यासाठी आणि ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

‘राष्ट्रीय नदी गीत गायन’ हा त्यापैकीच एक! नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी हे गीत गाण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. वर्ग ऑनलाईन सुरु आहेत तोपर्यंत ते विद्यार्थ्यांना ऐकवले जाईल आणि शाळा जेव्हा सुरु होतील त्यावेळी विद्यार्थी हे गीत गातील. गोदावरी प्रदूषणमुक्त आणि ती बारमाही प्रवाही का राहावी हे सांगण्याचा प्रयत्न या गीतातून केला गेला आहे. हे गीत तयार करण्यापासून त्याच्या सादरीकरणापर्यंत नाशिककरांचा मोठ्या प्रमाणात त्यात सहभाग आहे.

अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही यात सहभागी झाले आहेत. नदी प्रवाही असेल तर ती आपोआपच स्वच्छ राहाते असे मत तज्ज्ञ वेळोवेळी मांडत असतात. कुसुमाग्रजांनीही तेच सांगितले आहे. नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी लोकसहभाग अपरिहार्य आहे. त्याशिवाय नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन अशक्य आहे. तथापि दुर्दैवाने असे प्रयत्न नागरिकांना बंधनकारक केले तरी पुरेसे यशस्वी का होत नसावेत? आपल्या सर्व सरकारी योजनांमध्ये जाणीवपूर्वक लोकसहभाग मिळवण्याची गरज आमच्या शासन आणि प्रशासनाला का भासत नाही? लोकांनी नदीचे प्रदूषण करू नये म्हणून नदीला पोलीस संरक्षण का द्यावे लागते? तसा आदेश देण्याची वेळ न्यायसंस्थेवर का येते? नाशिकमध्ये आणि जवळपास सर्वत्र नद्यांच्या प्रदूषणमुक्तीबाबत ही सारखीच रड आहे.

ही केवळ गोदावरीचीच नव्हे तर सगळया प्रदूषित नद्यांची शोकांतिका आहे. हे जरी खरे आले तरी नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करण्याला दुसरा पर्याय नाही. हेच गोदावरी नदी संसद लोकचळवळीच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले असावे. त्यामुळे प्रदूषणाने घुसमटलेला नदीचा श्वास माणसांना कळावा, तिचे आक्रंदन ऐकू यावे यासाठी, समाजजागृती वाढावी यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. राष्ट्रीय नदी गीत गायन हा असाच एक स्वागतार्ह उपक्रम. विद्यार्थी विद्यार्थिदशेपासून हे गीत म्हणतील, त्यानिमित्ताने गोदावरीविषयी जागरूकता निर्माण होईल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असावी. अर्थात, कोणत्याही चांगल्या कामाच्या अथवा होकारात्मक बदलाच्या अपेक्षा उगवत्या पिढीकडून जास्त असल्या तरी मोठ्यांनाही आपल्यावरील जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक का वाटू नये? छोटी मुले मोठ्यांकडे बघून शिकतात याचा विसर पडून कसा चालेल? महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना नद्यांचा वारसा आहे. तो जपण्यासाठी त्या त्या ठिकाणीही असेच प्रयत्न सुरु होतील अशी आशा करावी का?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com