Thursday, May 2, 2024
Homeअग्रलेखदेवी यांचा समयोचित सल्ला

देवी यांचा समयोचित सल्ला

देवी यांचा समयोचित सल्ला

तरुण मुला-मुलींनी एकत्र यावे. सामाजिक प्रश्‍न, इतिहास आणि साहित्य अशा विविध मुद्यांवर चर्चा करावी. तरुणांनी जातीधर्माच्या पलीकडे बघणारा समाज निर्माण करावा’ असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केले. छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. ‘आम्हालाही जातीपातीचा विचार न करता लग्न करावेसे वाटते. तथापि आमच्या पालकांना कोणी समजावयाचे?’ असा प्रश्‍न एका शिबिरार्थीने विचारला. त्यावर आपली अपत्ये सुखात राहावीत असेच पालकांना वाटते. तथापि कौटुंबिक व सामाजिक दबावाखाली पालक तसे वागतात. त्यांना दुखवू नका. त्यांच्याशी सतत संवाद साधा. आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करा, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला. आजपर्यंत अनेक विचारवंतांनी जातीधर्मातील भेदाभेदांवर प्रहार केले आहेत. या मुद्यांवरून समाजाला विघटनाच्या वाटेवर नेऊ नये असे आवाहन केले आहे. तथापि हा मुद्दा प्रत्येक जण आपापाल्या सोयीनुसार स्वीकारतो व त्याच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी सोयीने वापर करतो हे समाजाचे दुर्दैव आहे. व्यासपीठावरून जातीधर्मातील भेदाभेदांच्या विरोधात बेंबीच्या देठापासून बोलले जात असताना व्यासपीठामागे मात्र जातीय राजकारणाचीच गणिते मांडली जातात हे जनतेला नव्याने सांगण्याची आवश्यकता आहे का? जातीभेदावर बोलणार्‍या लोकांच्या वागण्यात व बोलण्यात तफावत असते आणि ती जनता अनुभवते. त्यामुळे या मुद्यावर पोटतिडीकेने बोलणार्‍यांपैकी कोण खरे बोलतो याविषयी जनतेत संभ्रम निर्माण व्हावा अशीच सध्याची स्थिती आहे. जातीभेदाच्या मुद्यांवरच राजकारणातील आसन बळकट होते, असा भ्रम नेते म्हणवणार्‍यांकडून जाणीवपूर्वक जोपासला जात आहे. त्यामुळे समाजातील जातीधर्म भेद खरेच संपुष्टात यावेत असा आग्रह समाजातील विचारवंत धरीत असले तरी जातीधर्मातील भेद, अनिष्ट रुढी-परंपरा, अंधश्रद्धा यामुळे समाजाची किती अधोगती होत आहे हे योग्यरितीने समाजाला सांगू शकेल, असा नैतिक अधिकार असणार्‍या नेतृत्वाचीच सध्या उणीव आहे. कारण सर्वांचेच पाय भेदाभेदाच्या राजकारणाने बरबटलेले आहेत. शिवाय सध्या या मुद्यांवर बोलणे धारिष्ट्याचे झाले आहे. जे बोलतील त्यांच्या बोलण्याचे अनेक अर्थ काढले जाऊन त्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जात आहे. बोलणार्‍यांचा आवाज कायमचा बंद करण्यापर्यंत कट्टरतावाद्यांची मजल गेली आहे. तरीही अंतिमत: समाजाच्या भल्यासाठी कोणीतरी निर्भिडपणे समाजाचे प्रबोधन करीत राहिले पाहिजे याची जाणीव देवींसारख्या विचारवंतांना आहे हे या समाजाचे सुदैव आहे. डॉ. देवींनी भाषा, आदिवासी अशा अनेक क्षेत्रांत प्रचंड काम केले आहे. समाजाला सल्ला देण्याचा त्यांना अधिकार आहे. ‘ट्रोल’भैरवांचे लक्ष्य होण्याची भीती न बाळगता त्यांनी तो बजावला हे त्यांचे धैर्य कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.

