उपोषणाचे गांधीवादी हत्यार निस्तेज बनू नये!

अर्थसंकल्पपूर्व आर्थिक पाहणीमधील अनेक निष्कर्ष आणि त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. त्यातील काही बाबी सकारात्मक आणि काही नकारात्मक आहेत.

निष्कर्षांच्या या गदारोळात जनतेला दिलासा देणारी बातमी अण्णा हजारेंच्या संदर्भात आली आहे. त्यांनी उपोषणाची घोषणा केली होती. ते उपोषण सध्या मागे घेतल्याची ती बातमी! शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णा 31 जानेवारीपासून राळेगण सिद्धी येथे बेमुदत उपोषणाला बसणार होते. अण्णांनी हे उपोषण स्थगित का केले? ‘शेतकर्‍यांशी संबंधित 15 पेक्षा जास्त मुद्दे आपण केंद्र सरकारला दिले आहेत. त्यावर केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल असा विश्वास केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला व तो समाधानकारक वाटला. म्हणून उपोषणाचा निर्धार स्थगित केला’ असे अण्णांनीच माध्यमांना सांगितले. अण्णा आता 83 वर्षांचे आहेत. कधीकाळी सहसा माहित नसलेले राळेगणसिद्धी हे गाव गांधीवादी अण्णांच्या कृतिशीलतेने जागतिक स्तरावर माहित झाले आहे. अत्यंत विनम्र पण ठाम भूमिका घेऊन अण्णा जनतेच्या प्रश्नांना आवाज देतात. माहितीचा अधिकार व जनलोकपाल हे दोन कायदे अण्णांच्या निर्धाराने जनतेला मिळाले. मात्र त्याच कायद्यांमध्ये पळवाटा शोधण्याचा प्रयत्न झाला व लोकपाल नियुक्ती अद्याप ज्यांनी टाळली त्या सरकारच्या आश्वासनावर अण्णा विश्वास ठेवतात आणि उपोषणाचा निर्धार विरघळून जातो हे कसे पटावे? पण अण्णांचे वय व प्रकृतिमान लक्षात घेता त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या समस्त चाहत्यांना हायसे वाटणारा आहे.

गेल्या 6-7 वर्षात अनेकदा उपोषणाच्या घोषणा झाल्या. हाच निर्धार व्यक्त केला गेला. पण कोणी पुढार्‍यांनी राळेगणला भेट दिली व अण्णांना विनंती केली की उपोषणाचा निर्धार विरघळतो हा आता एक उपचार किंवा शिरस्ता बनला आहे. महात्मा गांधीजीनी सरकारच्या दडपशाहीला विरोध करणारे अहिंसक हत्यार जनतेच्या हाती दिले. आजही सत्याग्रह आणि उपोषण हे त्या दृष्टीनेच पाहिले जाते व अनेकदा राज्यकर्त्यांनीही मानले आहे.

निरपेक्ष कार्यकर्त्यांच्या उपोषणाने अनेक अयोग्य निर्णय आजवर रद्दही झाले आहेत. मात्र उपोषणाची घोषणा केली जावी व कोणी उच्चपदस्थानी गळ घातली की तो निर्धार सन्मानाने स्थगित केला जावा हा सोपस्कार अण्णांच्या बाबतीत वारंवार घडला आहे. अण्णा एक निरलस सक्रिय व कमालीचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबद्दलचा आदर जनतेत आजही कायम आहे. तथापि उपोषणाचा निर्धार बर्‍याच वेळा डळमळल्यामुळे त्या आदराला काहीसा उणेपणा येतो का? याचाही विचार अण्णांनी करावा.

लोकमत हे चंचल असते. उपोषणाच्या घोषणा आणि माघार यामुळे अण्णांचे चाहते संभ्रमित झाले तर नवल नव्हे. जनतेच्या मनात सुद्धा अनेक शंका व प्रश्न व निर्माण होतात. हे सर्व राळेगणच्या एका मंदिराच्या ओवरीत राहून देशसेवा करणार्‍या अण्णांनी यापुढे टाळलेले बरे! केवळ कोणाच्या तरी शाब्दिक आश्वासनावर उपोषणाचा निर्धार चटकन मागे घ्यावा. मग वरचेवर पत्रव्यवहार करत राहावा. उत्तर न मिळाल्याची खंतही व्यक्त करत राहावी. हा प्रकार अनेकदा घडला आहे. निदान यापुढे असे प्रकार टळावेत, उपोषणाच्या घोषणा टाळाव्यात व ‘सन्मानपूर्वक’ उपोषण मागे घेतल्याचे जाहीर करावे हा मोह अण्णांनी प्रयत्नपूर्वक थांबवावा हे बरे!


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *