लसवंत होण्याचे प्रज्ञावंतांना का वावडे?

लसवंत होण्याचे प्रज्ञावंतांना का वावडे?

करोना महामारीला हद्दपार करण्यात भारतीय समाज बर्‍याच अंशी यशस्वी ठरला आहे. मात्र पहिली लस घेताना दिसलेली लगबग आणि उत्साह दुसर्या लसमात्रेसाठी आढळत नाही. करोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच सर्वात प्रभावी उपाय असल्याचे वैद्यकीय तज्ञ सतत बजावून सांगत आहेत, पण करोनालाट ओसरल्यावर लस घ्यायची काय गरज? असा असमंजसपणाचा सवाल काही महाभाग करीत आहेत.

लोकांच्या प्रतिसादाअभावी लसीकरण केंद्रे आता ओस पडली आहेत. दुसरी लसमात्रा घेण्यास लोकांना राजी करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे. राज्य सरकारने संमती दिल्यावर दिवाळीच्या तोंडावर महाविद्यालये उघडली, पण तेवढ्यात विद्यापीठांच्या दिवाळी सुट्ट्या जाहीर झाल्या आणि पुन्हा महाविद्यालये बंद झाली. दिवाळी आटोपल्यावर महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. मात्र बर्‍याच प्रज्ञावंत प्राध्यापक महाशयांनी अजूनही लसमात्रा घेतली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. लस घेणे टाळून विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ शिकवण्याची भूमिका घेणार्‍या प्राध्यापकांविरोधात राज्याच्या उच्चशिक्षण विभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. अशा प्रज्ञावंतांनी लस न घेतली गेली तर त्यांचे वेतन पुढील महिन्यात रोखले जाईल.

वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्राध्यापकांनी लस घेणे बंधनकारक असल्याचा खलिता सर्व महाविद्यालयांना धाडला गेला आहे. महाविद्यालये सुरू करण्याआधी विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतरांनी लस घेणे अनिवार्य आहे. मात्र ती सक्ती काही प्राध्यापक मंडळींना मंजूर नसावी. म्हणून लस घेण्याबाबत ते टंगळमंगळ करीत असावेत. काहींनी लस टाळण्यासाठी वैद्यकीय कारणे पुढे केली आहेत. तसे कोणतेही कारण नसताना सुदृढ प्राध्यापकसुद्धा लस घेण्यापासून टाळाटाळ का करीत आहेत? हेसुद्धा कदाचित उच्चशिक्षण विभागालाही गूढ वाटत असेल. प्राध्यापकांना लस घेण्यास राजी करणे प्राचार्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महाविद्यालयात यायला तयार आहोत, पण लस घेणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेऊन आपल्यातही एक ‘नाठाळ विद्यार्थी’ दडल्याचा प्रत्यय संबंधित प्राध्यापकांनी आणून दिला आहे. राज्यात नेमक्या किती प्राध्यापकांनी अद्याप लस घेतलेली नाही ते स्पष्ट झालेले नाही, पण लस न घेणार्‍या प्राध्यापकांचे वेतन रोखण्याचा उच्चशिक्षण विभागाचा निर्णय पाहता ही संख्या लक्षणीय असावी.

उद्या विद्यार्थीदेखील प्राध्यापकांकडे बोट दाखवून लस घेणे टाळू लागले तर? जगातील प्रगत देशांनी गेल्या वर्षी लसीकरण मोहिमा हाती घेतल्या. त्या-त्या देशांचे पंतप्रधान वा राष्ट्राध्यक्षांनी सर्वात आधी लस घेतली. लसीबाबतचे समज-गैरसमज दूर करून जनतेला लस घेण्यास प्रवृत्त केले. भारतातही स्वदेशी लशीची निर्मिती होऊन लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. विदेशांतील राष्ट्रप्रमुखांचे अनुकरण भारतातही होईल, अशी अपेक्षा होती. मात्र लसीकरणात करोना योद्ध्यांना प्राधान्य देण्याचे औदार्य दाखवले गेले. आधी इतरांना लस घेऊ द्या, त्याचे बरे-वाईट परिणाम कळू द्या, मग आपण लस घेऊ, असाच हा पवित्रा नव्हता का? डॉक्टर, रुग्णालय सेवक, सुरक्षाकर्मी, सरकारी सेवक आदींप्रमाणे देशातील प्रमुख नेतेसुद्धा ‘करोना योद्धे’ का नसावेत? त्याबाबत त्यांना संदेह का वाटावा? शिक्षक, प्राध्यापकसुद्धा शिक्षण क्षेत्रातील नेतेच आहेत. त्यांचा आदर्श विद्यार्थी गिरवतात.

प्राध्यापक वर्गाला ते ठाऊक नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. शंभर कोटीवर लसीकरणाचा विक्रम देशाने अलीकडेच प्रस्थापित केला. भारतात तयार झालेल्या स्वदेशी लशी पूर्ण सुरक्षित आहेत याचेच ते द्योतक आहे. मग लस घेण्याची भीती उच्चशिक्षितांना का वाटावी? लस घेण्यात प्राध्यापक मागे असणे हे चित्र कसे दिसते? प्राध्यापकांनी लस घेतली तर विद्यार्थीही तो धडा गिरवतील. लशींपासून दूर राहिलेले आणि पुढील महिन्याचे वेतन रोखण्याची नौबत आलेले प्राध्यापक आता तरी लसवंत होतील का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com