कायद्याला सामाजिक जागृतीची जोड हवी

Ajit Pawar
Ajit Pawar

बेताल वक्तव्ये करुन महापुरुषांचा अवमान करणार्‍या वाचाळवीरांची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणी ज्येष्ठ राजकीय नेते अजित पवार यांनी केली आहे. सध्या राजकीय कलगीतुरा जोरात आहे.

एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढताना अनेकांची जीभ घसरते. भाषेची पातळी खालावते. महापुरुषांबद्दल अवमानजनक विधाने केली जातात. त्यामुळे परिस्थिती अतीशय संवेदनशील बनली आहे. अजित पवार राजकारणातील जाणते नेते मानले जातात. परखड बोलणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. यासंदर्भातील लोकांमधील उद्विग्नता त्यांनाही जाणवली असावी. त्यांनी केलेली कायदा निर्माणाची मागणी दुर्लक्षित करण्यासारखी नाही.

महापुरुषांबद्दल आदरपूर्वक आणि अभ्यासपूर्वक बोलले जायला हवे. तसे ते बोलले जात नसेल तर कारवाई केली जायला हवी याविषयी कोणाचेही दुमत असणार नाही. समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आणि अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी कायदा हे एक साधन मानले जाते. सामाजिक परिवर्तनासाठीही कायदा सहाय्यभूत ठरू शकतो.  तथापि फक्त कायद्याने प्रश्न सुटतात का? कायदे असुनही विचारवंतांच्या हत्या होतात.

नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर गदा येते. महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढते. भ्रष्टाचार  सुरुच असतो. सामाजिक बहिष्कार घातले जातात. जात पंचायतींची छुपी दहशत पीडितांच्या अनुभवास येते. आंतरजातीय विवाह करणार्‍या  अनेकांना जीव गमवावा लागतो. भोंदूबाबा गरजूंना लुबाडतात. समाजविघातक प्रवृत्तींना कायद्याच्या आधारे मर्यादा घातल्या जातात, तेव्हा त्याचबरोबरीने कायद्याला फाटे फोडण्याचे आणि ते निष्प्रभ ठरवण्याचे देखील प्रयत्न होतात. शिवाय कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्नही गंभीर आहे. कायदे अधिक सक्षम बनवून त्यांची कठोर अंमलबजावणी करणे हे सरकारचे काम आहे. अनेकदा सरकारी पातळीवर त्याबाबतीत निराशा पदरी पडते असे जाणते म्हणतात. सामाजिक कार्यकर्त्यांचीही तशी तक्रार असते. जादूटोणाविरोधी कायदा हे त्याचे नमुनेदार उदाहरण. एखाद्या ज्वलंत प्रश्नावर सामाजिक भावना उग्र हातात तेव्हा कायदा करण्याची मागणी केली जाते.

सरकारचाही कायदा करण्याकडेच कल आढळतो. तथापि केवळ कायद्याने प्रश्न सुटत नाहीत हे अजित पवारही जाणून असतील. त्याला समाजजागृतीची जोड द्यायला हवी. महापुरुषांचा वैचारिक वारसा पुढच्या पिढीकडे घेऊन जाणे ही संबंधित सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी किती राजकीय पक्ष जाणीवपूर्वक उपक्रम राबवतात? कार्यकर्त्यांसाठी वैचारिक शिबिरे घेतात? महापुरुषांची चरित्रे वाचली जावीत आणि तरुण पिढीच्या मनात त्यांच्याविषयी आस्था निर्माण व्हावी यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवतात? ‘ते पाच पुतळे’ या कवितेत कवी कुसुमाग्रज यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांचे रुदन मांडले आहे. महापुरुषांची वाटणी केली म्हणून ते पाचही पुतळे आपसात बोलताना टिपे गाळतात असे कवी म्हणतात. त्यातील मर्म राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि लोकही लक्षात घेतील का? 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com