सिन्नर नगरपरिषद प्रगतीत अग्रेसर तर नाशिक मनपाची मात्र पुच्छप्रगती का?
नाशिक मनपा

सिन्नर नगरपरिषद प्रगतीत अग्रेसर तर नाशिक मनपाची मात्र पुच्छप्रगती का?

केंद्रीय गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयामार्फत स्वच्छता विषयक सर्वेक्षण गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी करण्यात येते. यंदाच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले. त्याअनुसार कचरा मुक्त शहर म्हणून सिन्नरला राज्यात दुसरे व देशातील पश्चिम विभागात दहावे मानांकन मिळाले आहे. तर नाशिक महानगरपालिकेचे स्थान अकराव्या क्रमांकावरुन सतराव्या क्रमांकावर घसरले आहे. साहजिक या प्रकाराचे श्रेय आणि अपश्रेय त्या त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावे लागेेल. सिन्नर नगरपरिषदेला ही किमया कशी साधली? नगरपरिषद आणि महानगरपालिका यांच्यात तुलनेचा हा प्रयत्न नव्हे. तथापि एकाच जिल्ह्यातील अगदी निकटचे तालुक्याचे गाव म्हणून ती तुलना साहजिक होणारच! वास्तविक दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीत अनेक बाबतीत तफावत असते. तथापि काही मुद्यांवर साकल्याने विचार होऊ शकेल का? स्वच्छता सेवकांनी केलेल्या अविरत मेहनतीचे हे फळ आहे अशी प्रतिक्रिया सिन्नरच्या स्वच्छता निरीक्षकांनी व्यक्त केली आहे. स्वच्छता ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. एखादा परिसर एकदाच स्वच्छ करुन चालेल का? तो सतत स्वच्छ राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यात लोकसहभाग अत्यंत मोलाचा मानला जातो. स्वच्छतेविषयी समाजजागृती करावी लागते. वैयक्तिक स्तरावर स्वच्छतेबाबत लोक जागरुक असतात. तेवढी जागरुकता सामाजिक स्वच्छतेबाबत क्वचितच आढळते असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे लोकशिक्षण हाही महत्वाचा मुद्दा आहे. शहराच्या तुलनेत तालुक्याच्या गावी हे उद्देश साध्य करणे अंमळ अवघडच नव्हे का? शहरी भागात अनेक सामाजिक संस्था यासाठी कार्यरत असतात. लोकशिक्षणाचे आणि शहर स्वच्छ करणारे उपक्रम सतत सुरु असतात. तरीही अशा अनेक उणीवांवर मात करत राज्यात दुसरा क्रमांक पटकावण्याची किमया सिन्नर नगरपरिषदेला साधली हे कौतुकास्पद आहे. वास्तविक करोना काळात परिसर स्वच्छतेवर जाणीवपूर्वक भर दिला जात आहे. तरीही नाशिक महानगरपालिकेची घसरण का झाली असावी? स्वच्छतेच्या आवाहनाकडे नागरिकांकडून पुरेसे लक्ष का दिले जात नसावे? सोबतच वाढत्या बांधकामांमुळे टाकाऊ साहित्याच्या कचर्‍याच्या पुर्नप्रकियेकडे दुर्लक्ष असेही एक महत्वाचे कारण सांगितले गेले आहे. नाशकात गेल्या दोन दशकात बांधकाम व्यवसाय खूप वाढला आहे. मुंबई-पुण्यादरम्यानचे कमी अंतर यातून नाशिकच्या लोकसंख्यावाढीला वाढता हातभार लागत आहे. अवाढव्य वाढलेल्या मुंबई-पुण्यापेक्षा नाशिकची लोकसंख्या अधिक झपाट्याने वाढत आहे. त्यामानाने शहरात वाढलेल्या नवीन वसाहतींच्या स्वच्छतेकडे मनपाकडून पुरेसे लक्ष दिले जाते का? त्याअंगानेही या समस्येकडे संबंधितांचे लक्ष वेधले गेले तर कदाचित घसरलेला क्रमांक पुन्हा सुधारण्याचा संभव वाढेल. शहर स्वच्छ ठेवणार्‍या विविध यंत्रणा त्यांची जबाबदारी पार पाडतील यासाठी प्रशासनाला नेहमीच दक्ष राहावे लागते. गोदावरी नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी ‘नमामि गंगा’च्या धर्तीवर ‘नमामि गोदा’अभियान राबवावे यासंदर्भात नाशिक महानगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली होती. नंतरच्या एक-दोन दिवसातच प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानेही नाशिक महानगरपालिकेला पत्र देखील पाठवले. त्याला तब्बल तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असल्याचे सांगितले जाते. तरी त्यावर कार्यवाही झालेली नाही. मध्यप्रदेशातील इंदोर शहर स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर पहिले स्थान गेली पाच वर्षे टिकवत आहे. जे इंदोर महानगरपालिकेला शक्य होते ते नाशिकला का शक्य होत नाही हा विचार मनपाशी संबंधित सर्व घटकांनी करायला हवा. नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचे स्वप्न सगळेच सत्तापती बघतात. तशा घोषणाही करतात. सत्तेची सुत्रे नव्याने स्वीकारणार्‍या प्रत्येकाला शहर स्वच्छ आणि सुंदर करायचे असते असे उत्साहाने सांगितले जाते. पण तो उत्साह प्रत्यक्ष कृतीत का उतरत नसावा? नाशिककर आणि नाशिकचे नगरपिते याचा गांभिर्याने विचार करतील का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com