विचार, सवय स्वच्छ... तर देश स्वच्छ!

महात्मा गांधी
महात्मा गांधी

महात्मा गांधी यांनी देशाला त्याकाळी स्वच्छतेचा संदेश दिला; तो गरजेचाच होता. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली सादर 'स्वच्छ भारत' अभियान या राष्ट्रीय आंदोलनाची घोषणा केली. आज आठ वर्षानंतरही हे अभियान राबवावे लागत आहे. मुळातच स्वच्छता हा नैसर्गिक पैलू असायला पाहिजे. तो माणसाच्या स्वभावाशी निगडीत असायला हवा. त्याची सुरूवात आपल्या विचारातून कृतीत यायला हवी. मात्र दिवसागणिक कचर्‍याचे ढीग वाढतानाच दिसत आहेत. कचर्‍याचे विघटन ही तांत्रिक प्रक्रिया असली तरी ही प्रक्रिया सर्वदूर पोहचलेली दिसत नाही. मोठ्या शहरांमध्ये बर्‍याच ठिकाणी कचर्‍याचे विघटन करणारी तांत्रिक प्रक्रिया उपलब्ध असते.

मात्र गाव-खेड्यांत अशा सोयी-सुविधा अजुनही उपलब्ध होताना दिसत नाहीत. सध्याच्या काळात होणारा प्लॅस्टिकचा वापरदेखील वाढत्या कचर्‍याला कारणीभूत ठरतो. आपल्या प्रत्येक वापराच्या वस्तूंमध्ये प्लॅस्टिकचे आवरण असल्या कारणाने हे ढीग वाढत चालले आहेत. जगभरात प्लॅस्टिकचे दुष्परिणाम, त्याचे धोके वारंवार अधोरेखित केले जात आहेत. तरीही त्याचा वापर काही केल्या थांबत नाही. यावर पर्याय तितकेसे अजून उपलब्ध नाहीत. आणखी एक स्वच्छतेची समस्या असते ती म्हणजे ओला-सुका कचरा वेगळा करण्याची! प्रशासनाने कितीही बजावून सांगितले तरीही लोकांना तशी सवय अजून लागत नाही. 'हागणदारीमुक्त गाव' अभियान सुरू करून प्रशासनाने अनेक गावे 'हागणदारीमुक्त' केली. त्यापैकी बरीच गावे फक्त कागदोपत्रीच 'हागणदारीमुक्त' झाली असे वाटते.

याला कारण म्हणजे लोकांच्या सवयी आणि समज! जोपर्यंत लोकांच्या विचारांत बदल येत नाही तोपर्यंत स्वच्छतेसंबंधी अभियाने वेगवेगळ्या पद्धतीने राबवावी लागतील. यातील दुसरा मुद्दा असाही असतो की, मैल्याचे विघटन किंवा प्रक्रिया करणार्‍या प्रणाली वाढत्या लोकसंख्येला अपुर्‍या पडतात. त्या सगळ्या ठिकाणी उपलब्ध असतातच असेही नाही. ज्या शहरांत त्या उपलब्ध असतील तिथे वाढत्या लोकसंख्येसाठी या प्रणाली अपुर्‍या ठरतात. त्यामुळे मैला नदीत सोडणे, नद्या प्रदूषित होणे, जलस्रोत प्रदूषित होणे असे चित्र सर्रास सगळीकडेच दिसते. प्लॅस्टिकने नाले बुजतात. शहरे तुंबतात आणि या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होतो. प्रशासनाने विविध प्रकारे 'स्वच्छ भारत' अभियान राबवण्याचा प्रयत्न केला आहे. हागणदारीमुक्त गाव, कचर्‍याचे विलगीकरण, कचर्‍याचे विघटीकरण, शहरातील नवीन सोसायट्यांना कचर्‍याबाबतच्या नियमावली, कचरा आणि मैला विघटनाची स्वतंत्र प्रणाली उभारण्याच्या सूचना असे विविध मार्ग अवलंबलेले दिसतात. मात्र ते पुरेसे पडतात का? हा प्रश्न राहतो. 'स्वच्छ भारत' ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रत्येक भारतीयाला त्यात योगदान द्यावे लागेल. वर्षातून एकदा फक्त पंधरवडा राबवून पुरेसे होणार नाही. रोजच स्वच्छतेचे भान राखावे लागेल. त्यासाठी सक्षम प्रणालीदेखील उभी करावी लागेल. मुळातच विचार स्वच्छ तर गावे, शहरे स्वच्छ आणि देश स्वच्छ हे अनेक अर्थाने होऊ शकेल. त्याबाबत प्रत्येकाने सजग राहणे आणि तशी पावले उचलणे आवश्यक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com