एकमेकां सहाय्य करु.. अवघे धरु सुपंथ!

jalgaon-digital
3 Min Read

राज्यात सध्या कमालीची राजकीय अस्थिरता आहे. सध्या कोण-कोण सत्ताधारी आहे याचे उत्तर किती लोकप्रतिनिधी ठामपणे देऊ शकतील? ‘आघाड्यांच्या राजकारणात विकासाचा आवाज क्षीण होत जातो’ असे ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे म्हणायच्या. तर

परि भल्यांनीच गोंधळ घातला ।

पुढारी पुढिलांचा अरि झाला ।

तयांच्या नगार्‍या पुढे कसला ।

आवाज आमचा ताण मारी ?

असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विचारला होता. त्याचा अनुभव लोक सध्या घेत आहेत. बेरोजगारी आणि महागाई ‘दिन दुगनी रात चौगुनी’ गतीने वाढत आहे. मान्सुनने महाराष्ट्र व्यापला असे सांगितले जात असले तरी अनेक ठिकाणी पावसाने जेमतेम नाममात्र हजेरी लावली आहे. आश्वासन देऊन ते न पाळणार्‍या राजकारण्यांची बाधा पावसालाही झाली आहे, असा विनोद समाजमाध्यमांवर फिरत आहे. शिक्षणाचे रुतलेले गाडे कधी रुळावर येईल हे कोणीच सांगू शकत नाही.

या समस्या सोडवणे हे ज्यांचे प्रथम कर्तव्य आहे ते सगळेच स्वत:च्याच समस्या सोडवण्यात आणि राजकीय सोय लावून घेण्यात मग्न आहेत. त्यामुळे समस्या सोडवायच्या कोणी असा प्रश्न लोकांना पडला आहे. यावर ‘दीनहीनां वरि उचलावें । त्यांतचि समाधान मानीत जावें । आपण द्यावें आपण द्यावें । हेंचि अंतरीं जपत राहावें ।’ असा मार्ग तुकडोजी महाराजांनी सांगितला आहे. त्याच न्यायाने लोक परस्पर सहकार्याचा हात पुढे करत आहेत. त्याची दखल माध्यमेही घेत आहेत. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एरवीही तीन-चार मैलाची पायपीट करावी लागते. पावसाळ्यात नद्या-नाले आणि ओढे दुथडी भरुन वाहातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोयच जास्त होते. डोंबिवली येथील प्रांगण फाऊंडेशनने ही उणीव लक्षात घेतली आहे. संस्थेने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्यात रेनकोटचाही समावेश आहे.

पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या अनेक भागात पाणीटंचाईचे सावट आहे. पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी वाई तालुक्यातील गुंडेवारी गावातील युवाशक्ती एकत्र आली आहे. गावानेही त्यांना साथ दिली. सर्वांनी मिळून गावाजवळच्या डोंगरावर चर खणले. खड्डे खोदले. पाझर तलावांची, छोट्या बंधार्‍याची दुरुस्ती केली. यासाठी गावातील सर्वांनी जमेल तसे श्रमदान केले. पावसाच्या पाण्याने चर आणि खड्डे भरु लागले आहेत. केवळ पाऊसच नव्हे तर एकुणच पर्यावरणाच्या साखळीतील देशी झाडांचे महत्व सामाजिक संस्थांच्या लक्षात येऊ लागले आहे. नाशिक येथील श्री. स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थेनेे यावर्षी देशी झाडांच्या बियांचे एक लाख बीज गोळे तयार केले आहेत. त्यांचे वाटप प्रमुख संतांच्या पालख्यांमध्ये सहभागी होणार्‍या दिंड्यांमध्ये केले जात आहे. वारकरी शेतकर्‍यांनी हे गोळे बरोबर घरी न्यावेत आणि शेताच्या बांधावर किंवा गावच्या मोकळ्या जागेत टाकावेत अशी संस्थेच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. करोना पश्चातच्या काळात सामाजिक संस्थांना निधीची कमतरता जाणवत आहे. अंबरनाथ येथील कोपरकर दांपत्याने त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे सोन्याचांदीचे दागिने आदिवासी मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेला दान करावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.

दांपत्याच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबाने त्यांची इच्छापूर्ती केली आहे. दागिन्यातून मिळालेले साडेसहालाख रुपये त्यांनी एका संस्थेला दान केले आहेत. सरकारी योजना कागदावर कितीही प्रभावी असल्या तरी अंमलबजावणीत मात्र त्या तितक्या प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे समस्या सोडवण्यासाठी आता लोकच आपापल्या परीने पर्याय शोधत आहेत. यामुळे परिसरातील सामाजिक समस्या सोडवण्याची प्रेरणा परिसरातील अनेकांना नक्कीच मिळेल. सुजाण नागरिकांना जाणवणार्‍या आपापल्या ठिकाणच्या छोट्या मोठ्या समस्यांना विधायक पर्याय शोधले जातील अशी आशा यामुळे नक्कीच वाटू लागते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *