राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीचा उठावदार ठसा!

राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीचा उठावदार ठसा!

राठी भाषा आणि मराठी माणसांच्या हिताचा वसा आपणच घेतला आहे, अशा थाटात मराठी नेते शाब्दिक शस्त्रे परजून एकमेकांवर हल्ला चढवत आहेत. ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ अशी महाराष्ट्रातील एकूण राजकीय स्थिती असताना मराठी सिनेसृष्टीने राष्ट्रीय पुरस्कारांच्या स्पर्धेत यंदा चमकदार कामगिरी बजावून दिल्ली गाजवली आहे. अडुसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली.

2020 सालासाठी हे पुरस्कार आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीचा ठसा उमटवण्याची परंपरा मराठी चित्रपटांनी यावेळीही कायम राखली. वेगवेगळ्या विभागांत दहा पुरस्कारांची घसघशीत कमाई करून मराठीचा डंका वाजवला आहे. शंतनू रोकडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांछित’ या चित्रपटांतील अभिनयाबद्दल ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांनाही पुरस्कार जाहीर झाला.

‘जून’ या चित्रपटासाठी अभिनेता सिद्धार्थ मेननला विशेष ज्युरी पुरस्कार, ‘मी वसंतराव’साठी पार्श्‍वगायक राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायनाचा तर याच चित्रपटासाठी अनमोल भावे यांना सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा पुरस्कार घोषित झाला. ‘फनरल’ हा सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट तर अमोल गोळे यांचा ‘सुमी’ हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून गौरवला गेला.

मराठीतील बालकलावंतही पुरस्कारांच्या स्पर्धेत मागे नाहीत. ‘टकाटक’ चित्रपटासाठी अनिश गोसावी, ‘सुमी’साठी आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर यांनी सर्वोत्कृष्ट बालकलाकारांचा पुरस्कार पटकावला. ‘गोष्ट एका पैठणीची’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला खरा, पण त्यातील भूमिकेत जीव ओतून अभिनय करणारी नाशिकवासी अभिनेत्री सायली संजीवला मात्र राष्ट्रीय पुरस्काराने हुलकावणी दिली. त्याची हुरहूर नाशिककरांप्रमाणेच कदाचित तिलासुद्धा वाटत असेल. गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतसुद्धा मराठी सिनेसृष्टीने दहा पुरस्कार पटकावले होते.

‘बार्डो’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला होता. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘आनंदी गोपाळ’ची निवड झाली होती. मराठी मातीतील मुंबईत रूजलेल्या आणि पाश्‍चात्य सिनेसृष्टी ‘हॉलिवूड’ला तगडी टक्कर देणार्‍या ‘बॉलिवूड’च्या यशाचासुद्धा महाराष्ट्राला मराठी चित्रपटांइतकाच अभिमान आहे. मराठ्यांच्या इतिहासावर बेतलेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय हिंदी चित्रपट ठरला. याच चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. हा चित्रपट मराठमोळ्या ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे.

आशुतोष गोवारीकर यांच्या निर्मिती संस्थेचा ‘तुलसीदास ज्युनिअर’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. हिंदी सिनेसृष्टीत मराठी पुत्र व कन्यांचा वरचष्मा प्रभावीपणे दिसून येतो. अनेक मराठी भाषिक निर्माते, दिग्दर्शक, कलावंत, संगीतकार, गायक, तंत्रज्ञ ‘बॉलिवूड’मध्ये समर्थपणे योगदान देत आहेत. ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांछित’ चित्रपटांतील अभिनयासाठी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनेता किशोर कदम यांचे उद‍्गार भावस्पर्शी आहेत. राष्ट्रीय पातळीवर अभिनयाची दखल घेतल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. मन लावून केलेल्या कामाचे चीज झाले, असे कदम म्हणाले. पुरस्कार विजेत्या सर्वच मराठी कलावंतांच्या या प्रातिनिधीक भावना म्हणता येतील.

मराठी सिनेसृष्टीपुढे हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे मोठे आव्हान उभे आहे. मात्र त्या आव्हानांना तोंड देत मराठी सिनेसृष्टी निर्भीडपणे पुढे जात आहे. राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठे दर्जेदारपणामुळे गाजवत आहे. मराठी चित्रसृष्टीत गुणवत्तेची कुठेही कमतरता नाही. दहा पुरस्कारांवर मोहोर उमटवून सर्व संबंधितांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

आधीची दोन वर्षे करोना महामारीच्या आव्हानाची होती. त्याचे सावट दूर झाल्यानंतर मराठीतील नव्या दमाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलावंत आदींनी कसदार चित्रपट निर्मितीत स्वत:ला निर्धाराने झोकून दिले. त्याची प्रचिती यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांत आली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या स्पर्धेत मायमराठीची विजयपताका फडकावणार्‍या सर्व कलावंतांचे मन:पूर्वक अभिनंदन!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com