Saturday, April 27, 2024
Homeअग्रलेखमराठी अभिनेत्यांचे अनुकरणीय उपक्रम!

मराठी अभिनेत्यांचे अनुकरणीय उपक्रम!

येत्या शिवजयंतीनिमित्त आपल्या परिसरातील गड-किल्ल्यांवर वृक्षारोपण करावे असे आवाहन प्रसिद्ध मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी एका ध्वनिचित्रफितीद्वारे मराठी जनतेला केले आहे.

झाडांशिवाय गडाला शोभा नाही. म्हणून येत्या शिवजयंतीला पन्हाळगडावर आपण व आपले सहकारी मिळून किमान 400 तरी झाडे लावणार आहोत असा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे. सयाजी शिंदे हे वृक्षप्रेमी म्हणून परिचित आहेत. ते नाशिक महानगरपालिकेच्या देवराई प्रकल्पाचे ‘ मानचिन्ह प्रतिनिधी’ (ब्रँड अम्बॅसॅडर) आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या देवराया फुलवण्यात त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यातील पालवण येथे राज्यातील पहिले वृक्ष संमेलन झाले.

- Advertisement -

तेथील देवराईत दोन लाखांपेक्षा जास्त झाडे लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्राला सह्याद्रीचे दगडी चौथरा लाभला आहे. त्यावर सुद्धा कधीकाळी भरपूर झाडे होती. पण वृक्षतोडीमुळे आता बरेच डोंगर बोडके झाले आहेत. पर्यावरणात आणि पावसाच्या साखळीत झाडांचे महत्व अनन्यसाधारण आहे. झाडांची मुळे माती धरून ठेवतात. त्यामुळे मातीची धूप थांबते. तथापि डोंगर आणि गड-किल्ल्यांवरील वृक्षराजी नाममात्र उरली आहे. जंगल कमी होण्याचे दुष्परिणाम समाजाला सहन करावे लागत आहेत. डोंगरांना पुन्हा हिरवाईची शोभा वाढवण्याचा वसा शिंदे यांनी घेतला आहे.

तो अनुकरणीय आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांची संवेदनशीलता आणि जागरूकता वाढत आहे याचे हे निदर्शक आहेत. हे घटक समाजातील समस्यांची फक्त चर्चा करून समाधान मानत नाहीत. त्यावर उपायही हाती घेतात. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी बदलाची छोटीशी सुरुवात केली. महाराष्ट्रात कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. अशा शेतकर्यांची कुटुंबे उघड्यावर येतात. त्यांचे जगणे कठीण होते. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबाना मदतीसाठी पाटेकर आणि अनासपुरे यांनी पुढाकार घेतला. मनामम नावाची समाजोपयोगी धर्मादाय संस्था स्थापन केली. ही संस्था राज्यात विविध उपक्रम राबवत असते.

सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी पाटेकर आणि अनासपुरे यांच्या पावलावर पाऊल टाकत डोंगर हिरवे निर्धार केला आहे. असे उपक्रम महाराष्ट्राला पुढे नेतील. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात छोटीच असते. बी पेरली की तिचा महावृक्ष होतो. पाटेकर, अनासपुरे आणि शिंदे यांच्या उपक्रमांमुळे इतरांना प्रेरणा मिळू शकेल. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांनी सामाजिक बदलांची सुरुवात स्वतःपासुन केली आहे. त्या तुलनेत हिंदी चित्रपटसृष्टीत सामाजीक जाणीव फारच जेमतेम आढळते. आमिर खान यांची ‘पाणी फाउंडेशन’ संस्था जलसिंचन क्षेत्रात काम करते.

काही अभिनेते वैयक्तिक स्तरावर समाजोपयोगी काम करत असल्याचे बोलले जाते. तथापि सामूहिक रित्या व संस्थात्मक पातळीवर असे प्रयत्न होत असल्याचे जनतेच्या फारसे ऐकिवात नाही. आजकाल विविध उपक्रमांसाठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांना ‘मानचिन्ह प्रतिनिधी’ नेमण्याची पद्धत इकडच्या काळात रूढ झाली आहे.

मात्र हे काम किती तारे-तारका विनामोबदला करत असतील? ते काम करण्यासाठी करोडोंमध्ये मानधन मागितले जाते अशा बातम्याही अधूमधून झळकतात. खरेखोटे देव जाणे! मराठी चित्रपट अभिनेत्यांनी मात्र विधायक कामे स्वयंस्फूर्तीने हाती घेतली आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर अभिनेते जागे झाले तर समाजातील वंचितांसाठी कितीतरी मोठी समाजकार्ये उभी राहू शकतील. पण कोणी लक्षात घेईल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या