नीटनेटकेपणाचा केवळ तात्पुरता देखावा पुरेसा?

नीटनेटकेपणाचा केवळ तात्पुरता देखावा पुरेसा?

एखादे मंत्रीमहोदय (Minister) अथवा बडे बाबू भेट (visit) द्यायला येणार असल्यास त्याची वर्दी सरकारी कार्यालये आणि संस्थांना काही दिवस आधीच मिळालेली असते. त्यांच्या आगत-स्वागताची (Welcome) जय्यत तयारी सुरू होते. हातातील कामे बाजूला ठेवली जातात. कार्यालय अथवा इमारत देखणी करायला वेग येतो. पाहुण्यांच्या सरबराईसाठी खाण्या-पिण्याचा मेनूही (पाहुण्यांशी सल्लामसलत करून) ठरवला जातो. सध्या महत्त्वाचे काम सुरू आहे, अशी तंबी देऊन आमजनतेला कटवले जाते.

बडे बाबू संतुष्ट व्हावेत हेच सर्वांचे एकमेव उद्दिष्ट असते. बडे बाबूंनी कार्यालयात एकदा का पायधूळ झाडली की पुढच्या भेटीपर्यंत मनमानी करायला आपण मोकळे; याची सर्व संबंधित अधिकारी आणि सेवकांना खात्री असते. ताजे उदाहरण म्हणजे रेल्वेच्या बड्या बाबूंही मनमाड स्थानकाला नुकतीच दिलेली भेट!

मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. साहजिकच या स्थानकाकडे रेल्वेचे विशेष लक्ष असते. अनेक अधिकार्यांच्या येथे वेळोवेळी भेटी होतात. भुसावळ विभाग व्यवस्थापकांनी पूर्वनियोजित दौर्यानुसार मनमाड स्थानकाची पाहणी केली. विविध विभागांना भेटी दिल्या. प्रवासी प्रतिनिधींशी संवाद साधला.

गाड्यांची स्थिती, फलाटांवरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदीबाबत मते जाणून घेतली. स्थानक परिसरातील विकासकामांची पाहणी केली. प्रवाशांच्या अडचणी दूर करण्याबाबत स्थानिक रेल्वे अधिकारी आणि सेवकांशी चर्चा केली. व्यवस्थापक येणार म्हणून रेल्वेस्थानक झाडून-पुसून लख्ख करण्यात आले होते.

सर्वच फलाट चकाचक दिसत होते. स्वच्छता पाहून प्रवासी चकित झाले. बडे बाबूचा दौरा आटोपला. त्यांची पाठ वळल्यानंतर मनमाड स्थानकाला नेहमीसारखी अवकळा प्राप्त झाली. त्याचे सर्वांना आश्चर्य वाटले. मनमाड स्थानक सदैव स्वच्छ आणि चकाचक राहावे म्हणून रेल्वे व्यवस्थापकांसह इतर वरिष्ठ अधिकार्यांनी येथे नेहमी भेटी दिल्या पाहिजेत, अशा प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटल्या.

केवळ मनमाड स्थानकाबाबतच असे घडले वा घडते असे नव्हे! सगळ्याच सरकारी कचेर्‍यांची परिस्थिती ‘कुठेही जा, पळसाला पाने तीनच’ अशीच असते. विधिमंडळाच्या काही समित्यांचा नाशिक जिल्हा दौरा अलीकडेच झाला. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा अनेक ठिकाणी समित्यांनी भेटी दिल्या. पदाधिकारी आणि अधिकार्यांसोबत बैठकाही घेतल्या.

आपल्याकडील उणिवा, कमतरता वा अकार्यक्षमता समिती सदस्यांना जाणवणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. तरीही काही समिती सदस्यांनी उणिवा शोधून अधिकार्यांना चार शब्द सुनावण्याची संधी साधलीच. वेगवेगळ्या कारणाने मंत्र्यांचे दौरे सर्वत्र होतात. मुख्यमंत्र्यांचा दौरा असेल तर सर्वच खाती विशेष काळजी घेतात. ज्या मार्गांवरून मुख्यमंत्री ये-जा करणार असतील त्या रस्त्यांची डागडुजी केली जाते.

खडी-डांबराचा नवा थर चढवून रस्ते चकचकीत केले जातात. भलेही परिसरातील इतर रस्त्यांवर कितीही खड्डे पडोत; त्याची पर्वा करतो कोण? हसतमुखाने स्वागतासाठी अधिकार्यांचा ताफा कडक इस्त्रीच्या कपड्यांत सज्ज असतो. गणवेशाची पर्वा न करणारे सेवकसुद्धा गणवेशात वावरतात. हा सर्व जामानिमा आपल्या भेटीच्या काळापुरता तात्पुरता आहे हे वरिष्ठांनाही सहसा माहीत असते.

अशीच बनवाबनवी करीत त्यांनीही पदोन्नती मिळवलेली असते. ब्रिटीश राजवटीत गोर्या साहेबांचा मोठा दरारा होता. स्वातंत्र्योत्तर काळात आता काळ्या साहेबांचा रुबाब त्याहून वरचढ झाला आहे. विशिष्ट प्रसंग निभावून नेण्यापुरता देखावा वा नीटनेटकेपणाची नाटके करण्याची वेळ अधिकार्यांवर का यावी? प्रामाणिकपणे कामे न करता नीटनेटकेपणाचा केवळ देखावा किती पुरेसा? घरच्या रोजच्या व्यवस्थेत फारसा बदल न करतासुद्धा पाहुण्यांना नीटनेटकेपणा लक्षात येतो. सरकारी कचेरीचे मात्र तसे नसते.

केवळ पाहुणे येतील त्यावेळेपुरतीच साफसफाई केली जाते. पाहुणे जाताच ‘ये रे माझ्या मागल्या’ खाक्या सुरू होतो. काळ्या साहेबांसाठी नीटनेटकेपणाचे नाटक असेच किती काळ पुढे चालणार?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com