
बॉलीवुड अभिनेता सोनू सूदचा समाजमाध्यमांवरील रेल्वे प्रवासाचा व्हिडियो आणि रेल्वे प्रशासनाने त्याला दिलेले उत्तर सध्या चर्चेत आहे. वेगाने धावणार्या रेल्वेच्या दारात सोनू सूद बसलेला आहे. अधूनमधून दारातून बाहेर डोकावताना दिसतो. असा तो व्हिडियो आहे. त्याला रेल्वेने दिलेले उत्तर असे आहे, ‘तुम्ही लाखो लोकांसाठी आदर्श आहात. ट्रेनमध्ये असा प्रवास करणे धोकादायक आहे. तुमच्या अशाप्रकारच्या व्हिडियोमुळे तुमच्या चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. कृपया असे करु नका.’ विषय सोनू सूदपुरता मर्यादित असला तरी रेल्वेने दिलेले उत्तर मात्र त्याच्यापुरते मर्यादित नाही. यानिमित्ताने रेल्वेने माध्यम आणि समाजमाध्यमांवरील हिरोंना आणि प्रभावकांना (इनफ्लुएन्सर्स) त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे असेच म्हणावे लागेल. युवा पिढी प्रभावकांना आदर्श मानते. तरुणाई त्यांना मोठ्या प्रमाणात फॉलो करते. ते दिसतात कसे? राहातात कसे? कुठे जातात? काय करतात? यावर युवांचे बारीक लक्ष असते. त्यांच्या कार्यक्रमांना लोक, विशेषत: तरुण पिढी परदमोड करुन हजेरी लावते. लाखो युवक त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. सर्वच माध्यमांमधील प्रभावकांना हे विसरुन चालेल का? समाजावर आपण कोणत्या गोष्टींचा प्रभाव टाकत आहोत याचे भान त्यांनी राखायला हवे. रेल्वेच्या स्टंटबाजीमध्ये अनेकांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. अशा बातम्या अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. लोक रेल्वेरुळ ओलांडतात. रेल्वेच्या दाराबाहेर किंवा खिडकीबाहेर डोकावतात. दरवाजाला किंवा खिडकीला लटकतात. हे करत असताना काही जण अपघातात प्राण गमावतात. काहींना कायमचे अपंगत्व येते हे सोनू सूदला माहित नसेल का? तरीही त्याने असा व्हिडियो का टाकला? समाजमाध्यमांवर रिल बनवून लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुले वाट्टेल तो स्टंट करतात. आपण काय करत आहोत याचेही भान अनेकांना अनेकवेळा राहात नाही. धबधबे, पर्वतरांगा किंवा रेल्वेस्टेशन अशा ठिकाणी सहजरित्या ते त्यांचा जीव धोक्यात घालतात. समाजमाध्यमांवरील प्रभावकही तेच करु लागले तर आपण जे करतो तेच बरोबर आहे असा युवा पिढीचा भ्रम होणे स्वाभाविक आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा नुकताच जीवघेणा अपघात झाला. अतीवेगाने त्याचा अपघात झाल्याचे सांगितले जाते. ऋषभपंत वाहन खूप वेगात चालवतो असे त्याच्याच काही सहकार्यांचे म्हणणे आहे. रस्ते अपघात वाढत आहेत. अती वेग हे अपघातांचे एक प्रमूख कारण आहे असे तज्ञ सांगतात. ऋषभ पंत कडे बघून तरुणाईला वेगाची नशा चढली तर? सोनू सूद किंवा ऋषभपंत यांच्यासारख्या असंख्य प्रभावकांना त्यांची सामाजिक जबाबदारी विसरुन चालेल का? प्रभावक, समाजात, विशेषत: युवा पिढीत सामाजिक भान रुजवू शकतात. सामाजिक प्रश्नांवर जागरुकता निर्माण करु शकतात. नव्हे ती त्यांची देखील जबाबदारी आहे. समाजमाध्यमांमुळे त्यांची निर्माण झालेली प्रतिमा आणि तिचा समाजमनावर होणारा परिणाम याचे भान त्यांच्यासारख्या असंख्य प्रभावकांना राखावे लागेल. समाजात चुकीचा संदेश पोहोचवणारी स्टंटबाजी त्यांनी टाळायला हवी. बेजबाबदार हिरोगिरीला त्यांनीच आवर घालायला हवा.