नव्या भारतातील मारकुटे नव-गुरुजी!

नव्या भारतातील मारकुटे नव-गुरुजी!
मुले ही देवाघरची फुले’ असे म्हणण्याचा प्रघात आहे. विद्यार्थ्यांविषयी आत्मीयता आणि आपुलकी असणारे शिक्षक त्या शब्दांना सार्थकता प्राप्त करून देतात. अशा शिक्षकांचे वर्णन पु.ल.देशपांडे यांनी चितळे मास्तर या कथेत केले आहे. बहुतेक प्रत्येक विद्यार्थ्याच्या शालेय जीवनातील काही याच प्रकारचे शिक्षक त्यांना आठवतील. साने गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी परस्परांवर अतिशय प्रेम करत. साने गुरुजी शिक्षकांना त्यांच्या जबाबदारीची वारंवार जाणीव करून देत असत. आदळआपट, दंड आणि शिक्षा करून मुलांचा खरा विकास होत नाही.

मुलांभोवती जितके आनंदाचे आणि मोकळेपणाचे वातावरण तितके मुलांचे शिक्षण सुंदर होते. जीवन उजळते. मुलांचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे असे वाटत असेल तर त्यांच्या भोवतीचे वातावरण बदला. मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच विशाल दृष्टिकोनाचे शिक्षक मिळावेतफ असे साने गुरुजी म्हणत. साने गुरुजींनी तसे विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला. तथापि सध्याचे वास्तव काय आहे? आजही काही शिक्षक वर वर्णन केलेल्या गुरुजन या विशेषनाला योग्य ठरणारे आढळतात.

तथापि साने गुरुजींच्या शिक्षकांविषयीच्या अपेक्षा किती शिक्षक पूर्ण करतात? वर्गात शिट्टी वाजवली म्हणून तीन शिक्षकांनी वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना काठीने गुरासारखे बडवले असे वृत्त माध्यमात झळकले आहे. हरियाणा राज्यातील फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना येथील एका सरकारी शाळेत हे आक्रित घडल्याचे संबंधित वृत्तात म्हटले आहे. वर्गात शिट्टी वाजली. कोणी वाजवली असा प्रश्न शिक्षकांनी विचारला. एकाही विद्यार्थ्याने उत्तर दिले नाही, त्याच्या राग येणे स्वाभाविक म्हणता येईल.

मात्र त्यानंतर जो प्रकार घडला तो मात्र कोणत्याही रीतीने समर्थनीय नाही. वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षकांनी काठीने बेदम झोडपले. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकत्रितपणे शिक्षकांनी वर्गातील सर्व मुलांना केलेल्या मारहाणीबद्दल पोलिसात तक्रार केली आहे. पालकांनी तक्रार करू नये यासाठी शिक्षकांनी पालकांनाही धमकवल्याचे सांगितले जाते. या घटनेचा अद्याप तरी कोणी इन्कार केलेला नाही. ज्यांना मारले ते विद्यार्थी अकरावीच्या वर्गात शिकत होते. तरुणाई बिघडली आहे. बेजबाबदार झाली आहे. त्यांना सामाजिक भान राहिलेले नाही. व्यसनाधीनता वाढत आहे.

तरुण मुले कोणतेही नियम पाळत नाहीत. त्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदर नाही. शिक्षकांना टोपण नावे देऊन त्यांची चेष्टा करण्याची हिंमत विद्यार्थी करतात. अशी टीका आजकाल सातत्याने केली जाते. ती काही अंशी खरी असेलही. तथापि त्याचा दोष फक्त विद्यार्थ्यांना देणे योग्य ठरेल का? महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात अध्यापकांना मशेलापागोटे (फिशपॉन्ड)फ देण्याच्या प्रथेचे मात्र सर्वच कौतुक करतात. मसुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडोफ असे मोरोपंत यांनी म्हटले आहे.

या शिकवणीपासून आणि सुसंस्कार होण्यापासून विद्यार्थी का दुरावत आहेत? केवळ शिट्टी वाजवली म्हणून विद्यार्थ्यांना काठीने बेदम मारहाण करण्याचे समर्थन कोणत्याही प्रकारे करता येईल का? उद्या कदाचित रागावलेल्या काही पालकांनी अशा शिक्षकाला रस्त्यात धरून बदडले तर ती प्रतिक्रिया चूक ठरेल का? ज्या विद्यार्थ्यांना असे शिक्षक शिकवतात, बेदम मारहाण करतात, अशा विद्यार्थ्यांकडून सामाजिक भान राखण्याची अपेक्षा करता येईल का? भारत हा तरुणांचा देश म्हणून जगात ओळखला जातो.

याच तरुणाईच्या बळावर देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्नांचे गाजर ढाराढूर झोपणारी नेतेमंडळी त्या झोपेत सुद्धा दाखवतातच ना! विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शिक्षकांचे महत्व आजवर अनेकांनी अनेकप्रकारे व्यक्त केले आहे. काही कविता लहानथोरांना सुद्धा आठवत असतील. जबाबदार आणि सुसंस्कृत तरुणाई घडवणे ही शिक्षक, पालक अशी सर्वांची जबाबदारी आहे.

वर्गात शिट्टी वाजवल्यावर मारहाण करणे जितके अयोग्य तितकेच वर्ग सुरु असतांना शिट्टी वाजवणे अनुचित आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याची जबाबदारी सर्वांची आणि विशेषतः पालकांची देखील आहे. पण काठीने झोडपून त्याचे गांभीर्य तरुणांच्या मनावर बिंबवले जाईल का? हा प्रकार हरियाणात घडला. हरियाणातील सध्याच्या खट्टर राज्याचे खाटेपण (की खोटेपण?) विद्यार्थ्यांना भोगावे लागावे हे तरुणाईचे दुर्दैव तर आहेच पण असे शिक्षक (की वशिल्याचे तट्टू?) नेमणार्‍या नेतेमंडळींचे ढळढळीत अपयश सुद्धा आहे. त्यात भविष्यात दुरुस्तीची अपेक्षा करावी का? तरुणाई भारताचे भविष्य आहे. तिला योग्य पद्धतीने घडवण्याची बुद्धी गणराया सर्वाना देईल का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com