कॅन्सरच्या जनजागृतीमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक

कॅन्सरच्या जनजागृतीमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक

कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी ऐकणार्‍यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. रक्तदाब वाढतो. आपल्याला कॅन्सर झाला तर, अशी अनामिक भीती मनात दाटून येते. नकारात्मक विचार मन व्यापून टाकतात. कॅन्सर झालेल्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे हे समीकरण जनमानसात घट्ट रुजले आहे. त्यामुळेच माणसांना कॅन्सरची भीती वाटते. या व्याधीवरचे प्रचंड महागडे उपचार हे देखील भीतीचे एक प्रमुख कारण आहे.

या व्याधीची लक्षणे प्राथमिक टप्प्यातच लक्षात आली तर सर्व प्रकारचे कॅन्सर बरे होण्याची शक्यता काही टक्क्यांनी वाढते असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. अहमदाबाद येथील विविध जैन संघटनांचे पदाधिकारी आणि त्यांचे धर्मगुरु यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. जैन साध्वी आणि महिलांनी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करुन घ्यावी यासाठी जनजागृती मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम हळूहळू व्यापक स्तरावर राबवली जाणार आहे. एक हजार जैन साध्वी या मोहिमेच्या सदिच्छा दूत बनणार आहेत. तपासणीची कल्पना स्थानिक डॉक्टर दांपत्याने मांडली होती. त्यासाठी त्यांनी जैन संघांची प्रमुख संस्था असलेल्या जैन महासंघाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली होती. ब्रेस्ट कॅन्सर होणार्‍या महिलांचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. 2018 मध्ये देशात ब्रेस्ट कॅन्सरचे दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण होते. 2035 पर्यंत ही संख्या काही लाखांपर्यंत वाढेल असा अंदाज लॅन्सेट या प्रसिद्ध वैद्यकीय मासिकाने व्यक्त केला आहे. वयाच्या विशीपासूनच महिलांमध्ये या व्याधीची लागण झाल्याचे आढळू लागले आहे असे मुंबईच्या नानावटी रुग्णालयांच्या तज्ञांनी माध्यमांना सांगितले. दक्षता बाळगणे आणि जीवनशैलीतील बदल देखील सकारात्मक ठरतात असेही मत तज्ञ व्यक्त करतात. कॅन्सर व्याधीवरचे उपचार महागडे आहेत. ते सर्वांनाच परवडणारे नसतात. पण तरी सुद्धा लोक प्रयत्न करणे सोडत नाहीत. या क्षेत्रात जनजागृतीचा गरज महत्वाची  आहे आणि जनजागृतीचे प्रयत्न वाढतही आहेत. अनेक सामाजिक संस्था यात सहभागी होत आहेत. समाज जागरुक होत आहे. कॅन्सरशी लढणारांचे प्रमाण वाढत आहे. कॅन्सरवर मात करुन सुखकारक जीवन जगणार्‍या माणसांच्या यशोगाथा प्रसिद्ध होत आहेत. त्यातुनही माणसे प्रेरणा घेत आहेत. ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात जनजागृती करण्यात जैन धर्मगुरुंनी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. त्याचे अनुकरण सर्वधर्मीय धर्मगुरुंनी केले तर त्याची व्यापक स्तरावर जनजागृती होण्यास मदतच होणार आहे. ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मोहिमेसारख्या प्रयोगातून जैन धर्मगुरुंनी जागरुकता दाखवली आहे. त्याचे फायदेही अनुभवास येत आहेत. कोणत्याही व्याधीची पुूर्वसुचना देणार्‍या वैद्यकीय तपासण्यांकडे धर्मविरहित दृष्टीकोनातून पाहाण्याची आवश्यकता अहमदाबाद प्रयोगाने अधोरेखित केली आहे. तेव्हा या प्रयोगाचे अनुकरण मोठ्या प्रमाणात केले जाईल अशी अपेक्षा करुयात. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com