Monday, April 29, 2024
Homeअग्रलेखविवेक हरवला आहे का? 

विवेक हरवला आहे का? 

सार्वजनिक सणांच्या मिरवणुकांमधील डीजेचा घातक पातळीवर जाणारा दणदणाट आणि लेझर वापरावर नियंत्रण आणावे अशी पुणे साउंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशनची मागणी सध्या चर्चेत आहे. डीजे आणि लेझर हे ज्यांच्या व्यवसायाचा एक भाग मानला जातो त्या संस्थेने ही मागणी केली आहे हे विशेष. लेझरचा आणि डीजेचा अती वापर ही काही काळापासूनची  डोकेदुखी बनत आहे.

सार्वजनिक मिरवणुका पार पडल्या की नेत्र आणि कर्णदोष जाणवणाऱ्या रुग्णांची गर्दी वाढते असे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लेझर प्रकाशझोत ग्रहणातील किरणांइतकाच घातक असतो. डीजेचा दणदणाट तात्पुरती किंवा कायमची कर्णबधिरता आणू शकतो हे आता वेगळे सांगायची गरज आहे का? ते लोकांच्या अनेकदा अनुभवास येते. नुकताच पार पडलेला उत्सव देखील त्याला अपवाद नाही असे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. उत्सवांमधील उन्मादावर अनेक राजकीय नेतेही टीका करतात. डीजेचा वापर होणारी सार्वजनिक मिरवणुकीचे  निमित्त कोणतीही असो, सरकार आवाजाच्या मर्यादा जाहीर करते. त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर खटले दाखल केले जातील असा इशाराही दिला जातो. अनेकदा खटले दाखलही होतात. यंदाही झाल्याचे सांगितले जाते. तथापि उन्माद कमी झाल्याचे आढळत नाही. उलट तो वाढतच आहे.

- Advertisement -

मिरवणुकांमध्ये हौशे, नवशे आणि गवशे सहभागी होतात. कदाचित त्यामुळेच मिरवणुकांमध्ये उन्माद आणि भिभत्सपणा वाढत असावा का? अंगविक्षेप करून नाचणे, व्यसन करणे आणि ‘बजाव’ अशा आरोळ्या ठोकत दणदणाट वाढवणे हेच बहुतेक मिरवणुकांचे चित्र आढळते. अशा मिरवणुकांमध्ये अनेक सामान्य आणि सुजाण लोक त्यात सहभागी का होत नसावेत? पूर्वीसारखी मजा येत नाही अशी सार्वत्रिक भावना त्यांच्याकडून व्यक्त का होत असावी? न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांचा नियम आणि कायदे आधार ठरू शकतात. तथापि त्यामुळे प्रश्न सुटतात हा भ्रम ठरतो का? त्याबरोबरीने सार्वजनिक उत्सवांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक विवेकशील बनण्याची आणि सार्वजनिक शहाणपण वाढण्याची खरी गरज आहे. सार्वजनिक सण राजकीयच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या अस्मितेचा मुद्दा बनू नये अशी जाणत्यांची अपेक्षा आहे. ध्वनीप्रदूषण आणि लेझर वापराचे दुष्परिणाम लोकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. तज्ज्ञ वारंवार ते सांगतात.

उत्सवांच्या काळात लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याची जबाबदारी माध्यमे देखील पार पाडतात. शासन नियम बनवते. तज्ज्ञ इशारा देतात. ते शहाणपण अंगी बाणवणे ही लोकांची देखील जबाबदारी आहे. सार्वजनिक सणांमधील मूळ हेतू कायम ठेऊन त्याचे समाजस्नेही स्वरूप कायम ठेवणे हे राज्याचे कारभारी आणि नेत्यांचे कर्तव्य आहे. लोकांच्या अस्मितेला खतपाणी घालून राजकीय स्वार्थाची पोळी भाजली जाईल कदाचित, पण त्यामुळे तरुणाई बेभान होणार असेल तर ते समाजस्वास्थ्यासाठी घातक ठरू शकेल. हे आता सर्वानीच लक्षात घेण्याची गरज आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या