शेतीतील प्रयोग सुरु राहावेत

शेतीतील प्रयोग सुरु राहावेत

हंगामी पाऊस राज्यातून माघारी परतला आहे. यंदा पावसाने चांगलाच तडाखा दिला. अती पावसाचे दुष्परिणाम हळूहळू स्पष्ट होतील. एक मात्र निश्चित, अतिवृष्टीमुळे शेतीवाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने केवळ शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली पिकेच उद्धस्त केली असे नव्हे तर शेतातील सुपीक मातीही वाहून नेली आहे. सुपीक मातीबरोबरच पीकास उपयुक्त मातीतील पोषकद्रव्येही पाण्यात गेली आहेत.

सिन्नर तालुक्यातही पावसाने धुमाकूळ घातला. वडगाव शिवारातील काही शेतकर्‍यांच्या जमिनीवरील काळ्या मातीचा थर वाहून गेला. आगामी हंगामात शेती करण्यासाठी माती आणायची कोठून, असा प्रश्न त्यांना पडला आहे. देशातून दरवर्षी साधारणत: पाच हजार दशलक्ष टन माती वाहून जाते, असा राष्ट्रीय मृद संधारण व प्रशिक्षण संस्थेचा निष्कर्ष आहे. यंदाच्या अतिवृष्टीने लाखो हेक्टरवरील पिके सडली असल्याचे सांगितले जाते. शेती नुकसानीशी संबंधित बातम्या माध्यमात रोज प्रसिद्ध होत आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची राजकीय पक्षांची मागणी आहे.

तथापि पाऊसही सर्वदूर सारखा पडला नाही. त्यामुळे यंदा तरी शेतकर्‍यांची अवस्था ‘काही ठिकाणी असून अडचण आणि काही ठिकाणी नसून खोळंबा’ अशी आहे. शेतकरी सरकारकडे आशेने बघत आहेत आणि ते स्वाभाविक आहे. शेतीच्या नुकसानभरपाईशी संबंधित सर्व सरकारी खात्यांनी या परिस्थितीकडे संवेदनशीलतेने पाहावे. परस्पर समन्वय राखून शेतकर्‍यांना त्वरीत नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. सरकार ती अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा शेतकर्‍यांनी करावी का? परिस्थिती बिकट खरीच. तथापि तरुण शेतकर्‍यांनी अद्यापही आशा सोडलेली नाही. अनेक शेतकरी त्यांच्या शेतात वेगवेगळे प्रयोग करुन पाहातात. समस्यांना भीडतात.

संकटांचा सामना करतात. जुन्नर तालुक्यातील निमदरी नावाचे गाव आहे. या गावात नुकताच शेवंती महोत्सव भरला होता. महोत्सवात शंभरपेक्षा जास्त रंगाच्या शेवंतीची फुले मांडली गेली होती. एका युवा शेतकर्‍याने हा महोत्सव भरवला होता. त्याने त्याच्याच शेतात रंगीबेरंगी शेवंतीचे मळे फुलवले आहेत. चुनखडी जमिनीमुळे सुरुवातीला यश मिळाले नाही. पण त्यावरही त्याने मात केली. त्याची यशोगाथा माध्यमातही झळकली आहे. नाशिक जिल्ह्यात हरसूल परिसरात निरगुडे गाव आहे. येथील एका शेतकर्‍याने माळरानावर आमराई फुलवली आहे. विशेष म्हणजे आंब्याच्या झाडांना ठिबकने पाणी दिले जाते. ते शिक्षक आहेत. काही काळ त्यांनी नोकरीही केली आहे.

तथापि नोकरीच फार काळ मन रमले नाही. त्यामुळे शेतीच्या ओढीने गावी परतलो. शेतीचा अभ्यास केला आणि आमराई फुलवण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी ‘देशदूत’ला सांगितले. कोल्हापूरच्या डॉ.डी.वाय.पाटील कृषी तंत्र विद्यापीठाने विद्यापीठाच्या आवारात प्रायोगिक तत्वावर रबर लागवड केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकर्‍यांना त्यात सहभागी करुन घेतले जाईल असे विद्यापीठाच्या कुलपतींनी माध्यमांना सांगितले. शेती बेभरवशाची झाली असे सातत्याने सांगितले जाते, पण शेती करण्याच्या पद्धतीला नवे वळण देण्याचे प्रयोग राज्यात ठिकठिकाणी सुरु आहेत.

शेतीचे हंगामी पावसावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठीही काही तरुण शेतकरी प्रयत्न करत असल्याचे अशा प्रयोगावरुन स्पष्ट होते. शेतकर्‍यांनी अशा नवनव्या प्रयोगांची दखल घ्यायला हवी. आपल्या शेतीचा मगदूर, पावसाचे प्रमाण, मातीचा प्रकार लक्षात घेऊन नवीन प्रयोग करुन पाहायला हवेत. असे प्रयोग करत राहिले तर नुकसानीत जाणारी शेती फायद्यात आणणे शक्य होऊ शकेल. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com