Wednesday, April 24, 2024
Homeअग्रलेखकुपोषित बालकांकडे दुर्लक्ष होऊ नये!

कुपोषित बालकांकडे दुर्लक्ष होऊ नये!

हंगामी पाऊस, त्यावर अवलंबून असलेली शेती आणि पाणी हे माणसाचे सदासर्वकाळ जिव्हाळ्याचे विषय. पाऊस वेळेवर येईल का? दुष्काळ पडेल का? प्यायला आणि वापरायला भरपूर पाणी मिळेल का? हे जाणून घ्यायला माणसे सर्वात जास्त उत्सूक असतात. झाडे आणि पावसाचा किती जवळचा संबंध आहे हे शालेय वयात शिकवले जाते. झाडे जगली तरच माणूस जगेल अशीही शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते. हीच शिकवण लातूर जिल्ह्यातील ‘वृक्ष प्रतिष्ठान’ या संस्थेने आचरणात आणली आहे.

ही संस्था शहर परिसरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करते आणि ते वृक्ष जगवण्यासाठी देखील प्रयत्न करते. शक्यतो वड, पिंपळ, लिंब, बहावा असे अनेक देशी वृक्ष लावले जातात. या झाडांना पाणी घालण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सभासदांकडे जबाबदारी दिली आहे. त्यासाठी वेळापत्रक तयार करुन दिले आहे. रोज सकाळी ठरलेल्या वेळी जबाबदारी स्वीकारलेले सदस्य एकत्र येतात. झाडांना पाणी घालतात. परिसराची साफसफाई करतात. गेल्या तीन वर्षात साधारणपणे 25 हजार झाडे लावण्यात आल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी माध्यमांना सांगितले.

- Advertisement -

या उपक्रमाला लातुरवासियांचाही प्रतिसाद मिळत आहे. विविध निमित्ताने वृक्षांची रोपे, पाण्याचे टँकर नागरिकांकडून मिळत आहेत असेही पदाधिकार्यांनी सांगितले. लातूर शहर गेली अनेक वर्षे पाणीटंचाईचा सामना करत आहे. 2016 मध्ये लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. दुष्काळग्रस्त भागाला रेल्वेच्या सहाय्याने पाणी पुरवण्याचा तो राज्यातील पहिलाच प्रयोग होता. पाण्यालाही माणसाचे जीवन मानले जाते. एक दिवस नळाला पाणी येणार नाही म्हटले की माणसे अस्वस्थ होतात. आणि उपलब्ध पाण्याचा अनेक मार्गांनी बेसुमार वापरही माणसेच करतात.

शिवाय अनेकांच्या घरातील नळ वर्षानुवर्षे गळत असतात. थेंब थेंब पाणी वाया जात असते. यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या जाणीवा वाढाव्यात यासाठी शासनाच्या पर्यावरण सेवा योजना विभाग एक उपक्रम राबवत आहे. गेले वर्ष-दीड वर्ष विद्यार्थी घरी होते. याकाळात घरातील गळके नळ आणि त्यामुळे वाया जाणारे पाणी याचे मोजमाप करायला सांगितले गेले. त्यासाठी औषधांच्या बाटल्यांच्या झाकणांचे माप ठरवले गेले. ते कसे वापरायचे? गळती होत असलेले पाणी कसे मोजायचे? ती माहिती कशी लिहायची? याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले गेले. आता पुढच्या टप्प्यात नळ दुरुस्ती शिकवली जाणार आहे.

या उपक्रमात 14 शाळांमधील अनेक विद्यार्थी सहभागी झाल्याचे विभागाच्या समन्वयकांनी माध्यमांना सांगितले. एका बाजूला झाडांचे संगोपन केले जात असताना, विद्यार्थ्यांच्या जाणीवा विकसित होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असताना दुसर्या बाजूला कुपोषित बालकांची वाढती संख्या मात्र अस्वस्थ करणारी आहे. कुपोषित बालकांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

राज्यातील साधारणत: साडेसहा लाखांपेक्षा जास्त बालके कुपोषित आहेत. यासंदर्भातील आकडेवारी केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाने जाहीर केली आहे. प्रयत्नांती काय चमत्कार घडू शकतो हे लातूर आणि पर्यावरण सेवा विभागाने सिद्ध केले आहे. महाराष्ट्र राज्य पुढारलेले मानले जाते.

तथापि राज्याचे पुढारलेपण केवळ एकाच दिशेने असून कसे चालेल? कुपोषित बालकांची संख्या कमी कशी करता येईल आणि राज्याचे उद्याचे नागरिक अधिकाधिक सुदृढ बनावेत यसाठी ठोस उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा जनतेने करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या