आगे बढ पाने का नाम औरत है

आगे बढ पाने का नाम औरत है

आगे बढ पाने का नाम औरत है
पहाड़ सी मुसीबतों के बीच ।
आगे बढ़ पाने का नाम औरत है।
हार के अंदेशों के बीच ।
परचम लहराने का नाम औरत है ।
प्रख्यात लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या कमला भसीन यांच्या या ओळी आहेत. तोच वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न अनेक महिला वैयक्तिक आणि सामुहिक पातळीवर करत आहेत. सामाजिक सुधारणांचा मार्ग खडतर आहे. त्या मार्गावरुन चालताना हेटाळणी होण्याची शक्यता आहे हे माहीत असूनही विशेेषत: महिलांसंदर्भातील अनिष्ट रुढी आणि परंपरांना मात द्यायचे त्यांचे प्रयत्न सुरुच आहेत. अशा प्रयत्नांची दखल वारंवार घ्यावी लागते यातच त्या प्रयत्नांची गरज लक्षात येते. पती निधनानंतर महिलेवर विधवेचा शिक्का मारला जातो. विधवा प्रथा तिच्यावर लादली जाते. त्यानंतर लाचारीचे जीणे तिच्या वाट्याला येते. त्या आठवणी अनेकींसाठी वेदनादायीच असतात. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये तिच्या वैधव्याची जाणीव तिला कधी कळत-नकळत तर कधी जाणीवपूर्वक करुन दिली जाते. असे अनेक कटू अनुभव विधवांच्या गाठी असतात. करोना विधवांसाठी अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले गेले. अशा कार्यक्रमांत बोलताना करोना विधवांच्या भावनांचा बांध फुटला होता. विधवेचे जीणे जगताना बसलेल्या चटक्यांचे वर्णन करताना अनेकींना हुंदके दाटले होते. मुळात महिलांना दुय्यमत्व दिले जाते. विधवांना सन्मानाने जगणेही नाकारले जाते. हळदीकुंकवासारख्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती निषिद्ध मानली जाते. तथापि आता या परंपरेला फाटा देण्याचे धाडस अनेक महिला मंडळे दाखवत आहेत. विधवांसाठी खास हळदीकुंंकू समारंभाचे आयोजन करत आहेत. संक्रांतीनिमित्तही अनेक ठिकाणी असे कार्यक्रम पार पडले. पार पडत आहेत. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विधवा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ पार पडला. वरवर पाहाता असे कार्यक्रम आयोजन करण्यात विशेष ते काय, असा प्रश्न विचारला जातो. तथापि प्रवाहपतित होणे सोपे नसते. अशा छोट्या छोट्या प्रयत्नांची गरज लक्षात आणून देणार्‍या दुर्दैवी घटनाही घडतच असतात. नाशिक जिल्ह्यातील शिवरे येथे एका विधवेची चपलांची माळ घालून धिंड काढण्यात आली. हा अमानुष प्रकार तिच्या पतीच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच घडला हे फक्त तिचेच दुर्दैव म्हणावे का? कारणे कोणतीही असली तरी झाला प्रकार निंदनीयच म्हटला पाहिजे. महिलाक्षेत्रात सुधारणा आणण्याचा प्रयत्न करणार्‍या छोट्यातील छोट्या कार्यक्रमाचेही महत्व अशा घटना पटवून देतात. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी । जाळूनी अथवा पुरुन टाका ।’ असे केशवसुतांनी म्हटले त्याला कैक वर्षे उलटली. पण सामाजिक सुधारणांचा मार्ग किती खडतर आहे हे एकविसाव्या शतकातही अनुभवास येते. महिलांसंदर्भातील सामाजिक सुधारणांसारखे काही विषय कधीच जुने होणार नाहीत का? महाराष्ट्राला सामाजिक सुधारणांचा संपन्न वारसा लाभला आहे. तरीही समाज परिवर्तनाची स्वप्ने पाहाणार्‍या कार्यकर्त्यांचा मार्ग अजुनही म्हणावा तितका प्रशस्त झालेला नाही. समाज परिवर्तनाची लढाई प्रत्येकाची आहे असे लोक कधी मानणार? की गतानुगतिक राहाण्यातच समाजाला समाधान वाटते?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com