Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखजागतिक दिवस हे केवळ सोपस्कारच का?

जागतिक दिवस हे केवळ सोपस्कारच का?

काल सर्वत्र जागतिक महिला दिवस साजरा झाला. 1910 साली पहिला जागतिक महिला दिवस साजरा केला गेला. या दिवसाला महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याची पार्श्वभूमी आहे. लढ्याचे स्वरूप बदलले आहे पण महिलांसंदर्भात तेव्हापासून सुरु झालेली बदलाची प्रक्रिया आजही सुरूच आहे.

हा दिवस साजरा करतांना त्या लढ्याची दखल घेऊन महिलांच्या समस्यांवर चर्चा होणे आणि बदलासाठी धडपडणार्‍या महिलांना पाठबळ देणे अपेक्षित आहे. पण तसे घडते का? हा दिवस साजरा होणे ही औपचारिक बाब बनली आहे का? किंबहुना महिला दिवस हा काहीसा चेष्टेचा विषय बनला आहे का? हा दिवस साजरा करण्याचा उद्देश मागे पडल्याने असे झाले असावे का? वर्षानुवर्षे हा दिवस साजरा करून काय साध्य करायचे आहे याचा विसर पडला असावा का? त्यामुळेच या दिवसाला काहीसे उत्सवी आणि व्हास्टअप स्वरूप आले आहे. स्वतःचे पुढारलेपण मिरवण्यासाठीही अनेक जण हा दिवस साजरा करतांना आढळतात.

- Advertisement -

या दिवसाच्या निमित्ताने महिलांना पुरस्कार देण्याचे जणू काही पेवच फुटते. एक दिवस महिलांचा उदोउदो केला की वर्षाचे उर्वरित दिवस त्यांच्याशी कसेही वागायची मोकळीक मिळते असाच सर्वांचा समज झाला असावा का? समाजाच्या दुट्टपी दृष्टिकोनाला महिला दिवसही अपवाद नाही. महिलांचे समाजातील दुय्यम स्थान, त्यांना पाळाव्या लागणार्‍याअनिष्ट रूढी आणि परंपरा, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना गृहीत धरले जाणे, घरातील कोणत्याही निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग नसणे अशा अनेक मुद्यांवर महिलांची लढाई सुरूच आहे. कोणताही बदल सोपा व सहज नसतो. विशेषकरून महिलांसंदर्भतील कोणत्याही बदल लगेच स्वीकारला जात नाही. त्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करण्याची महिलांची तयारी आहे की नाही यावर त्या बदलाची स्वीकारार्हता ठरते. महिला दिवसाच्या निमित्ताने अशा अनेक संघर्षगाथा समाजापर्यंत पोचतात हे मात्र खरे. समाजातील रूढी आणि परंपरांशी लढणे अजिबातच सोपे नाही. असे प्रयत्न करणारांना सामाजिक बहिष्कार, मानसिक कुचंबणा व प्रसंगी शारीरिक अत्याचार अशा अनेक कठीण आव्हानांचा सामना करावा लागतो. छोट्या छोट्या बदलासाठी देखील अनेक महिलांना आपले आयुष्य घालवावे लागले आहे. झारखंडमधील छूटनीदेवीला तिच्या गावाने चेटकीण ठरवून बहिष्कृत केले.

जातपंचायतीने आर्थिक दंड केला. तो भरला तरीही त्रास देणे सुरूच राहिले. छूटनीदेवीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला. पण ती डगमगली नाही. महिलांना चेटकीण ठरवणार्‍या प्रथेविरुद्ध तिने लढा सुरु केला. तो आजतागायत सुरूच आहे. त्यासाठी संस्था स्थापन केली. गावाने चेटकीण ठरवलेल्या 62पेक्षा जास्त महिलांना तुला संस्थेमार्फत या जाचातून मुक्त केले आहे. सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क मिळवून दिला आहे.

छूटनीदेवी यांना याचवर्षी ‘पदमश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिलांच्या डोक्यातील जट ही गुंतागुंतीची समस्या आहे. डोक्यात जट झालेल्या मुलीला किंवा महिलेला देवदासी बनवण्याची परंपरा पाळली जाताना आजही आढळते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन नंदिनी जाधव यांनी त्याविरुद्ध काम सुरु केले. त्यांनी आतापर्यंत 175 पेक्षा जास्त महिलांना जटमुक्त केले आहे.

हक्कांसाठी लढणा महिलांची अशी अनेक उदाहरणे आढळतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अशा लढ्यांचा आढावा घेतला जातो का? समाजातील अनेक कुप्रथा आणि अनिष्ट परंपरा नष्ट व्हाव्यात या दृष्टीने या दिवसाचा उपयोग करून घेतला जाईल का? बदलांची सुरुवात स्वतःपासून सुरु करायला हवी हे महिलांना आणि महिलांच्या लढ्यामागे पाठबळ उभे करण्यात समाजाचेही हित आहे याचे भान लोकांना ज्या दिवशी येईल त्या दिवशी खर्‍या अर्थाने जागतिक महिला दिवस साजरा करण्याचा उद्देश साध्य होईल. अन्यथा हा दिवस साजरा करण्याचा औपचारिक सोपस्कार वर्षानुवर्षे सुरूच राहील. खरे तर हा अग्रलेख महिला दिनाच्या निमित्ताने तयार केला होता. तथापि ते कदाचित औचित्याला धरून होणार नाही म्हणून आज हा अग्रलेख आज देत आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या