भारताचा ‘अजिंक्य’ विक्रम!

भारताचा ‘अजिंक्य’ विक्रम!

मंगळवारचा दिवस भारतीय संघ आणि भारतीय क्रिकेटसाठी खर्‍या अर्थाने मंगलमय ठरला. ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात 328 धावांचे लक्ष्य गाठून भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघावर ऐतिहासिक विजय नोंदवला.

गाबा मैदानावर ‘अजिंक्य’ राहण्याचा यजमानांचा 32 वर्षांचा विक्रमही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मोडीत काढला. सामना जिकंण्यासोबतच कसोटी मालिका 2-1 ने खिशात घालून ‘बॉर्डर-गावस्कर चषका’वर भारताचे नाव कोरले. या विजयासोबतच जागतिक क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानाला पुन्हा गवसणी घालण्याचा बोनसही मिळवला. ऍडलेड मैदानावरील सलामीच्या सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला होता.

‘ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारताचे 0-4 असे पानिपत होईल’ अशी भाकिते यजमान देशातील दिग्गजांनी त्यावेळी वर्तवली होती. मात्र ती भाकिते उलट-सुलट करून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन भविष्यवेत्त्या ‘क्रिकेट पंडितां’चे दात त्यांच्या घश्यात ऑस्ट्रेलियातच घातले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला नववर्षात कन्यारत्नप्राप्ती झाली आहे. तो आनंद साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्यानंतर विराट रजेवर गेला. त्याच्या अनुपस्थितीत संघाची धुरा संघ व्यवस्थापनाने मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर विश्वासाने सोपवली. तो विश्वास अजिंक्यने सार्थ ठरवला. संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देऊन मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत पराभवाची धूळ चारणार्‍या भारतीय संघात चौथ्या सामन्यावेळी विराटसह इतर अनुभवी खेळाडू नव्हते. दुखापतीच्या ग्रहणामुळे अनुभवी खेळाडूंना मैदानाबाहेर बसावे लागले होते.

वीस षटकी वाटावा असाच हा संघ असताना प्रत्येक खेळाडूने अनुभवी खेळाडूंसारखी जबाबदार कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलिया संघासोबत खेळताना दडपण झुगारून नैसर्गिक, सावध आणि चपळ खेळाचे प्रदर्शन केले. भारताच्या युवा संघाला सहज गुंडाळू, अशा भ्रमात असलेल्या कांगारूंना याच युवा संघाने चांगला धडा शिकवला. निर्णायक सामन्यात अजिंक्यला ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, महंमद सिराज, शुभमन गिल, शार्दूल ठाकूर या युवा आणि कसोटी क्रिकेटमध्ये फारशा माहीत नसलेल्या नवख्या खेळाडूंनी जिगरबाजवृत्तीने भक्कम साथ दिली. कसोटीच्या क्षणी विचलित न होता ‘लक्ष्या’वर लक्ष केंद्रित केले.

फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी बजावली. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून जिंकला. दुसरा सामना भारतानेसुद्धा 8 गडी राखून जिंकत मुहतोड जवाब दिला व मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. तिसरी कसोटी अनिर्णित ठेवून सामना वाचवण्यात रहाणेचा युवा संघ यशस्वी ठरला. त्यामुळे चौथा सामना जिंकण्यासाठी यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारतीय संघात चुरस वाढली होती. दुसर्‍या सामन्यात विराटने संघाच्या विजयाचा पाया रचला. चौथ्या सामन्यात मराठमोळ्या अजिंक्यने ‘अजिंक्य’पदच गाठले.

भारतीय संघ, भारतीय क्रिकेट रसिक आणि अख्खा भारत डॉन ब्रॅडमॅनच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करीत आहे. तो जल्लोष इंग्लंडचा माजी खेळाडू केव्हिन पीटरसनच्या डोळ्यांत खुपत असावा. मविजयी जल्लोष जरूर साजरा करा, पण आमच्यापासून सावध राहाफ असा सूचक इशारा त्याने भारतीय संघाला दिला आहे. ‘कांगारूंना नमवले खरे, पण आता इंग्लंडला हरवून दाखवा’ असेच जणू आव्हान त्याने दिले आहे, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धची मोहीम फत्ते केल्यानंतर भारतीय संघ विराटच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध लवकरच कसोटी मालिका खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवून आत्मविश्वास द्विगुणित करणार्‍या उत्साहित आणि उल्हासित भारतीय संघाकडून अशाच दमदार कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना असणार हेही तितकेच खरे! खेळ म्हटला की त्यात हार-जीत होणारच! मात्र पराभवाची भीती न बाळगता वाघासारखी झुंजार कामगिरी करून कांगारूंच्या भूमीत भारताच्या तिरंगी विजयाचा डंका वाजवणार्‍या ‘अजिंक्य’ भारतीय संघाचे मन:पूर्वक अभिनंदन! आणि पुढच्या मोहिमांसाठी खूप सार्‍या शुभेच्छा!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com