भारतीय खेळाडूंचे उत्तम प्रदर्शन!

भारतीय खेळाडूंचे उत्तम प्रदर्शन!

जगात सध्या विविध जागतिक स्पर्धांचा हंगाम सुरू आहे. या स्पर्धांमध्ये क्रिकेटचा जास्त बोलबाला आहे, पण इतर खेळांतही भारतीय खेळाडू गुणवत्तेची चमक दाखवत आहेत. इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धांच्या या हंगामात यशस्वी होऊन पदकांचे कसदार पीक काढण्याचा निर्धार भारतीय खेळाडूंनी केलेला दिसतो. त्याचा प्रत्यय भारतीय जनतेला येत आहे. भारताची स्टार भारतोलक (वेटलिफ्टर) मीराबाई चानू हिने शनिवारी सुवर्णपदक जिंकले. ४९ किलो गटात 'सँच'मध्ये ८८ आणि 'क्लीन अँड जर्क'मध्ये ११३ असा २०१ किलो भार उचलून तिने पदकाची कमाई केली.

तिच्याकडून देशाला सुवर्णाची अपेक्षाच नव्हे तर खात्री होती. ती तिने सार्थ ठरवली. सलग दुसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्ण पटकावले. स्पर्धेतील तिचे हे तिसरे पदक आहे. काल रविवारी मणिपूरच्या २३ वर्षीय बिंदियारानी देवीने भारतोलनात ५५ किलो गटात देशाला दुसरे सुवर्ण मिळवून दिले. सांगलीचा मराठी खेळाडू संकेत सरगरने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात रौप्य मिळवून भारताच्या पदक कमाईची सुरुवात केली. पाठोपाठ ६१ किलो वजनी गटात उडुपीच्या गुरूराजा पुजारीने कांस्यपदक मिळवले. गुरूराजाचेदेखील हे सलग दुसरे पदक आहे. बॅडमिंटनमध्येसुद्धा भारताने श्रीलंकेवर ५-० असा विजय मिळवला. रोममध्ये जागतिक कुस्ती स्पर्धा सुरू आहे.

या स्पर्धेत भारतीय मुलींनी ५ सुवर्णपदके देशाला जिंकून देताना उपविजेतेपदही मिळवले. मुस्कान, सविता आणि हर्षिताने १७ वर्षांखालील गटात ही चमकदार कामगिरी बजावली. राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेतचे यश खास म्हणावे लागेल. वडापावच्या गाडीवर काम करून संकेतने सराव केला. संकेतच्या वडिलांनी राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली कामगिरी करून पदक मिळवण्याच्या त्याच्या स्वप्नांना बळ दिले. त्याच्या यशाचा हा प्रवास घरच्या प्रतिकूल स्थितीमुळे तसा सोपा नव्हता.

बेताची आर्थिक स्थिती आणि खेळाचा कोणताही वारसा नसताना त्याने यशाची झेप घेतली. स्पर्धेतील यशाबाबत त्याची प्रतिक्रिया खूप वेधक आहे. गेली चार वर्षे राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. त्यासाठी गेली चार वर्षे तो प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करीत होता. सुवर्ण न मिळाल्याने मी माझ्यावरच नाराज आहे. रौप्य जिंकल्याचे समाधान वाटत असले तरी यापुढे यापेक्षा ही उमदी कामगिरी करण्याची माझी क्षमता आहे, असे त्याने सांगितले. संकेतच्या यशाने मराठी जनता आनंदली आहे.

महाराष्ट्र सरकारने संकेत आणि त्याच्या मार्गदर्शकांना घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. देशासोबत भारताचे नाव उंचावल्याने त्यासाठी ते पात्रही आहेत. सांगलीचा ४४ वर्षांतील पदकांचा दुष्काळ संपवणाऱ्या संकेतचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या माता-पित्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

संकेतसारखे सामान्य कुटुंबांतून आलेले कितीतरी खेळाडू असामान्य कामगिरी बजावू लागले आहेत. आदिवासी, दुर्गम भागातील मुले-मुली खेळात चमकत आहेत. भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून दिले आहे. प्रतिकूल परिस्थिती त्यांना प्रयत्न आणि यशापासून रोखू शकत नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई, बिंदियारानी, संकेत, गुरूराजा यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीतून ते स्पष्ट होते. सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com