Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखभारताचा खणखणीत विजय!

भारताचा खणखणीत विजय!

इंग्लंडविरुद्धची कसोटी आणि पाठोपाठ वीस षटकी मालिका भारतात नुकतीच पार पडली. दोन्ही मालिकांतील सामने भारतीय संघ आणि इंग्लंड संघाने चुरशीने लढवले, पण मायभूमीवर भारतीय संघच उजवा ठरला.

आधी कसोटी मालिका 3-1 ने जिंकून भारताने कसोटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला. नुकतीच झालेली वीस षटकी मालिका कसोटी मालिकेइतकीच रंगतदार ठरली. चौथा सामना जिंकून भारताने मालिकेत 2-2 ने बरोबरी साधल्याने पाचव्या आणि अंतिम सामन्यात चुरस वाढली होती. युवा खेळाडूंचा जोश दोन्ही संघांत दिसला. परवा अंतिम सामना जिंकून भारताने 3-2 ने मालिका खिशात घातली. करोनाच्या अवकृपेमुळे प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश नसला तरी भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष घरोघरी साजरा झाला. नाणेफेक जिंकून भारताला लवकर गुंडाळण्याचे इंग्लंडचे मनसुबे भारतीय फलंदाजांनी उधळून लावले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 224 धावांचा डोंगर उभारला. चौकार-षटकारांची आतषबाजी यावेळी पाहायला मिळाली. सलामीवीर रोहित शर्मा, विराट कोहली यांची खणखणीत अर्धशतके तसेच सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने पाहुण्यांपुढे मोठे विजयी लक्ष्य ठेवले.

- Advertisement -

जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर लक्ष्य गाठण्याचा इंग्लंडचा प्रयत्न भारतीय गोलंदाजांनी उधळून लावला. इंग्लड संघ 188 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी 80 धावांची नाबाद खेळी केली. आधीच्या सामन्यांतील अपवाद वगळता विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरल्याने त्याला ङ्गमालिकावीरफ तर भुवनेश्वर कुमारला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले. दोन्ही मालिकांमध्ये भारताच्या युवा गोलंदाजांची कामगिरी भारतीय गोलंदाजीचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचीच ग्वाही देते. चौथ्या वीस षटकी सामन्यात सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतकी खेळी केली. 23 मार्चपासून पुण्यात सुरू होणार्ऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संधी देऊन निवड समितीने त्याला बक्षीस दिले आहे. कसोटीपाठोपाठ वीस षटकी मालिका जिंकल्याने भारतीय संघाचे मनोबल बरेच उंचावले आहे.

याउलट दोन्ही मालिका गमावल्याने इंग्लंड संघाची मन:स्थिती कशी असेल ते एकदिवसीय मालिकेत स्पष्ट होईल. पाहुणा संघ कशी कामगिरी बजावतो याची उत्सुकता क्रिकेट रसिकांनाही असेल. भारतीय क्रिकेट विश्वात प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. गुणी खेळाडू हेरण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीची गुणग्राहकता आधीच स्पष्ट झाली आहे. स्थानिक पातळीवर तसेच रणजी स्पर्धेत चमकणारे असे ‘हिरे’ शोधून ते भारतीय संघाच्या कोंदणात सजवले पाहिजेत. योग्य तो वाव देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी घडवले पाहिजे. असे झाले तर जागतिक क्रिकेट विश्वात भारताचा दबदबा भविष्यातही कायम राखता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या