माणूस पशुत्वाच्या दिशेने वेगाने धावतो आहे का?

माणूस पशुत्वाच्या दिशेने वेगाने धावतो आहे का?

माणसांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंनी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत संघर्ष केला. कारण ‘शिक्षणाने माणसातील पशुत्व हटते पहा’ असे सावित्रीबाई म्हणत. म्हणुनच स्त्रियांनी सुद्धा शिक्षण घेतलेच पाहिजे हाच त्यांचा ध्यास होता. 2011 च्या जनगणना अहवालानुसार त्यावेळी भारताचा साक्षरता दर साधारणत: 74 टक्के होता. तो आता नक्कीच वाढला असेल असा समाजतज्ञांचा अंदाज आहे.

पण शिक्षणाने माणसातील पशुत्व खरेच हटले का? की काही माणसे शिकुनही त्यांच्यातील पशुत्व अधिकच उग्रतेकडे सरकले. समाजात घडणार्‍या काही अनुचित घटना त्याकडेच बोट दाखवतात. माणसाच्या माणुसपणावर प्रश्न उपस्थित करतात. अनेक माणसे छोट्या मुलींचा, प्रसंगी मदतीची याचना करणार्‍या महिलांचा गैरफायदा घेतात. क्षुल्लक कारणांसाठी काही शिक्षक विद्यार्थ्यांना जीव जाईपर्यंत झोडपतात. पाळणाघरातील सेविका निरागस बाळांना अमानुष मारहाण करतात. मुलगा पैशासाठी बापाचा आणि आईचा जीव घेतो. संशयावरुन नवरा किंवा बायको परस्परांचे खून करण्यास प्रवृत्त होतात. दहा रुपयांसाठी अल्पवयीन मुले त्यांच्या मित्राचा दगडाने ठेचून खुन करतात. जयपूरात रायसर गावात नुकत्याच घडलेल्या घटनेने मानवतेची हद्द पार केली आहे.

माणुसकीला काळीमा फासला आहे. पैशाच्या उसनवारीवरुन गावात दोन व्यक्तींमध्ये वाद होता. ज्याने पैसे उसने दिले होते त्याची पत्नी शिक्षिका होती. एक दिवस ती आणि तिचा सहा वर्षांचा मुलगा शाळेत जात असताना त्या शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आले. आगीच्या ज्वाळांनी वेढलेली ती मदतीसाठी सैरावैरा धावत होती. पण त्या शिक्षिकेला मदत मिळाली नाही. मदतीऐवजी त्या घटनेचे चित्रिकरण करण्यातच माणसे मग्न झाली होती. सहा वर्षाच्या मुलासमोर त्याची आई जळत राहिली. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

चलबोलात या घटनेचे चित्रिकरण करणारांना माणूस तरी कसे म्हणावे? ते नुसतेच बघे होते. असे बघे समाजात जागोजागी भेटायला लागले आहेत. समाजात अनेक गंभीर अपघात होतात. अपघात घडल्यानंतर पहिल्या तासाला ‘गोल्डन अवर’ म्हटले जाते. या पहिल्या तासात जखमींना वैद्यकीय उपचार मिळू शकले तर त्यांचा जीव वाचण्याची शक्यता कैकपटींनी वाढते. पण अपघातातील सगळेच गंभीर जखमी इतके नशिबवान असतात का? अपघाताचे आणि जखमींना मदत करण्याऐवजी त्याही घटनेचे चित्रिकरण करणारे बघेच फार! एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती वाहनांनी भरुन वाहाणारा रस्ता ओलांडायचा प्रयत्न करत असते. कोणीतरी मदतीचा हात पुढे करावा अशी त्याची अपेक्षा असते.

किती जणांची ती अपेक्षा पूर्ण होते? गर्दीच्या ठिकाणी महिलांना नेहमीच विपरित अनुभव का येतात? माणसातील याच पशुत्वाची जाणीव बहिणाबाईंनाही झाली असावी कदाचित. म्हणुनच आपल्या एका कवितेत त्या म्हणतात,


‘मानसा मानसा तुझी नियत बेकार,
तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर
मानसा मानसा कधी होशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस’


कित्येकदा शिक्षण घेऊन माणूस सुसंस्कृत झाल्याचा अभिमान बाळगला जातो. विश्वगुरुत्वावर अधिकारही सांगितला जातो. भारत देशाने जगाला ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची देणगी दिल्याचे अभिमानाने सांगितले जाते. पण त्याच देशात माणुसकीला लाज आणणारे प्रसंग वाढीस लागले याचा अर्थ काय काढावा? सुशिक्षित झालेल्या व हजारो कोटींचा खर्च करुन नवी मंदीरे उभारणार्‍या माणसात सुद्धा पशुत्व पुन्हा नव्याने का उफाळत आहे, याचा शिक्षणतज्ञांनी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.

मिळणारे शिक्षण सुद्धा निर्दोष नाही. शिक्षणविषयक नवे धोरण ठरवताना या दिशेने सुद्धा फेरविचार करण्याची गरज आहे असे जाणते मानणार का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com