सावध ऐका पुढल्या हाका!

सावध ऐका पुढल्या हाका!

उद्या नववर्षाचा पहिला दिवस. एरवीही वर्षाखेर आणि नववर्षाचा पहिला दिवस धुमधडाक्यात साजरा करण्याची नवपरंपरा अलीकडे रुजली आहे. तथापि यंदा वर्षाखेर आणि आठवड्याची अखेर एकत्रच आल्याने लोकांनी तो दुग्धशर्करा योग मानला नसता तरच नवल. कदाचित त्यामुळेच विविध आस्थापना आणि विशेषत: सरकारी कार्यालयांमध्ये त्याचे सावट आम जनतेला प्रकर्षाने जाणवले. कालपासुनच सगळीकडेच वर्षाखेर साजरी करण्याचा आणि नववर्ष स्वागताचा माहोल आहे. नव्या वर्षात कदाचित भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल आणि भारताकडे सर्वाधिक तरुण लोकसंख्या असेल असे सांगितले जाते. राजकारणातही लोकांना रस असतोच. नव्या वर्षात देशातील 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होतील. गगनयान ही भारताची महत्वाकांक्षी अंतराळ मोहिम आहे. तीन अंतराळवीरांना सात दिवस अंतराळात पाठवण्याचे स्वप्न देशाने पाहिले आहे. हे स्वप्न नव्या वर्षात पूर्ण होईल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा विविध क्षेत्रात घडामोडी घडतातच. नव्या वर्षातही त्या घडतील. गत तीन वर्षे तशी लोकांनी करोनाच्या सावटाखालीच घालवली. सरते वर्ष कदाचित त्याला थोडेसे अपवाद मानता येऊ शकेल. करोनामुळे विस्कटलेली सामाजिक घडी हळूहळू पुर्ववत झाली. काही क्षेत्रांमध्ये पूर्ववत होते आहे. करोनाचे सगळ्याच क्षेत्रांवर विपरित परिणाम झाले. आर्थिक घडी विस्कटली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्य टांगणीला लागले होते. काही काळ लोकांना घरात शब्दश: कोंडून घ्यावे लागले होते. या सगळ्या सावटातून सरत्या वर्षात लोक बाहेर पडले होते. सार्वजनिक सण लोकांनी उत्साहात साजरे केले. नव्या वर्षाचे स्वागतही लोक उल्हासात करतीलच. तथापि नव्या वर्षातही करोनाची साथ पुन्हा परतेल का अशी शंका व्यक्त होत आहे. त्या शंकेला चीन देशातील करोना साथीबद्दल माध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या वृत्ताचा आधार आहे. त्यामुळे लोक काहीसे अस्वस्थ झाले आहेत. अर्थात याहीवेळ या वृत्ताला जर-तर ची जोड आहे. कारण चीनमधील विविध शहरातील सद्यस्थितीचे व्हिडियो समाजमाध्यमांवर फिरत आहेत. ते तेथे राहाणार्‍या भारतीयांनी काढल्याचेही सांगितले जाते. त्या व्हिडियोत तेथील जीवन सुरळीत सुरु असल्याचे लोकांना पाहायला मिळते. यात खरे किती आणि खोटे किती हे लोकांना कसे समजावे? त्याकडे प्रचाराचा धुरळा म्हणून बघता येऊ शकेल का? हे जरी खरे असले तरी, लोकांनी घाबरुन न जाता त्यांच्यापुरती सजगता बाळगायला हवी. निर्बंधांच्या त्रिसुत्रीचे पालन करण्यातच लोकांचे भले आहे याचे भान ठेवलेले बरे. करोना लाटांचा झटका सर्वांनाच बसला आहे. जागतिक मंदीचे सावट येत आहे असे जाणकार अर्थतज्ञ म्हणत आहेत. हे लक्षात घेऊनच करोनाची साथ पुन्हा आलीच तर तिचा सामना कसा करायचा याचे नियोजन सरकारी पातळीवर सुरु असेल अशी अपेक्षा आहे. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ असे केशवसुतांनी म्हटले आहे. सरत्या वर्षात लोकही करोनासोबत जगायला शिकले होते. परिस्थिती स्वीकारुन पुढे जात होते. पण त्याच कवितेत केशवसुतांनी ‘सावध ऐका पुढल्या हाका’ असेही बजावले आहे. त्याचा विसर पडू न देण्यातच समाजाचे भले आहे याची खुणगाठ मात्र मारायलाच हवी. नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com