सरकारी रुग्णालयांवरचा विश्वास वाढवणारे प्रयत्न

कळवण उपजिल्हा रुग्णालय
कळवण उपजिल्हा रुग्णालय

सरकारी रुग्णालये म्हटली की एक ठराविक चित्र लोकांच्या डोळ्यासमोर उभे राहाते. ते काहीसे नकारात्मकच जास्त आढळते. रुग्णांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे तपासणी विभाग, रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी, त्यांचे गोंधळेलेले चेहरे,  जागोजागी अस्वच्छता आणि वेगवेगळे आवाज असेच ते मन सुन्न करणारे चित्र असते. उपचार योग्य पद्धतीने होणार नाहीत अशीच भावना रुग्णांच्या मनात निर्माण होऊ शकते. लोकांचा अनुभवही त्यांचे मत बनायला कारणीभूत ठरतो हेही खरे. तथापि या प्रतिमेला छेद देणार्‍या घटनाही अधूनमधून घडतात. सरकारी रुग्णालयांमध्येही सार्वजनिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणारे डॉक्टर्स आणि आरोग्यसेवक त्यांचे काम संवेदनशीलतेने करत असतात. केईएम रुग्णालयात एका महिलेच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मेंदूतील रक्तवाहिन्यांवर आलेला फुगा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन काढून टाकला, त्यासाठी अत्यल्प खर्च आला. फुगा फुटला असता तर कदाचित रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता असे यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात डॉक्टरांनी म्हटले आहे. दुसरी घटना मुंबईतीलच शीव रुग्णालयातील. या रुग्णालयातील नाक, कान आणि घसा विभागाच्या प्रमुख डॉक्टरांना या संदर्भात होणार्‍या जागतिक परिषदेत व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या डॉक्टर कान, नाक आणि घशाच्या विविध आजारांवर दुर्बीणच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करतात. सांगलीच्या जिल्हा रुग्णालयात अशीच आव्हानात्मक शस्त्रक्रिया पार पडली. एका दुर्घटनेत एका महिलेची श्वासनलिका तुटून स्वरयंत्राला इजा झाली होती. तथापि डॉक्टर आणि त्यांच्या सदस्यांच्या अथक प्रयत्नांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. महिलेला तिचा आवाजही परत मिळाला. वैद्यकीय उपचार महागडे होत आहेत. तो खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. परिणामी समाजाच्या फार मोठ्या हिश्श्याला सरकारी आरोग्य व्यवस्थेवरच अवलंबून राहावे लागते. सरकारी आरोग्य व्यवस्थेचे महत्व करोना साथीमुळे सर्वांच्याच लक्षात आले. त्या काळात सरकारी डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांनी झपाटल्यासारखे काम केल्याचा अनुभव समाजाने घेतला. व्यवस्था बळकटीकरणाची गरजही करोनाकाळातच प्रकर्षाने जाणवली. राज्यात हजारो सरकारी रुग्णालये आणि सामाजिक आरोग्य केंद्रे आहेत. त्या तुलनेत डॉक्टरांची आणि आरोग्य सेवकांची खूप कमतरता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांकानुसार दर हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर असावा. सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत साधारणत: पाच लाख डॉक्टर्सची कमतरता असल्याचे आणि आरोग्य सेवकांची शेकडो पदे रिक्त असल्याचे सांगितले जाते. परिणामी उपलब्ध डॉक्टरांवर वाढत्या रुग्णसंख्येचा ताण पडतो असे सरकारी डॉक्टर सांगतात. अनेक रुग्णांचे अनुभव काहीसे नकारात्मक असतात. अनेक कारणांमुळे सरकारी रुग्णालये वादाचे केंद्र ठरतात. अशा अनेक प्रकारच्या कमतरतांवर मात करण्याचे कसब वर उल्लेखिलेल्या तीन रुग्णालयांमधील डॉक्टरांना साधले आहे. ते अनुकरणीय आहे. वैद्यकीय व्यवसाय ‘नोबेल प्रोफेशन’ काम मानला जातो याची जाणीव कदाचित त्यामुळे होऊ शकेल. नाईलाज म्हणून लोक सरकारी रुग्णालयात जातात हे वास्तव आहे, पण अशा घटना सरकारी रुग्णालयांवरील विश्वास वाढवण्यास कारण ठरतात. सरकारी रुग्णालयांमध्येही चांगले उपचार मिळतात, अशी धारणा सामान्यांमध्ये निर्माण करतात. उपचार यशस्वी होण्यामागे रुग्णांची मानसिकता किती महत्वाची असते हे वेगळे सांगायला नको. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com