आपत्ती मानवनिर्मित असण्याची शक्यता किती?

आपत्ती मानवनिर्मित असण्याची शक्यता किती?

गेले वर्षभर जग ‘करोना’च्या महासंकटाचा सामना करीत आहे. जगातील सुमारे नऊ कोटी लोकांना आतापर्यंत त्याची बाधा झाली आहे. सहा कोटींहून जास्त लोक बरेही झाले आहेत. तरीही मृतांचा आकडा एकोणावीस लाखांकडे सरकत आहे.

या महामारीने फक्त मानवी जीवनच प्रभावित झाले असे नव्हे; तर जगातील बहुतेक सर्वच अर्थव्यवस्था डबघाईस आल्या आहेत. प्रगतीसाठी धडपडणारे अनेक देश पुन्हा पिछाडीवर फेकले गेले आहेत. टाळेबंदीमुळे उद्योगधंद्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बेरोजगारीचा प्रश्न उग्र बनला आहे. जगाला वेठीस धरणार्‍या ‘करोना’ विषाणूचा उगम चीनमधून झाल्याचा आरोप अनेक देशांनी केला आहे. कारण सुरुवातीला चीनच्या वुहान शहरातच ही साथ पसरली होती. मात्र जगातील देशांना चीनने वेळीच सावध का केले नाही? विमान प्रवाशांसोबत हजारो किलोमीटरचा प्रवास करून हा विषाणू हळूहळू जगभर पसरला.

चीनने ङ्गकरोनाफ साथीवर सर्वात आधी नियंत्रण मिळवले असे सांगितले जाते, पण जगातील अनेक देश अजूनही त्याच्याशी झुंजत आहेत. जगावर बेतलेली ही ‘आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित?’ या संभ्रमात जग आहे. त्याचे उत्तर जगाला हवे आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. चीनमधून ही साथ पसरल्याच्या आरोपांचा चीनने सतत इन्कारच केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मात्र त्याबाबतच्या आरोपांची दखल घेऊन ‘करोना’च्या उगमाचा छडा लावण्यासाठी तज्ञांचा गट चीनला पाठवण्याचे ठरवले आहे. चीन सरकारसोबत तशी बोलणीही झाली होती. तज्ज्ञांचा गट त्यानुसार मोहिमेवर निघण्याच्या बेतात असताना चीननेच त्याला खो घातला आहे. येणार्‍या गटाला आवश्यक ती परवानगी चीनने अद्याप दिलेली नाही.

चीनच्या या आठमुठ्या भूमिकेबद्दल जागतिक आरोग्य संघटनाप्रमुखांनी जाहीरपणे नाराजी प्रकट केली आहे. ‘करोना’ उगमाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरु करण्यास आम्ही उत्सूक आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन आदी देशांचा जगात दबदबा आहे. चीनदेखील महासत्ता आहे याची जाणीव जगाला करून देण्यासाठी चीन शेजारी राष्ट्रांवर कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आदी देश त्याचा अनुभव सध्या घेत आहेत. जगाला वेठीस धरण्याचा चीनी राज्यकर्त्यांचा प्रयत्न असावा, अशी शंका यामुळे पुन्हा वाढू लागली आहे.

विषाणूंचा अभ्यास करणारी मोठी प्रयोगशाळा चीनने वुहान शहरात स्थापन केल्याचे सांगितले जाते. जगात सर्वात आधी तेथेच ‘करोना’ उद्रेक झाला होता हे वास्तव जगजाहीर आहे. तेथूनच या विषाणूचा उगम झाल्याचा जगाचाही वहीम आहे. तो दूर व्हावा म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञगटाला येण्यास चीनने मुभा देणे उचित ठरले असते. जगातील देशांकडून होणारा आरोप साफ चुकीचा व खोटा आहे, अशी चीनची खात्री असेल तर स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याची या देशाला ही संधीच आहे.

तज्ञांच्या गटाला परवानगी देण्यास चालढकल करण्याचे कारण काय? उलट ठरल्याप्रमाणे विनाविलंब परवानगी देऊन तज्ञगटाचे चीनने स्वागतच करायला हवे, पण तसे न करता परवानगीबाबत खळखळ करण्याची चीनची भूमिका संशयाला खतपाणी घालणारी ठरू शकते. जगाला मुठीत ठेवण्याचा आसुरी प्रयत्न काही शक्ती करीत आहेत. तशीच राक्षसी महत्त्वाकांक्षा बळावून ‘ड्रॅगन’ चीनसुद्धा त्याच मार्गाने जात आहे का?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com