Wednesday, April 24, 2024
Homeअग्रलेखपॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे सर्वोत्तम खेळ-प्रदर्शन

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे सर्वोत्तम खेळ-प्रदर्शन

आठवडाभरापूर्वीच राष्ट्रीय क्रीडादिन साजरा झाला. ‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिवस! भारतात खेळदिन साजरा होत असताना टोकियोत पॅरालिम्पिक स्पर्धा सुरू होती. स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांत सहभागी झालेल्या भारताच्या 54 खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. भारतीय संघाची पॅरालिम्पिक स्पर्धेची मोहीम यंदा चांगलीच यशस्वी ठरली आहे. गेल्या महिन्यात टोकियोतच ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उमदी कामगिरी करून इतिहास रचला. त्या यशापासून प्रेरणा घेऊन पॅरालिम्पिक स्पर्धेतदेखील त्यापेक्षा आकर्षक जिद्द आणि जोशाचे दर्शन भारतीय खेळाडूंनी क्रीडा जगताला घडवले. 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य अशा 19 पदकांची घसघशीत कमाई केली. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने 7 पदकांची लयलूट केली. तशीच चमकदार कामगिरी पुढे नेताना पॅरालिम्पिकमध्ये जवळपास तिप्पट पदके जिंकून भारतीय खेळाडूंनी यशाची कमान आणखी उंचावली.

- Advertisement -

स्पर्धेत भारताच्या यशाची सुरूवात रौप्यपदकाने करून अखेरचा दिवस सुवर्णपदक जिंकून गाजवला. कृष्णा नागरने बॅडमिंटनमध्ये हे यश मिळवले. त्याआधी सुहास यथिराजने बॅडमिंटनमध्येच रौप्यपदक पटकावले. 2016 सालच्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताने पदकांचा चौकार मारला होता. आताच्या चमकदार यशाने स्पर्धेच्या पदतालिकेत भारताने चोवीसावे स्थान पटकावले आहे.

अवनी लेखरा, सुमीत अंतिल, मनीष नरवाल, प्रमोद भागवत, कृष्णा नागर यांनी सुवर्ण; भाविना पटेल, निशाद कुमार, देवेंद्र झझारिया, सुहास यतिराज, मरियप्पम थांगावेलू, प्रवीण कुमार, योगेश काथुनिया, सिंगराज अधाना यांनी रौप्य तर मनोज सरकार, शरद कुमार, सुंदरसिंग गुजर, अवनी लेखरा, हरविंदर सिंग, सिंगराज अधाना यांनी कांस्यपदके जिंकली. अवनी आणि सिंगराज यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांत रौप्य आणि कांस्य अशी दोन-दोन पदके पटकावण्याचा पराक्रम गाजवला.

स्वरूप उन्हाळकर, संदीप चौधरी, सोमन राणा, नवदीप आणि तरुण धिल्लाँ यांची पदके थोडक्यात हुकली. अन्यथा भारताच्या खिशात आणखी 5 पदकांची भर हमखास पडली असती. भारताचे पदकविजेते आपापल्या यशावर खूश असले तरी अल्पसंतुष्ट मात्र नाहीत. त्यांची उमेद मोठी आहे. त्यांना यापुढे अधिक दणदणीत कामगिरी करायची आहे. ‘पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके मिळवली तरी मला इतक्या लवकर समाधान वाटणार नाही. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.

आपण जेथे कमी पडत आहोत त्यात आणखी प्रगती साधायची आहे’ असे मनोगत अवनी लेखराने व्यक्त केले. यशाची तिची भूक मोठी असल्याचेच यातून सूचित होते. अवनीने व्यक्त केलेल्या भावना व्यक्तिगत असल्या तरी स्पर्धेत खेळलेल्या सर्व भारतीय खेळाडूंचे ते प्रातिनिधीक मनोगत मानायला हवे. भारतीय क्रीडा विश्वाचे भवितव्य उज्ज्वल आहे, हा विश्वास ऑलिम्पिकपाठोपाठ पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या लखलखत्या दमदार यशाने दृढ होतो.

पदकविजेत्या खेळाडूंचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो, पण हल्ली मात्र खेळाडूंच्या कर्तबगारीवर बोळा फिरवण्याची हातचलाखी केली जात आहे. खेळाडूंच्या यशाचे तोंड भरून कौतुक झाले पाहिजे, पण तसे न होता त्यानिमित्ताने आपापली छबी झळकावून घेण्याची हौस भागवण्याचा नवा पायंडा नव्या भारतात रूजवला जात आहे. आपल्यामुळेच खेळाडू यशाचे धनी ठरू शकले, असा आभास निर्माण केला जातो. त्या मोहाला कुठेतरी मुरड घालण्याची आवश्यकता नजरेआड होऊ नये.

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदकसंख्येवरून भारताच्या दोन्ही संघांच्या यशाची तुलना करणे अनाठायी ठरेल. कारण त्या-त्या संघांचे स्पर्धेतील यश उल्लेखनीयच आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी बजावत देशासाठी पदकांची लयलूट करून स्पर्धा गाजवणारे सर्व भारतीय खेळाडू, त्यांना पाठबळ देणारे अधिकारी व सेवकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

- Advertisment -

ताज्या बातम्या