केल्याने होत आहे रे…!

रस्ते आणि खड्डे ही समस्या जनतेच्या पाचवीलाच पुजली आहे. फक्त याच नव्हे तर अशा अनेक समस्यांनी जनता त्रस्त आहे. तथापि समस्यांवर बोलून काही उपयोग होत नाही. राज्यात कोणाचीही सत्ता आली तरी जनतेच्या परिस्थितीत काहीच फरक पडत नाही, अशा निराशावादाने समाजाला ग्रासले आहे. ‘बोलणार्‍याचे कुळीथ विकले जातात, पण न बोलणार्‍याचे गहूही कोणी घेत नाही’ ही म्हण सर्वपरिचित आहे. तोच अनुभव कोणत्याही नेत्यांच्या बाबतीत जनतेला मिळत आहे. डॉ. गणेश देवींसारखे विचारवंत मात्र त्या म्हणीचा खरा अर्थ लक्षात घेऊन समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करीत आहेत. केरळमधील एका छोट्या विद्यार्थ्यानेही रस्त्यातील खड्ड्यांविरुद्ध आपल्या पद्धतीने आवाज उठवला आहे. हा विद्यार्थी तिसरीत शिकतो. त्याला ज्या मार्गावरून रोज शाळेत जावे लागते त्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. तो रस्ता दुरूस्त करण्याचे साकडे त्याने थेट केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना पत्राद्वारे घातले आहे. ‘मी शाळेत जातो त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खूप खड्डे पडले आहेत. मी, माझा मोठा भाऊ आणि बहीण अशा तिघांनाही याच रस्त्याने शाळेत जावे लागते. दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. चाक खड्ड्यात जाऊन रिक्षा एका बाजूला झुकल्यावर आम्हाला रिक्षातून खाली पडण्याची भीती वाटते. जज काका, तुम्ही यात लक्ष घाला आणि हा रस्ता ठीक करण्याचा आदेश द्या; म्हणजे आम्हाला कोणत्याही भीतीशिवाय शाळेत जाता येईल’ असे त्या पत्रात म्हटले आहे. जनतेच्या समस्यांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी संबंधितांच्या संवेदनशीलतेची गरज असते. सध्या संवेदनशीलता ही अतिदुर्मिळ बाब बनली आहे. तथापि काही संवेदनशील व्यक्ती अजूनही जागोजागी आढळतात. केरळच्या न्यायाधिशांनी ती विरळा संवेदनशीलता दाखवली आहे. छोट्या बालकांनी नजरेस आणलेल्या समस्येची त्वरित दखल घेतली. संबंधित महापालिकेला रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले. पंधरा जानेवारीपर्यंत काय काम झाले याचा अहवाल देण्यासही पालिकेला बजावले आहे. समाज विविध समस्यांनी त्रस्त आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघातांची व त्यात बळी जाणार्‍यांची संख्या सगळीकडेच वाढत आहे. महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे, स्वस्त धान्य दुकानांत नेहमी धान्य मिळेलच याची खात्री नाही, सरकारच्या ‘ई’ कारभाराचा डंका पिटला जातो, पण किरकोळ कामासाठीही जनतेने चकरा माराव्यात ही सरकारी सेवकांची वृत्ती कणभरही कमी झालेली नाही, अनेक ठिकाणी नळाला पाणी पुरेशा दाबाने येत नाही. ही काही दैनंदिन जीवनातील उदाहरणे! सेवेची हमी देणारे लोकप्रतिनिधी वेगळेच सांगतात. आम्हाला कोणी काम सांगतच नाही. मग कसे समजणार? हातावर हात धरून बसण्याने समस्या कशा सुटणार? कोणीतरी प्रयत्न केल्यास मार्ग निघतो हे केरळच्या विद्यार्थ्यानेसुद्धा करून दाखवले, पण समाज अशा

- Advertisement -

उदाहरणांकडे किती लक्ष देतो?

- Advertisment -

ताज्या बातम्या