या मुलांचे म्हणणे कोणी ऐकेल का ?

रेल्वेतून पळून जाणार्‍या सातशेहून जास्त मुलांना रेल्वे पोलिसांनी पकडले होते. त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले गेले आहे. ही मुले घर सोडून पळाली होती. अशा मुलांच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी समाज माध्यमांवर एक गट तयार केला आहे. त्यावर या मुलांची माहिती जाहीर केली जाते.

रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल व स्थानिक पोलीस अशा विविध विभागांचा समन्वय या गटात साधला जातो. पोलिसांविषयी जनतेचे मत अलीकडच्या काळात फारसे चांगले नाही. एक विशिष्ट प्रतिमा जनतेच्या मनात रुजू लागली आहे. रेल्वे पोलिसांच्या या उपक्रमामुळे पोलिसांची ती प्रतिमा बदलण्यास किंवा त्यातील समाजाभिमुख पैलू लक्षात येण्यास उपयुक्त ठरावी.

मुले घरातून पळून का गेली याचा शोध पोलिसांनी घेतला. नंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलांच्या तोंडून कल्पनातीत व्यथा स्पष्ट झाल्या. ‘आई-वडिलांना आपल्याशी बोलायला वेळ नाही. त्यामुळे खूप एकटे वाटते. म्हणून आपण पळून गेलो’ असे काही मुलांनी सांगितले. तर आई-वडील एकमेकांशी खूप भांडतात, त्यांच्या भांडणाची भीती वाटते, असे काहींनी सांगितले.

आई-वडिलांमध्ये परस्पर संवाद नाही हेही एक कारण पोलिसांना आढळले. या मुलांनी त्यांच्याच वयाच्या असंख्य मुलांच्या व्यथेला वाचा फोडली आहे. कुटुंबाची वीण उसवत आहे. त्याचे विपरित परिणाम मुलांवरसुद्धा होत आहेत. ‘हम दो हमारे दो’ असा सध्याचा जमाना आहे. अशा छोटेखानी कुटुंबात मुले स्वत:ला असुरक्षित का समजत आहेत? दोघा पालकांनी कमावल्याशिवाय गत्यंतर नाही, असा भ्रम समाजात निर्माण झाला आहे.

दिवसभर नोकरी करणार्‍या आई-बाबांचा उरला-सुरला वेळ आधुनिक संवाद साधने आणि समाज माध्यमांनी व्यापला आहे. मुलांशी संवाद साधायचा असतो. गप्पांच्या ओघात त्यांच्या मनात काय चालले आहे हे समजावून घ्यायचे असते याची पालकांना जाणीव का नसावी? काळाच्या ओघात संयुक्त कुटुंबे क्वचितच आढळतात.

त्या पद्धतीत कुटुंबातील कोणाकडे तरी मुले भावना व्यक्त करू शकत. त्यांची दखल घेऊन निराकरणही केले जात असे. आता छोट्या कुटुंबांचा जमाना आहे. मुलांना भावनिक आणि मानसिक आधार देण्याची जबाबदारी किती पालक स्वीकारतात? पालकांच्या मनाप्रमाणेच वागावे याचे दडपण मात्र मुलांवर वाढले आहे.

दाप-दडपण करून व आसपासच्या मुलांशी तुलना करून उमलत्या मनांत पालकांबद्दल प्रेम कसे निर्माण होणार? सुशिक्षित मातांचा पालकत्वाचा विचारही पुस्तकी ज्ञानावर आधारलेला असेल का? मुलांचे संगोपन आणि संवर्धन एकसुरी असू शकत नाही, पण छोट्या कुटुंबातील बालकांना सर्वांगाने विकसित होण्याची संधी आणि मोकळेपण कसे लाभणार?

पळून गेलेल्या मुलांच्या व्यथा ऐकून त्यांच्या तरुण पालकांनासुद्धा आपल्या वागण्यातील उणिवा लक्षात येतील का? पालकांचा आपापल्या बालकांशी संवाद कसा असावा या प्रशिक्षणाची गरजदेखील त्या हकिगतींमधून स्पष्ट झाली. ती सर्व पालकांपर्यंत कशी पोहोचणार?

