Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखसरकारी अधिकार्‍याचे अनुकरणीय पाऊल!

सरकारी अधिकार्‍याचे अनुकरणीय पाऊल!

‘करोना’ नियंत्रणासाठी केलेली टाळेबंदी उठवण्याची प्रक्रिया बर्‍यापैकी गतिमान झाली आहे. लोक मोकळेपणाने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरची वर्दळ वाढली आहे. लहान-मोठ्या वाहने आणि लोकांच्या गर्दीने रस्ते गजबजले आहेत. वाहतूक कोंडीचे चित्र रस्त्यांवर पूर्वीसारखेच दिसत आहे.

मोठ्या शहरांतील वाहतूक प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे. नाशिक त्याला अपवाद कसे असेल? नाशकातील प्रमुख रस्ते आणि चौकांत नित्य-नियमाने वाहतूककोंडी होत आहे. सिग्नलची आधुनिक सुविधा उपलब्ध झाली तरी चौकांचौकात दररोज होणारा वाहतूक खोळंबा नागरिकांप्रमाणेच पोलिसांसाठीसुद्धा डोकेदुखी ठरत आहे. नाशिकमधून जाणार्‍या मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची अहोरात्र ये-जा सुरू असते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. ती कमी करावी या हेतूने उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली, पण तरी पण पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ हे वाहतूक कोंडीचे रडगाणे आजही ‘जैसे थे’ आहे. द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आतापर्यंत बरेच प्रयोग वाहतूक पोलिसांकडून केले गेले आहेत. तूर्तास या चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे, पण समस्या कायमच आहे. अन्य चौकांतील परिस्थितीदेखील थोड्याफार फरकाने अशीच आहे.

- Advertisement -

नवे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशकातील वाहतूक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली आहे. उद्या मंगळवारपासून आयुक्त पांडे स्वत:च रस्त्यावर उतरणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत झळकल्या आहेत. ‘रस्त्यावर उतरणे’ या शब्दाचा अर्थ ‘आंदोलन करणे’ असाही घेतला जातो. ‘पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरणार’ ही बातमी त्यामुळे अनेकांना विनोदी वाटली असेल. तथापि त्यामागील आयुक्तांची भूमिका महत्त्वपूर्ण आणि नाशिककरांच्या हिताचीच आहे. नाशकात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी का होते? त्यामागची नेमकी कारणे कोणती? हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली कसा काढता येईल? त्यासाठी कोणते उपाय योजावे लागतील? ते केवळ कार्यालयात बसून ठरवता येणार नाही हे वास्तव आयुक्तांनी लक्षात घेतले असावे. त्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहणी करावी, प्रश्न नीट समजावून घ्यावा व वास्तवात परिणामकारक ठरेल, अशी उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करावा, असा त्यांचा या मागील उद्देश असावा. तो निश्चितच स्वागतार्ह आहे. त्या अभ्यासासाठी आयुक्त पांडे शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांचौकांत स्वत: पाहणी करणार आहेत.

वाहतूक प्रश्नाशी संबंधित सर्व सहकारी अधिकार्‍यांशी चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत. द्वारका चौक, सीबीएस, गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, कॉलेज रोड हे रस्ते आणि तेथील चौक यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सरकारी कामकाजात या नेमक्या दृष्टीचा अभाव सर्रास जाणवतो. त्यामुळे कागदी योजना समस्यांचे निराकरण करण्यास पुरेशा ठरत नाहीत. मतदार याद्या सुधारण्याचे काम वर्षानुवर्षे चालू असूनही याद्यांतील उणिवांवर घेतले जाणारे आक्षेप दिवसेंदिवस वाढत आहेत. ‘उंटावरून शेळ्या हाकण्या’च्या पद्धतीच्या परिणामाचे हे एक नमुनेदार उदाहरण! सरकारी व्यवस्था फक्त कागदावर चालते व कागदावरच निर्णयांची अंमलबजावणी होऊ शकते या मानसिकतेतून अपेक्षित यश कसे मिळणार? याउलट संवेदनशील अधिकारी लोकाभिमुख भूमिका घेतील तर अनेक समस्यांची सोडवणूक प्रभावीपणे होऊ शकेल. पोलीस आयुक्त पांडे यांनी नाशिकचा वाहतूक प्रश्न सोडवण्याबाबत घेतलेली भूमिका त्यामुळेच अनुकरणीय आहे. तशीच ती अभिनंदनीयही आहे. त्यांच्या या उपक्रमाला यश लाभावे आणि नाशिककरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका व्हावी, अशी आशा करूया!

- Advertisment -

ताज्या बातम्या