आगामी काळ मनोकामना पूर्तीचा ठरो!

आगामी काळ मनोकामना पूर्तीचा ठरो!

आज लक्ष्मीपूजन! दिवाळी हा भारतात सर्वत्र सर्वात मोठा सण मानला जातो आणि लक्ष्मीपूजन हा त्यातील सर्वात महत्वाचा दिवस! आज घरोघरी लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन करतात. त्यांचा वरदहस्त कायम राहावा अशी मनोकामना केली जाते. भारतीय संस्कृतीतील सगळ्या सणांना पुराणकथा जोडलेल्या आढळतात.

वर्षानुवर्षे त्या ऐकवल्याही जातात. लक्ष्मीपूजनाची देखील एक कथा सांगितली जाते. आज रात्री धनदेवता लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्यांच्या घराची दारे उघडी असतील, घरात पुरेसा प्रकाश आढळेल, ज्यांच्या घरी स्वच्छता असेल आणि ज्या घरातील माणसे कष्टाळू असतील त्यांच्या घरी लक्ष्मी कायम वास करते अशा आशयाची ती कथा आहे. गोष्टच ती. तथापि या कथेतील गुणांचे महत्व करोनाने सर्वांना पटवून दिले आहे. सर्व प्रकारची स्वच्छता राखली तर अनेक आजार माणसांपासून कायमचे दूर ठेवता येऊ शकतात याचा उत्तम धडा करोनाने घालून दिला आहे.

दिवाळीच्या निमित्तानेही साफसफाईचा कित्ता सर्वानीच पुन्हा एकदा गिरवला आहे. लक्ष्मीपूजनाच्या आजचा दिवस सर्वाना सुखदायक व्हावा आणि पुढचे वर्ष आनंदाचे जाईल याची हमी देणारा ठरावा अशीच प्रार्थना आज सगळेच करतील. गेली दीड-दोन वर्ष विलक्षण अस्वस्थतेत गेली. सर्वांसाठीच आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत बदल करणारी ठरली. या संकटाचा सामना सगळेच मोठया धीराने करत आहेत. संकटाने डगमगून न जाता परिस्थितीवर होकारात्मक पद्धतीने मात करण्याची हीच वृती कायम राहावी हीच सर्वांची अपेक्षा असेल. करोनाचे सावट काहीसे फिके पडत असल्याचे सांगितले जाते. ही बाब सर्वांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारीच असेल.

त्याचे काही श्रेय शासनाचे पण श्रेयात मोठा वाटा मराठी जनतेचा. सर्वानीच आपापल्या परीने प्रयत्न केल्याने दिवाळीचा सण आनंदात साजरा होत आहे. पण तरीही आगामी काही काळ जी काळजी घ्यावी लागणार आहे तिचा विसर कोणालाही पडू नये. करोना कधी संपेल याविषयी तज्ज्ञ देखील निश्चित सांगू शकत नाहीत.

त्यामुळे अजून तरी काही निर्बंध पाळावे लागणार आहेत याची खूणगाठ प्रत्येकाने मारलेली बरी. माणसांच्या जाणीवा आणि विचार प्रगल्भ होत आहेत याचा अनुभव सर्वांनाच येत आहे. माणसे भेदाभेद विसरून एकमेकांच्या पाठीशी उभी राहात आहेत. परिस्थितीअभावी जे दिवाळी साजरी करण्यास असमर्थ आहेत त्यांच्यासाठी निरपेक्ष भावनेने माणसे पुढे येत आहेत. दिवाळीत फराळाची मेजवानी असते. आदिवासी बांधवांपर्यंत फराळ पोहोचवला जात आहे. वंचितांच्या मुखी सणासुदीला गोडाधोडाचे दोन घास जावेत या उदात्त विचाराने विविध उपक्रम राबवले जात आहेत.

पुण्यातील आकुर्डी येथील एका संस्थेने अंध बांधवांची दिवाळी गोड केली. उरळी येथील एका शाळेत विद्यार्थ्यांनी पणत्या रंगवल्या. पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवले. त्यांची विक्रीही केली. विद्यार्थी आर्थिक साक्षर व्हावेत यासाठी हा उपक्रम राबवल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी माध्यमांना सांगितले. विद्यार्थ्यांनी यापुढे पुस्तक वाचनाचा फराळ करावा या उदात्त हेतूने औरंगाबाद आणि बीड परिसरातील शे-दोनशे शिक्षक एकत्र आले आहेत. बार्शी येथील स्नेहग्राम संस्थेने बालवाचनालय सुरु केले आहे.

इन्फन्ट इंडिया या संस्थेने त्यांच्या वाचनालयात तब्बल एक हजार पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली. वरवंडी तालुक्यातील एक शिक्षक अक्षर दिवाळी नावाचा उपक्रम राबवत आहेत. अनेक शिक्षकांनी एकत्र येत मपरिवर्तनाच्या वाटाफ असा समूह तयार केला आहे. हा समूह वाचन चळवळ रुजवण्यासाठी काम करत आहे. दिवाळीची आवरासावर करणे सोपे व्हावे या उद्देशाने स्वच्छ या संस्थेच्या मदतीने पुणे महानगरपालिकेने वी कलेक्ट नावाची मोहीम राबवली. या मोहिमेत शंभर टनांपेक्षा जास्त जुन्या वस्तू संकलित करून त्या पुनर्वापरासाठी पाठवण्यात आल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे.

विचारांमधील ही प्रगल्भता एका क्षेत्रापुरती मर्यादित राहू नये. जाणीव जागृतीचा हा प्रवास अखंड सुरु राहावा हीच दिवाळीच्या निमित्ताने अपेक्षा. आजचा दिवस आणि आगामी काळ सर्वाना सुखाचा जावो या ‘देशदूत’कडून सर्वाना शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com