Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखअती शहाणा..

अती शहाणा..

आज बैलपोळा ! हा सण राज्यभर साजरा होत असताना शिवसेना मात्र संजय राऊतांच्या निमित्ताने ‘ अती शहाणा; त्याचा बैल रिकामा’ या म्हणीचा अनुभव वेगळ्या अर्थाने घेत आहे. संजय राऊत हे राज्यसभेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आहेत. त्या भूमिकेत ते महाराष्ट्राचेही प्रतिनिधित्व करतात. राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. शिवसेनेने त्यांना राज्यसभेत उगाचच पाठवले असेल का? ते मुरब्बी पत्रकार आहेत. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. दैनिक सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. राऊत यांनी विविध प्रकाशनांच्या विविध विभागांमध्ये आणि पत्रकार म्हणूनही काम केले आहे. गुन्हे विश्वावरील त्यांच्या वृत्त मालिका गाजल्या आहेत. तथापि ते आता पत्रकारापेक्षा राजकारणी म्हणून जास्त ओळखले जातात. त्यांच्या काळात सामनाची वाढ झाली असे बोलले जाते. राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण देण्यात आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांनी कळीची भूमिका बजावली अशी शिवसैनिकांची भावना आहे. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यात त्यांची गणना होते. राऊत जे काही करतात किंवा बोलतात ते शिवसेनेचे अधिकृत धोरण असते असे राजकीय वर्तुळात मानले जाते. अशा अनेक अर्थानी राऊत यांचे ज्ञान, पत्रकारितेतील अनुभव कोणीच नाकारू शकणार नाही. शिवसेनेने त्यांना दिलेल्या संधीचे त्यांनीही चीज करून दाखवले आहे. तथापि त्यांनाही यश किंवा मिळालेले मोठेपण पेलवत नसावे याचा अनुभव शिवसेना सध्या घेत आहे. शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास टाकला याचा अर्थ त्यांनी काहीही बोलावे असा होतो का? आपण काहीही बोलले तरी शिवसेना आपल्या पाठीशी आहे असा त्यांचा भ्रम झाला आहे का? करोनाची साथ पसरत आहे. करोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तरी संसर्ग आटोक्यात आलेला नाही. डॉक्टर आणि आरोग्य सेवक जीवाची बाजी लावून करोना रुग्णांवर उपचार करत आहेत. पीपीई किट घालून उपचार करणे किती त्रासदायक आहे याचे वृत्त सामनात त्यांच्याच मार्गदर्शनाने छापले जाते. देशातील १९० पेक्षा जास्त डॉक्टरांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. स्वतः राऊत यांच्यावर देखील अँजिओप्लास्टी झाली आहे. तरीही ‘ ‘ डॉक्टरांना काही कळत नाही. आपण डॉक्टरांकडून कधीच औषध घेत नाही. डॉक्टरांपेक्षा कम्पाऊण्डला जास्त समजते. म्हणून आपण त्याच्याकडून औषध घेतो ‘ अशी भयंकर विधाने त्यांनी कुठल्या तारेत केली असावीत? संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी कंपौंडरनेच केली का असा प्रश्न समाजमाध्यमांवर अनेकांनी त्यांना विचारला आहे. काही डॉक्टर्स सुद्धा तसे विचारत आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेने त्यांचा निषेध केला आहे. राजकीय मनोरंजनासाठी डॉक्टरांना वेठीला घेऊ नका. करोना संसर्गाच्या काळात डॉक्टर अखंड सेवा बजावत आहेत. त्यांची हेटाळणी योग्य आहे का? असा प्रश्न असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. राऊत त्याचे काय उत्तर देणार आहेत? शहाण्या माणसांची जीभ कशी घसरते हे त्यांच्या प्रयत्नातून उमजते. पण मूळ विधानांपेक्षा भयंकर खुलासा करून जीभेसोबत आणखीही काही घसरू शकते याचे प्रत्यंतर राऊतांचा खुलासा वाचल्यावर समजते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य सेवकांचे आणि डॉक्टरांचे अनेकदा कौतुक केले आहे. जनतेने निर्बंध पाळावेत आणि आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढवू नये असे आवाहन त्यांनी वारंवार केले आहे. तथापि आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त कळते असा राऊत यांचा भ्रम झाला आहे का? की मुख्यमंत्र्यांची डॉक्टरांच्या कामाची प्रशस्ती करणारी विधाने राऊतांना मान्य नसावीत? म्हणूनच ते वाट्टेल ते बडबडू लागले आहेत का? यामुळे शिवसेनेची खिल्ली उडवली जात आहे. समाजमाध्यमांवर मिम्स तयार होत आहेत. याची पक्षाला किंमत मोजावी लागू शकते हे लक्षात घेऊन राऊतांच्या वाचाळतेला आवर घातला जाईल आणि मुख्यमंत्री डॉक्टरांचे योग्य पद्धतीने समाधान करतील अशी अपेक्षा करावी का? मात्र ‘अती शहाणा त्याचा बैल रिकामा’ या म्हणीचे इतके उत्कृष्ट प्रत्यंतर क्वचितच घडू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या