ज्योत से ज्योत जगाते चलो..

ज्योत से ज्योत जगाते चलो..

भारताचे आर्युमान वाढत आहे. एका सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार भारतात सरासरी आर्युमान सत्तर वर्षे आहे. त्यानुसार ज्येष्ठांची संख्याही वाढत आहे. युनिसेफने या मुद्यावर सर्वेक्षण केले होते. त्यानुसार 2011 मध्ये भारतातील ज्येष्ठांची संख्या साधारणत: साडेदहा कोटी होती. 2050 मध्ये हा आकडा तीस कोटींवर पोहोचेल असा निष्कर्ष युनिसेफच्या अहवालात नमूद आहे. वाढत्या आर्युमानानुसार ज्येष्ठांना सामाजिक, आर्थिक आणि शारीरीक समस्या जाणवतात. दिवसेदिवस त्यात वाढ होते. त्या समस्यांच्या निराकरणासाठी राज्य शासनाचे ज्येष्ठ नागरिक धोरण आहे. शिवाय  त्यांच्यासाठी अनेक सरकारी कल्याणकारी योजना देखील आहेत. तथापि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाईला ज्येष्ठांच्या योजनाही अपवाद असू शकतील का? निराधार ज्येष्ठांची वाढती संख्या ही मोठीच समस्या आहे. त्याची विविध कारणे सांगितली जातात. जन्मदात्या पालकांना मारहारण केल्याच्या, त्यांना सोडून दिल्याच्या घटना वाढत आहेत. माध्यमातही त्या अधूनमधून प्रसिद्ध होतात. तीर्थक्षेत्री हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडताना आढळतो. आईवडिलांना देवदर्शनसाठी घेऊन जायचे आणि काहीतरी कारण सांगून तिथेच त्यांना सोडून जायचे. तीर्थस्थळी सोडून दिलेल्या पालकांना त्यांचे घर शोधून देण्याचा विशेष उपक्रम काही सामाजिक संस्था राबवतात. तथापि काही ज्येेष्ठांना त्यांच्या स्मृती दगा देतात. काहींना कोणीच नातेवाईक नसतात. आर्थिक आधारही अभावानेच आढळतो. वाढत्या वयानुसार शारिरीक व्याधी घेरतात. शरीर थकल्याने कोणतेही काम होत नाही. अशांकडे दुदैर्वाने रस्त्यावर राहाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पोट भरण्यासाठी दिवसभर भीक मागणे आणि रात्री मिळेल तिथे निवारा शोधणे हाच अनेकांचा दिनक्रम आढळतो. निराधार ज्येष्ठांसाठी सामाजिक काम करणार्‍या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांचेही तसेच निरीक्षण आहे. त्यांची अडचण अंबेजोगाई परिसरातील एका सामाजिक संस्थेने लक्षात घेऊन एक उपक्रम सुरु केला आहे. वयाची पासष्टी ओलांडलेल्या निराधार ज्येष्ठांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्याचा प्रयत्न संस्था करते. संस्थेकडून बीडसह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात स्वयंपाकघरे चालवली जातात. ज्या ठिकाणी निराधार ज्येष्ठांना दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. याची सुरुवात पाच गावातील स्वयंपाकघराने झाली. आता या योजनेत सहभागी झालेल्या गावांची संख्या 64 वर आणि  स्वयंपाकघरांची संख्या 36 वर गेली आहे. आगामी काळात किमान 65 ठिकाणी स्वयंपाकघरे सुरु करण्याचा मानस संस्थेच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांकडे व्यक्त केला आहे. एका संस्थेने निराधारांच्या जेवणाची समस्या सोडवली. त्यामागचे मर्म सामाजिक संस्थांनी लक्षात घ्यायला हवे. ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्याही गंभीर असतात. एकटेपणा अनेकांच्या वाट्याला येतो. त्यावरही काम करता येऊ शकते. कवी मंगेश पाडगावकर एका कवितेत म्हणतात,
अलीकडे एकटेच पाहतात दूर
दुखावल्या पाखरांचा ऐकू येतो सूर
नको नको तेच त्यांना घेरतात भास..
निराधार ज्येष्ठांच्या आयुष्याच्या अशा उदास संध्याकाळी थोडातरी प्रकाश पेरणार्‍या उपक्रमांची व्यापकता ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ या उक्तीप्रमाणे वाढतच जायला हवी. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com