जे कधीही बदलणार नाही त्याबद्दल किती ओरडावे?

jalgaon-digital
4 Min Read

हंगामी पाऊस आणि साहित्यिकांचे नाते बहुधा पावसाइतकेच जुने आहे. पण पावसामुळे फक्त साहित्यिकांच्याच प्रतिभेला धुमारे फुटतात असे नाही. आजकाल रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी सामान्य माणसाच्या प्रतिभेलाही अनावर उधाण येऊ लागले आहे. ‘रस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला..पंक्चरायचं तुमचंच चाक पडलेल्या दगडाला’ असे एक अज्ञात कवी म्हणतो. तर ‘या जगी खड्डे नसावे याची कधी असते का हमी?’ असा प्रश्न थेट चंद्रच एका कवीला विचारतो.

एखाद्याला रागाने ‘खड्ड्यात जा’ असे म्हणता म्हणता माणसे खरेच खड्ड्यात जाऊ लागली आहेत, इतके खड्डे रस्त्यांना पडले आहेत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळेना झाले आहे. पावसाळ्यात जशी सृष्टी जलमय होते तसेच रस्ते पण खड्डेमय होतात. दरवर्षी असेच घडते. तरी माणसांना रस्त्यातील खड्ड्यांची सवय का होऊ नये? गालावर पडलेल्या खड्ड्याला गोड खळी म्हणायचे आणि रस्त्यावर पडलेल्या छोट्या-मोठ्या खड्ड्याच्या नावाने गळे काढायचे याला काहीतरी अर्थ आहे का?

खड्डे खड्डे म्हणजे तरी काय हो? रस्त्याला पडलेली खळीच ती. हे समजण्याइतकी रसिकता सुद्धा माणसात नसावी? देशातील सर्वधर्मसमभाव धोक्यात आल्याचे विचारवंत म्हणतात. पण या देशातील खड्डे मात्र सर्वधर्मसमभावाचे पाईक नाहीत का? खड्ड्यात पडणाराला खड्डयाने त्याची जात कधी विचारली आहे का? का पडलास, अशी विचारपूस तरी केली आहे का? खड्डे टाळून पुढे जाणार्‍या प्रत्येकालाच ते पाडतात.

माणसे, सांडपाणी आणि कचर्‍यालाही खड्डे सामावून घेतात. तरीही माणसे खड्ड्यांच्या नावाने शंख का करतात हे न उलगडणारे कोडे नाही का? सरकारी योजना भलेही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नसतील पण खडड्यांचे प्रताप मात्र पोहोचतात. हे कसे होते हे सरकारने समजून घ्यावे म्हणजे सरकारी योजनांचे सुद्धा सार्वत्रिकीकरण करण्याचा सोपा मार्ग सरकारलाही मिळू शकेल.

पावसाळ्यात लोकांनी घराबाहेर पडू नये, विनाकारण हालचाल करु नये म्हणुनच रस्त्यांवर खड्डे पडावेत अशी व्यवस्था करण्याचा सरकारचा इरादा असूू शकेल अशीही एक शक्यता आहे. मराठी मुलखातील सरकार कुठे आहे याचा सध्या पत्ता नाही. ते न्यायालयाच्या कार्यपद्धतीत अडकून पडले आहे असे म्हणतात. त्यातून ते कधी मोकळे होणार, कधी कारभार करू लागणार हे आजीमाजी मुख्यमंत्र्यांनाही कदाचित सांगता येणार नाही. पण त्यामुळे रस्ते मात्र खड्ड्यात जायचे थांबलेले नाही. त्यामुळे लोकांच्या कल्पनाशक्तीतून सरकारकडे अफलातून सूचना मात्र जमा होत आहेत.

रस्त्यांना वेगवेगळ्या महापुरुषांची नावे देण्याची परंपरा आहे. त्याऐवजी रस्त्यांना तो रस्ता बांधणार्‍या ठेकेदाराचेच नाव द्यावे असे एका नागरिकाने सुचवले आहे. रस्ते ‘दर्जेदार’ असल्याचे प्रमाणपत्र बहाल करणार्‍या अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत अशी एक शक्कलही कोणीतरी सुचवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही मिश्किलपणा करण्यात मागे नाहीत.‘पावसाळ्यात पाणी साचणार्‍या रस्त्यांवर ठेकेदाराचे नाव अणि संपर्क लावा आणि मग बघा, चुटकीसरशी रस्तेकामांचा दर्जा सुधारेल’ असे ते म्हणतात. न जाणो सध्याच्या जागरुक प्रचारतंत्राने नामदारांचे नाव गोवल्याचा उद्व्याप केला असण्याची शक्यता दुर्लक्षिता येणार नाही.

कसेही असो, खड्ड्यांचा कितीही बाऊ केला तरी कार्यक्षम सरकार तरी काय करणार? ज्याने त्याने आपापल्या परीने अशी जादूची कांडी सध्याच्या सरकारच्या हातात द्यायचा प्रयत्न केला आहे. पण त्याची दखल घेण्याइतकं सरकार संवेदनशील असेल तर. तसे ते असते तर यंदाच्या हंगामी पावसात एखादा स्मार्ट रस्ता तरी खड्ड्याविना अभंग राहिला नसता का? सरकार ‘सर्वांचेच’ मायबाप असते.

त्यात जनता, नेत्यांचे बगलबच्चे, हौशे-नवशे-गवशे कार्यकर्ते आले आणि मग सर्व संबंधितांचे सर्वप्रकारचे हितसंबंध सांभाळण्याची जबाबदारी इमानेइतबारे पार पाडणार्‍या ठेकेदारांनी तरी काय करावे? तेव्हा वर्षानुवर्षे रस्त्यांची कामे निघतच राहातील आणि रस्ते दरवर्षी खड्ड्यात जातच राहातील हे बिचार्‍या लोकशाहीप्रेमी सामान्य जनतेने गृहित धरलेलेच बरे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *