Tuesday, April 23, 2024
Homeअग्रलेखअजून किती काळ खड्ड्यात जाणार हे रस्ते?

अजून किती काळ खड्ड्यात जाणार हे रस्ते?

राज्यातील बहुतेक सगळेच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे हा समाजमाध्यमांवरील विनोदाचा विषय झाला आहे. खड्ड्यात रस्ता शोधायचा की रस्त्यात खड्डे, असा प्रश्न वर्षानुवर्षे वाहनचालकांना पडत आला आहे. रस्ते खड्ड्यात जाण्यामुळे ते फक्त वाहनचालकांची पाठच धरतात का? वाहनचालकांची हाडे खिळखिळी होतात. वाहनातील पेट्रोलचा धूर होतो. वाहनचालकांबरोबरच वाहनांच्याही आरोग्याचे बारा वाजतात. रस्त्यांवरील खड्डे हे रस्ते अपघातांचेही एक प्रमूुख कारण मानले जाते.

रस्ते अपघातांमधील मृत्यूंची संख्याही दिवसेदिवस वाढत आहे. रस्ते अपघातांमधील बळींमध्ये तरुणांची संख्या जास्त असल्याचा निष्कर्ष केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका अहवालात नमूद आहे. तरुण पिढीचा रस्ते अपघातात बळी जाणे हे देशाचे नुकसानच आहे. ‘रस्ते अपघातांमध्ये पुढचा क्रमांक आमचा तर नाही ना?’असा प्रश्न साधारणत: 8 हजार विद्यार्थ्यांनी संबंधित खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांना एका पत्रामधून विचारला आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न यवतमाळ-अमरावती या रस्त्याच्या दूरवस्थेबद्दल असला तरी दुदैर्वाने राज्यातील सगळ्याच रस्त्यांची दूरवस्था यापेक्षा वेगळी नसावी. मध्यंतरी पावसाने अधुनमधून उघडीप दिली तेव्हा रस्त्यांना पडलेले खड्डे तात्पुरते बुजवले गेले होेते. पण ते सद्यस्थितीत ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ ठरले आहेत.

- Advertisement -

खड्डे तात्पुरते बुजवण्यासाठी वापरलेली कच किंवा बारीक खडी रस्त्यांवर पसरली आहे. ती कच वानहचालकांच्या डोळ्यात उडते. ते देखील अपघाताचे एक कारण मानले जाते. राज्याच्या सार्वजनिक बांधकांम मंत्र्यांनीच रस्त्यांवरील खड्ड्यांना विहिरी असे संबोधले आहे. तक्रार केल्यानंतर रस्त्यांवरील खड्डे 72 तासात बुजवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. त्यासाठी एक अ‍ॅप तयार केले जाणार आहे. अ‍ॅपवर तक्रार केल्यानंतर विशिष्ट मुदतीत खड्डा बुजवला गेला नाही तर त्याची जबाबदारी संबंधित अधिकार्‍यावर राहिल असेही मंत्र्यांनी जाहिर केले आहे.

सरकारचा हा निर्णय रस्त्यांवरील खड्ड्यांवर शिक्कामोर्तबच करणारा आहे. रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी राखीव ठेवला जातो. तो जातो कुठे? असा प्रश्न मंत्र्यांनीच विचारला आहे. जनतेलाही वर्षानुवर्षे याच प्रश्नाने सतावले आहे. वाहनचालक त्यांच्यात्यांच्या परीने जमेल तसा त्याचा निषेध करतच असतात.

खड्डयात झाडे लावतात. खड्डयांचा वाढदिवस साजरा करतात. यंत्रणेची अंत्ययात्रा काढतात. संतापाचा उद्रेक झाला तर विविध मार्गही अवलंबतात. टक्केवारीची साखळी रस्ते खड्ड्यात घालते असा आरोप नेते आणि त्यांचे राजकीय पक्ष सातत्याने करतात. तथापि रस्त्यांचे वाटोळे करण्याची त्याशिवाय अनेक कारणे सांगितली जातात. रस्त्यांवर पडणार्‍या पाण्याचा निचरा न होणे हेही एक कारण आहे असे रस्ते बांधणी तज्ञांचे मत आहे. तज्ञ पाण्याला डांबराचा शत्रू मानतात.

कोणत्याही प्रकारचे रस्ते बांधताना पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था निर्माण करावी लागते. रस्त्यांच्या कडेला पेव्हर ब्लॉक बसवण्याची पद्धत रुढ झाली आहे. त्या पेव्हर ब्लॉकच्या खाली देखील त्यावर पडणारे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था करावी लगाते. रस्त्यावर पाणी पडताच ते काही सेकंदात रस्त्याच्या दोन्ही बाजूुंनी वाहून जाईल याची दक्षता घ्यावी लागते. रस्त्यांची मान्सूनपूर्ण तपासणी अत्यावश्यक आहे असे मत रस्ते बांधणी तज्ञ व्यक्त करतात.

तशी काळजी घेतली गेली नाही तर रस्त्यांवर पडणारे पाणी रस्त्यांमध्ये मुरते. काही काळातच रस्ते खड्ड्यात जातात आणि तेच खड्डे वाहनचालकांच्या मृत्यूचे सापळे बनू शकतात. तज्ञांची मते यंत्रणा आतातरी गंभीरपणे घेईल का? रस्त्यांच्या कामाचा दर्जा कधीतरी सुधारेल का? वर्षानुवर्षे वाहनचालक आणि त्यांच्या वाहनांना खड्ड्यात घालण्याचा सिलसिला मागच्या पानावरून पुढे अजून किती दिवस सुरुच राहाणार आहे?

- Advertisment -

ताज्या बातम्या