जीवावर बेतणारा उत्साह टाळलेलाच बरा!

जीवावर बेतणारा उत्साह टाळलेलाच बरा!

गेले चौदा-पंधरा महिने माणसे करोनाच्या साथीमुळे घरात बसून आहेत. त्याबद्दल सरकारने घातलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले आहेत. तथापि माणसांच्या घराबाहेर पडण्यावर मात्र अजूनही वेळेचे निर्बंध कायम आहेत. माणूस समाजशील आहे. त्याला सोबत, सहवास आणि एकमेकांच्या प्रेमाची उब हवी असते. ’समाजात मिसळणे, एकमेकांत संवाद होत राहाणे ही माणसाच्या भावनिक जीवनाची गरज आहे’ असे एका तत्ववेत्याने म्हंटले आहे.

गेले दीड वर्ष या भावनांचा पूर्ण कोंडमारा झाला आहे. माणसे एकटी घरात बसून केवळ एकांतवासच नव्हे तर अज्ञातवासही भोगत आहेत. त्यामुळे करोनाचे निर्बंध काही प्रमाणात सैल होताच माणसे मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागली आहेत. कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळींबरोबर फिरायला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पावसाळी पर्यटनाचे दिवस आहेत. पावसाने हजेरी लावल्याने निसर्ग फुलला आहे. ओढे, नद्या आणि धबधबे वाहू लागले आहेत. त्याचा आनंद घेण्यासाठी माणसे तिकडे धाव घेत आहेत. पर्यटन बहरले आहे. पण हा अतिउत्साह काहींच्या जीवावर बेतत आहे.

गेल्या 2-3 दिवसात काहींच्या उतावळेपणामुळे जीव गमावल्याच्या काही घटना उघडकीस आल्या. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये नाशिकमधील तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नागपूरमधील चार मित्र वाकी येथे सहलीला गेले होते. तेथील एका नदीपात्रात पोहायला उतरले. तथापि पाण्याचा आणि नदीपात्रातील खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही बुडाले. नागपूरमधीलच दोन तरुणांना रामटेकमधील अंबाडा तलावात जलसमाधी मिळाली. एक कुटुंब छिंतवाडा येथील धबधबा पाहाण्यास गेले होते.

पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते सगळे त्या ठिकाणी अडकले. अथक प्रयत्न केल्यावर त्यांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले. नेहमीच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी माणसे फिरायला जातात. तथापि अती उत्साहामुळे त्याची किंमत जीव देऊन मोजावी लागत असेल तर? साधे साधे निर्बंध पाळून देखील सहलीचा आनंद घेता येतो. पर्यटनस्थळ ओळखीचे असते असे नव्हे. अशा अपरिचित जागी निसर्गाला आव्हान देणारे अनाठायी धाडस दाखवू नये. अती खोल पाण्यात जाणे टाळावे. धबधब्यांचा दुरूनच आनंद घ्यावा. निसर्गाचा आदर राखावा.

जीवावर बेतेल असा बालसुलभ उतावळेपणा जाणत्यांनी टाळावा. फिरायला जातांना कुठे जात आहोत ते घरी सांगून जावे. या साध्या साध्या गोष्टी पाळणे अवघड आहे का? तरुणाई इतकी बेभान कशी होते? पर्यटनस्थळी एखादा प्रसंग निर्माण झाला तर मदत मिळेलच याची खात्री कोण देणार? कित्येकदा बुडणार्‍या मित्राला वाचवण्याच्या चांगल्या हेतूने अनोळखी ठिकाणी जीव पणाला लावला जातो. काही वेळा ते धाडस एकाऐवजी दोघांचे जीव संपवते. भानावर येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते.अशा किती घटना घडाव्यात? चौदा-पंधरा महिने घरात बसून राहावे लागले म्हणून माणसे जीवाला इतकी वैतागू शकतात का? नको तिथे उत्साह परवडणारा नाही याची खूणगाठ माणसांनी मारलेली बरी. माणूस आशावादी आहे.

समाजजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. करोनाची साथही आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. निर्बंध सैल करण्याचा तोच हेतू लक्षात घेतला जाऊ नये का? सक्तीने घरात बसावे लागणे लवकरच संपणार आहे. त्यामुळे कधी नव्हे तो मोकळेपणा आणि स्वातंत्र्य मिळाल्यासारखे बेछूट वर्तन योग्य नाही. जीवावर बेतणारा अती उत्साह टाळणे सर्वांच्याच हिताचे आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com