Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखटोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे लखलखते यश

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे लखलखते यश

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची सुरूवात भारतासाठी आश्वासक ठरली. भारतीय खेळाडूंपुरता शेवटचा ठरलेला परवाचा दिवसदेखील लखलखते सुवर्ण यश देऊन गेला. अमेरिका, चीन, जपान आदी देशांचा स्पर्धेत नेहमीसारखा दबदबा दिसला. सुवर्णांसह भरपूर पदकांची लयलूट त्यांनी केली. भारताने टोकियो ऑलिम्पिकच्या पदक-तालिकेत एका सुवर्णासह सात पदके जिंकली. ही संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी असली तरी भारतीय खेळाडूंची जिगरबाज खेळी अतुलनीय आणि ऐतिहासिक ठरली.

दिवसेंदिवस खेळांच्या बाबतीत भारत उत्तम प्रगती करीत आहे याची कल्पना यावरून येते. म्हणूनच खेळाडूंनी मायभूमीला मिळवून दिलेले एकेक पदक अनमोल आहे. सव्वा दोनशेहून जास्त देशांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग्य आजमावले. भारताचा सव्वाशे खेळाडूंचा चमू स्पर्धेत उतरला होता. ऑलिम्पिक प्रवासात भारताने यंदा प्रथमच दमदार कामगिरी केली. नीरज चोप्रा, मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू, लव्हलिना बोर्गोहेन, रविकुमार दहिया, बजरंग पुनिया यांची विविध खेळांतील कामगिरी आणि यशाने भारताच्या अपेक्षा उंचावत आहेत. पुरुष आणि महिला हॉकी संघांची कामगिरीसुद्धा ऐतिहासिक ठरली.

- Advertisement -

प्रत्येक भारतीय खेळाडूने पदक जिंकण्याच्या ईर्षेनेच झुंजार आणि बहारदार खेळाचे प्रदर्शन केले. सर्वच खेळाडूंना पदके जिंकता आली नाहीत. काहींच्या हातून पदके थोडक्यात निसटली. मात्र पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचा त्यांचा निर्धार मात्र त्यामुळे दुणावला असेल. मात्र स्पर्धेत खेळताना त्यांनी दाखवलेली जिद्द दुर्लक्षिण्याजोगी नाही. मीराबाई चानूने भारोत्तोलनात रौप्य पटकावून भारताला पहिले पदक मिळवून दिले. सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य, लव्हलिनाने बॉक्सिंगमध्ये कांस्य, दहियाने कुस्तीत रौप्य तर पुनियाने फ्री-स्टाईलमध्ये कांस्य जिंकले. नीरज चोप्राने सर्वांच्या यशावर सुवर्णकळस चढवला. भालाफेक स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

अ‍ॅथेलिटिक्समध्ये भारताला मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक आहे. पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. पंतप्रधानांसह खेळाडूंच्या गृहराज्य सरकारांकडून खेळाडूंवर अभिनंदनाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. काही खेळाडूंना सरकारी नोकरीची आश्वासनेही मिळाली आहेत. ध्वनिचित्रफितीत पंतप्रधानांसोबतचा संवाद मात्र एकतर्फीच दिसला. पदकविजेत्यांचे कौतुक झालेच पाहिजे, पण स्पर्धेत सहभागी होऊन विविध खेळांत देशाचे प्रतिनिधीत्व करणार्या खेळाडूंचीसुद्धा उपेक्षा होऊ नये.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी सर्व भारतीय खेळाडूंना येत्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील मुख्य ध्वजारोहण सोहळ्यासाठी पंतप्रधानांनी निमंत्रित केले आहे. भारताच्या ऑलिम्पिकपटूंना एकत्र पाहण्याची संधी देशवासियांना त्यानिमित्त मिळेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंच्या पाठीवर केंद्र सरकारने कौतुकाची कोरडी थाप न मारता प्रत्येकाला प्रोत्साहनपर खास भरीव बक्षीस दिल्यास त्यांचा उत्साह नक्कीच दुणावेल. इतरांना देशासाठी खेळण्याची प्रेरणा मिळेल.

ऑलिम्पिकपटूंचे कोड-कौतुक सुरू असताना केंद्र सरकारने ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नामांतराचा तडकाफडकी निर्णय घेतला. मेजर ध्यानचंद यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार यापुढे ओळखला जाणार आहे. त्याचे देशभर वेगवेगळे पडसाद उमटले. क्रीडाप्रेमींसह आम नागरिकांनाही आश्चर्य वाटले.

खेलरत्न पुरस्काराच्या नावाशी छेडछाड करण्याऐवजी क्रीडा क्षेत्रासाठी मेजर ध्यानचंद यांच्या नावाने एखादा नवा पुरस्कार सुरू करणे किंवा एखाद्या स्टेडियमला त्यांचे नावे देणे समर्पक ठरले असते, अशी मत-मतांतरे आणि भावना जनसामान्यांकडून समाज माध्यमांवर व्यक्त होत आहेत. त्याची दखल घेतली जाईल का? खेलरत्न नामांतराचा खेळ अनेकांना क्लेशकारक वाटत असला तरी टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचे सोनेरी-रुपेरी यश मात्र उल्लेखनीय आहे. देशाची आणि क्रीडाप्रेमींची उमेद जागवणारे आहे. पदकविजेत्यांसह सहभागी सर्व भारतीय ऑलिम्पिकपटूंचे हार्दिक अभिनंदन!

- Advertisment -

ताज्या बातम्या