Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखभारताला हजारो ‘डिसलें’ची गरज!

भारताला हजारो ‘डिसलें’ची गरज!

’गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात, तशी विद्यार्थी मुले ज्याच्याभोवती गोळा होतात तोच खरा शिक्षक’ असे साने गुरुजी म्हणत. साने गुरुजी स्वतःच त्याचे उत्तम उदाहरण होते. ते मुलांचे आवडते शिक्षक होते.

त्यांचा हाच वारसा राज्यातील काही शिक्षक निष्ठेने पुढे चालवत आहेत. सोलापूरचे रणजितसिह डिसले हे त्यापैकीच एक. ते सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील परितेवाडी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांना ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सुमारे 7 कोटींचा पुरस्कार आहे. तो युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो. असा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शिक्षक आहेत. जगातील 140 देशातील 12 हजाराहून अधिक शिक्षकांचे या पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. विद्यार्थ्यांचे शिकणे सोपे व्हावे म्हणून डिसले शिक्षणात ‘क्यू आर’ कोड या प्रणालीचा वापर केला.

- Advertisement -

या प्रणालीमुळे ध्वनिफीती कविता, ध्वनिचित्रफिती , कथा आणि गृहपाठ राज्याच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात बसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोचू शकतो. या पुरस्कारासाठी त्यांच्या याच कामाची दखल घेण्यात आली. सध्या करोनाची साथ आणि टाळेबंदीमुळे शिक्षणक्षेत्रात कमालीची अस्थिरता व अस्वस्थता आहे. शाळा काही प्रमाणात सुरु झाल्या, पण महाविद्यालये मात्र सुरु झालेली नाहीत. डिसेंबर महिना सुरु झाला आहे. तरी अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरुच आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षांविषयी अनिश्चितता आहे.

खासगी शाळांमध्ये आणि क्लासेसमध्ये शिकवणारे अनेक शिक्षक बेरोजगार झाले आहेत. शिक्षकांच्या गुणवत्तेविषयीही नेहमीच प्रश्न उपस्थित होत असतात. या वर्षीच्या शिक्षक भरती परीक्षेला दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. त्यापैकी काही हजारच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या वाटेवरचा आणि शिक्षकांवरचा विश्वास टिकून राहावा यासाठी काही कल्पक शिक्षक आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील काही शिक्षकांनी टीव्हीच्या मदतीने ओट्यावरची शाळा सुरु केली आहे. अशा शिक्षकांच्या कामाची नोंद जगभर घेतली जाते. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली जाते. डिसलेंना मिळालेल्या जागतिक पुरस्काराने अशा कल्पक शिक्षकांचा उत्साह आणखी वाढेल. डिसलेंचे मोठेपण इथेच संपत नाही. पुरस्काराच्या अंतिम यादीत डिसले यांच्यासह आणखी 9 शिक्षकांचा समावेश होता.

डिसले यांनी पुरस्कारातील 50 टक्के रक्कम त्या 9 शिक्षकांना देण्याचा मनोदय जाहीर केला आहे. या रकमेचा विनियोग 9 देशातील हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी व्हावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यांच्याकडे राहणारी पुरस्काराची उर्वरित रक्कम ‘टीचर इनोव्हेशन फंड’ या निधीमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी उपयोगात आणली जाईल असेही त्यांनी जाहीर केले. डिसले एवढ्यावरच थांबणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. त्यांचा आदर्शवाद इतर शिक्षक बंधूंपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी योजनाबद्ध प्रयत्न करावेत. शिक्षण परिणामकारक करण्याकरता ज्या ज्या कल्पना व योजना डिसले यांनी वापरल्या असतील त्या वापरून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा. आत्तापर्यंतचे त्यांचे यश लक्षात घेता ते असा उपक्रम नक्कीच यशस्वी करू शकतील. शिक्षकीपेशा हा उमदा व्यवसाय (नोबेल प्रोफेशन) मानला जात असे. ते उमदेपण पुन्हा शिक्षकी पेशाला उमदेपणाची झळाळी पुन्हा प्राप्त करून देऊ शकेल. मिळवलेल्या जागतिक स्तरावरील उत्तुंग यशाबद्दल डिसले यांचे अभिनंदन.

- Advertisment -

ताज्या बातम्या