एकच ठावे मजला, प्रकाश द्यावा सकलांना!

jalgaon-digital
3 Min Read

मानवता,(Humanity) माणुसकी हे माणसाचे जीवन सुंदर करणारे शाश्वत मूल्य आहे. तोच माणसाचा खरा धर्म (Religion) आहे. कवी निरज (Poet Niraj) म्हणतात, बस यही अपराध मैं हर बार करता हूँ..आदमी हूँ आदमीसे प्यार करता हॅूं..याची अनुभुती माणसे घेत असतात. माणसेच माणुसकीचा आविष्कार(The invention of humanity) घडवत असतात.

नाशिकमधील भालेराव कुटुंबाकडे एक माळी काम करतात. आदिवासी पाड्यावर राहाणारा त्यांचा नातेवाईक मुलगाही एक दिवस त्यांच्यासोबत आला. धावपटू होण्याचे त्या मुलाचे स्वप्न होते. त्या कुटुंबातील सदस्यांनी त्या मुलाला दत्तक घेतले. उत्कृष्ट धावपटू होण्यासाठी सगळे प्रयत्न केले. त्या मुलानेही नंतर अनेक मैदाने गाजवली. चांगला धावपटू म्हणून तो नावारुपाला आला. धुळ्यातील बोर्हाडे दांपत्य रस्त्यावर सापडलेल्या अनाथ बालकांचा सांभाळ आणि त्यांचे पुनर्वसन करते. 2004 पासून हे काम अव्याहत सुरु आहे. मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्यावर मिळणारी सेवानिवृत्तीची पुंजीही त्यांनी याच कामासाठी उपयोगात आणली. बोर्हाडे यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतरही कुटुंबियांनी ते काम पुढे सुरुच आहे. तुरुंगातील सगळेच कैदी सराईत गुन्हेगार नसतात.

अनेकादा काही जणांकडून कळत-नकळत गुन्हा घडून जातो आणि त्याची शिक्षा त्याला भोगावी लागते. शिक्षा भोगून तुुरुंगातून बाहेर आलेल्या व्यक्तीकडे समाज दुषित नजरेने बघतो. गुन्हेगाराचा शिक्का सहज पुसला जात नाही. कैद्यांचे आणि तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाचे काम दादर येथील रामचंद्र प्रतिष्ठानने हाती घेतले आहे. कैद्यांना समाजात सन्मानाने उभे राहाता यासाठी प्रतिष्ठानतर्फे अनेक उप्रकम राबवले जातात. अनेक वर्षांपासून हे काम सुरु आहे. पनवेल येथे एक वृद्धाश्रम आहे.

तो योजना घरत यांनी सुरु केला आहे. योजना यांना त्यांचा उमेदीचा काळ अनाथाश्रमात घालवावा लागला. अनाथपणाचे चटके सहन केलेल्या योजना यांनी आता स्वत:ला पुर्णवेळ या आश्रमाला वाहून दिले आहे. त्यांच्या या कामाची सुरुवात पालघर येथून झाली. पालघरचा वृद्धाश्रम आता स्थानिक गावकरी सांभाळत आहेत हे विशेष. ज्यांनी गरजू माणसांना मदतीचा हात दिला तीही सामान्य माणसेच आहेत. समाजातील वातावरण गढुळले आहे. करोना साथीमुळे सुरुवातीच्या काळात थांबलेले समाजजीवन अजुनही पुर्वपदावर आलेले नाही. तथापि जिथे जिथे माणसांचे दैनंदिन जगणे वेदनामय होते तिथे तिथे मदतीचे असंख्य हात पुढे येतात याची ही काही उदाहरणे.

अंधार फार झाला तर अंधारात वाट दाखवणारी पणती माणसे जपून ठेवतात. मिणमिणत्या पणत्यांची बरोबरी सुर्यप्रकाशाशी होणार नाही. करता येणार नाही. तथापि आपापल्या ठिकाणी त्या पणतीचे महत्व नाकारता येणार नाही. अंधाराला उजळवण्याचे काम त्याही आपापल्या परीने करतच असतात. ‘एकच ठावे मजला, प्रकाश द्यावा सकलांना’ असे पणतीचे वर्णन कवी वि.म.कुलकर्णी यांनी एका कवितेत केले आहे.

मानवता धर्माची ज्योत पेटवणार्या पणत्यांची संख्या जसजशी वाढत जाईल त्याप्रमाणात भारतीय संस्कृतीची उदात्तता व सहिष्णूता जगाला प्रभावित करु शकेल. सामान्यातील अशा असामान्यांचे कार्य इतरांना प्रेरणा देणारे आहे. सामान्य माणसे आपापल्या परीने वंचितांना सहकार्याचा हात पुढे करतील अशी आशा आणि अपेक्षा वर वर्णन केलेल्या उदाहरणांवरुन वाढू लागते. सर्वसामान्य समाज या कसोटीला नक्की उतरेल व माणुसकीचे कवडसे अधिक तेजाने झगमगतांना दिसतील का?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *