स्थळ-काळानुरूप नेत्यांचे सद्भावपूर्ण वर्तन!

स्थळ-काळानुरूप नेत्यांचे सद्भावपूर्ण वर्तन!

महाराष्ट्राचे राजकीय वातावरण भारतीय राजकारणाप्रमाणेच गेले काही महिने कमालीचे तापले आहे. सत्ताधारी आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये वेगवेगळी कारणे व प्रकरणांवरून घनघोर शाब्दिक युद्ध सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या ठिणग्या उडत आहेत. संघर्षाचा अग्नी भडकला आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रश्न आता निकाली निघाले आहेत, तेव्हा आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा हिशोब चुकता करून घ्यायला सध्याचा काळ अनुकूल आहे, असा समज बहुतेक नेत्यांनी करून घेतला असावा. यामुळे मराठी जनतेत वाढलेला गैरसमज कदाचित दृढ होण्यासारख्या काही घटना मात्र प्रसंगोपात होताना आढळतात. तथापि राजकीय मतभेदांवरून आपापसात भांडणारे व एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढताना न थकणारे मराठी नेते फक्त सूडाने वागणारे नाहीत तर प्रसंग ओळखून समंजस भूमिका घेणारेसुद्धा आहेत, असे वाटणारे प्रसंग काल-परवा नाशिककरांनी अनुभवले.

नाशिक येथे पुढील महिन्यात 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. संमेलनाच्या मुख्य सभामंडपाचे भूमिपूजन भुजबळ नॉलेज सिटी येथे नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते शनिवारी झाले. संमेलन कार्याध्यक्ष तथा जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यावेळी उपस्थित होते. संमेलनाच्या अराजकीय वातावरणात महापौरांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. साहित्य संमेलन ही नाशिककरांसाठी पर्वणी आहे, नाशिकचे संमेलन अभूतपूर्व होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चांगल्या गोष्टींना पालकमंत्री नेहमीच प्रोत्साहन देतात, असे सांगून पालकमंत्री भुजबळ यांच्या खिलाडूवृत्तीची प्रशंसाही महापौरांनी केली. सभामंडपाच्या भूमिपूजनवेळी आयोजकांना साहित्यिकांचा विसर कसा पडला? याबद्दल जागरूक नाशिककरांकडून आश्चर्य व्यक्त झाले, पण विभिन्न पक्षनेत्यांमधील सौहार्दापुढे त्या मुद्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नसावे. संमेलन सभामंडप भूमिपूजनावेळी स्थानिक नेत्यांमधील सुसंवादाचा प्रभाव राज्यस्तरीय नेत्यांवरही पडला असावा. सायंकाळी एका भाजप आमदाराघरच्या लग्नाला राज्यातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांची मांदियाळी जमली होती. लग्नमंचापुढील सोफ्यावर सर्व प्रमुख नेते वर्‍हाडी पाहुणे बनून विराजमान झाले होते. पालकमंत्री छगन भुजबळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत एकाच सोफ्यावर तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आदी नेतेही बाजूलाच बसले होते. लग्नाला हजर झाल्यावर सर्वच नेत्यांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस केली. विशेषत: पालकमंत्री भुजबळ यांच्या वडीलकीचा आदर करून सर्व नेते त्यांच्याशी नि:संकोचपणे हस्तांदोलन करीत होते. भुजबळ, राऊत, पाटील त्रयींत गप्पांचा फड रंगला होता. गंमत म्हणजे दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी याच नेत्यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. लग्नातील भेटीवेळी आधी घेतलेल्या तोंडसुखाचा मात्र कुठे लवलेशही प्रत्यक्षदर्शींना जाणवला नाही. नेत्यांची ही समयसूचकता होती, जाणतेपणा की नाट्याभिनय? याचे कोडे अनेकांना नक्कीच पडले असेल. मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी परस्परांबद्दल दाखवलेली आपुलकी (मग ती देखाव्यापुरती का असेना!) पाहून भोळेभाबडे कार्यकर्ते चकित झाले असतील. त्यांच्यासाठी तो क्षण सुखावणारा होता. मराठी नेत्यांनी भान राखून केलेले वर्तन सद्भावपूर्ण ठरते. राष्ट्रीय स्तरावरचा राजकीय संघर्ष सध्या पराकोटीला पोहोचला आहे. एकमेकांची जिरवण्याची भाषा सुरू आहे. मराठी मुलखातील नेत्यांनी साहित्य संमेलन आणि लग्नकार्यासारख्या ठिकाणी दाखवलेले भान अनुकरणीय आहे. केंद्रीय पातळीवरील नेते त्याचे अनुकरण करतील का? तसे झाले तर अनेक जटील प्रश्न सोपे व्हायला मदत होऊ शकेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com