 ही समाजाचीही जबाबदारी !

अनेक विचारवंतांनी महाराष्ट्राला विचारसमृद्ध केले आहे. आजच्या काळात हीच वैचारिकता जतन करणे आवश्यक आहे. मात्र तशी ती जतन करण्यात आपण कमी पडतो. ही जबाबदारी केवळ विचार मांडणार्‍यांवर आणि विचारवंतांवर टाकली जाते ते योग्य नाही’ असे परखड व समयोचित मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे.

केवळ वारसा जपण्याचीच नव्हे तर सामाजिक बदल घडवणार्‍या अनेक सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्याची जबाबदारीही विचारवंतांवर टाकण्याची खोड समाजाला जडली आहे का? शिक्षणक्षेत्रात अस्वस्थता आहे, तरुणाईचे वाचनाचे वेड कमी होत आहे, तरुणाई बेभान होत आहे, कुटुंबातील संवाद हरपत आहे, अशा अनेक मुद्यांवर अनेकदा घमासान चर्चा झडतात. तथापि त्यातील बहुतेक चर्चांचा शेवट ‘यावर विचारवंतांनी उपाय सुचवावेत’ एवढ्या एकाच निष्कर्षावर येऊन होतो.

सामाजिक बदलांचा, समाजभान जागृत करण्याचा व जागरुकतेचा केवळ विचारवंतांनीच ठेका घेतला आहे का? पाणी अडवण्याची व ते जिरवण्याची जबाबदारी फक्त सरकारनेच पार पाडावी का? 31 डिसेंबर या वर्षाअखेरीच्या दिवशी हरिश्चंद्र किल्ल्यासह अन्य काही किल्ल्यांवर जायला स्थानिकांनी बंदी घातल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे.

या दिवशी पर्यटक किल्ल्यांवर जातात. तेथे मद्यपान करतात, मोठ्याने गाणी वाजवत अचकट-विचकट नृत्य करतात, असा नागरिकांचा आक्षेप आहे. दुगारवाडी हे त्र्यंबकेश्वरजवळील तरुणाईचे आवडते पर्यटनस्थळ ! नुकताच तीन विद्यार्थ्यांचा तेथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सायंकाळच्या वेळी या विद्यार्थ्यांनी धबधब्याकडे जाऊ नये, असे स्थानिक नागरिकांनी त्यांना सुचवले होते. तथापि विद्यार्थ्यांनी ते ऐकले नव्हते. हा तरुणाईच्या बेजबाबदारीचा एक प्रातिनिधीक नमुना! समाजात सामाजिक जबाबदारीची व सुजाण नागरिकत्वाची जाणीव का वाढत नाही ?

सामाजिक मूल्यांची रुजवण शालेयस्तरावरच व्हायला हवी. त्यासाठी सतत प्रयत्न आवश्यक आहेत. नागरिकशास्त्राचे प्राथमिक नियम शिकवण्यापासून सुरुवात करावी लागेल. विद्यार्थ्यांवर नागरी जबाबदारीचे व सामाजिक वर्तनाचे संस्कार करू शकेल अशा विषयांना शालेयस्तरावर हल्ली वाव तरी आहे का? ही परिस्थिती कोण बदलणार? वादग्रस्त ठरतील असे बदल अभ्यासक्रमात सुचवले जात आहेत.

त्यासाठी रामायण आणि महाभारत धुंडाळले जात आहेत. त्याऐवजी आधुनिक जीवनशैलीला अनुरूप अशा नागरिकशास्त्राला प्राधान्य देण्याची जास्त निकड आहे. या विषयासाठी पुरेशा तासिका शालेय अभ्यासक्रमात व वेळापत्रकात समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे. सुजाण नागरिक निर्माण करणे ही केवळ विचारवंतांची जबाबदारी नव्हे हे सदानंदजी मोरे यांचे मत दुर्लक्षित राहू नये. ती जबाबदारी समाजालासुद्धा पार पाडावी लागेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com