नायलॉन मांजाचा धोका अजून किती काळ?

नायलॉन मांजाचा धोका अजून किती काळ?

डिसेंबर महिना सुरु झाला की समाजाला, विशेषत: युवा पिढीला पतंग महोत्सवाचे वेध लागतात. गल्लोगल्ली पंतग आणि मांजा विक्रीची दुकाने लागतात. आकाशात हवेच्या तालावर विहरणारे पतंग आणि कटलेल्या पंतंगांच्या मागे धावणारी मुले हे दृश्य सर्वत्र दिसू लागते. मकरसंक्रांतीच्या दिवशी तर उत्साहाला उधाण येते. पतंगबाज आणि शौकीनांसाठी हा दिवस सणासारखाच असतो. पतंगबाजीकडे खेळ आणि करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जात होते, साधा मांजा वापरला जात होता तोपर्यंत त्यातील मजा लोकही घेत होते. पण नायलॉन आणि चीनी मांजाचा फास बसू लागल्याने पतंगबाजीचा खेळ माणूस आणि पक्ष्यांसाठी काही वेळा जीवघेणा बनत आहे. नुकत्याच तशा काही घटना घडल्या.  गतवर्षी नाशिकमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत एका महिलेला तिचा जीव गमवावा लागला. नायलॉन मांजाचा फास गळ्याभोवती आवळला गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांनी आणि महिलेच्या नातेवाईकांनी आंदोलन देखील केले होते. पशुपक्ष्यांच्या जीवाचे मोल तेवढे तरी मानले जाते का? नायलॉन मांजामुळे दरवर्षी शेकडो पशूपक्षी जखमी होतात. झाडाझाडांवर मांजा लटकत असल्याने वर्षभर अशा घटना अधूनमधून घडतच असतात. नाशिकच्या अग्निशामक दलाचे जवान आणि पक्षीमित्रांनी गेल्या वर्षभरात साधारणत: 170 पक्ष्यांचा जीव वाचवला. काही पक्षांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना माणसासारखे बोलत येत नसल्याने त्यांच्या वेदना माणसाला कधीतरी समजतील का? अशा घटनांची संख्या वाढायला लागल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने नायलॉन मांजावर बंदी घातली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गतवर्षी ती बंदी कायम केली. पण नायलॉन मांजाची छुपी विक्री सुरुच आहे. त्याला यंदाचे वर्षही अपवाद नाही. मांजावर बंदी घातली असेल तर त्याचे उत्पादन आणि विक्री कशी होते? डिसेंबर-जानेवारीत मांजा विक्रेत्यांवर धाडी घातल्या जातात. लाखो रुपयांचा मांजा जप्त केल्याचे आकडे माध्यमात झळकतात. पण ही कारवाई म्हणजे ‘वरातीमागुन घोडे’ नाही का? एखादी वस्तू विक्रीला बंदी घातली गेली असेल तर तिचे उत्पादन का होऊ दिले जाते? उत्पादन झाले की विक्री होणारच. मग ती राजरोस असो किंवा छुपी. मग ते उत्पादन एकदा वापरुन फेकून द्यावे लागणारे प्लास्टिक असो की फटाके. कागदोपत्री बंदी घालायची. उत्पादनाकडे डोळेझाक करायची. करवसुली करायची आणि मग विक्रेत्यांवर धाडी घालायच्या. यामागे सरकारचा काय उद्देश असावा? याचा खुलासा सरकार करेल का? नायलॉन मांजावर बंदी असेल तर त्याची अंमलबजावणी करणे ही लोकांची देखील सामाजिक जबाबदारी आहे. तो मांजा खरेदी करण्याच्या मोहाला मुलांनीही आवर घालायला हवा. पतंगबाजीचा खेळ म्हणून आनंद घ्यायला हवा. दुसर्‍याची पतंग कापलीच पाहिजे का? त्यासाठी नायलॉन मांजा वापरलाच पाहिजे का?याचाही विचार मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी करायला हवा. संक्रातीला गोड बोलण्यासाठी तिळगूळ वाटण्याची परंपरा आहे. जगणेही गोड करण्यासाठीही सर्वांना एकत्र यायला हवे. पशूपक्षी आणि लोकांच्या गळ्याला फास बनणार्‍या नायलॉन मांजाचा धोका टाळण्यासाठी सरकार ठोस पावले उचलेल अशी अपेक्षा लोकांनी करावी का? 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com