Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखमराठी सारस्वताला विज्ञान दृष्टीची झळाळी !

मराठी सारस्वताला विज्ञान दृष्टीची झळाळी !

येत्या मार्चमध्ये नाशिक येथे होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांच्या निवडीने इतिहास घडवला आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि लेखक अशा त्रिमिती साहित्यिकाची निवड होण्याची ही पहिलीच वेळ. नारळीकरांचे नाशिककरांशी ऋणानुबंध जुनेच आहेत. नाशकात अनेक कार्यक्रमानिमित्त जयंतरावांच्या भेटी झालेल्या आहेत. वै. बस्तीरामजी सारडा स्मृती सप्ताहातही त्यांची तीन व्याख्याने झाली आहेत. साहित्य संमेलन आणि अध्यक्षपदी शास्त्रज्ञ हा दुग्धशर्करा योग नाशिकमध्ये घडणार असल्याने नाशिककर कमालीचे आनंदले आहेत. जागतिक कीर्तीप्राप्त नारळीकरांची अनेक स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. ऋजुता हा त्यापैकी सर्वानाच आकर्षित करणारा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विलोभनीय पैलू. तरीही ते आपली मते स्पष्टपणे मांडतात.

- Advertisement -

ज्योतिषशास्त्राबद्दलही निर्भीडपणे बोलतात. नारळीकरांचा प्रत्येक क्षण अनमोल आहे. ते सतत कार्यमग्न असतात. सर्व स्तरात त्यांचा मित्र परिवार विखुरलेला आहे. अनेक मित्रांच्या व्यक्तिगत आवडीनिवडी सुद्धा नारळीकर दांपत्याच्या लक्षात असतात. नारळीकर यांना घराण्यातील विद्ववत्तेचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रख्यात रँग्लर गणिततज्ञ होते. त्यांच्या मातोश्री सुमती नारळीकर संस्कृत विदुषी होत्या. नारळीकर एक दिवस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतील असे भाकीत साहित्यप्रेमी उद्योजक मुकुंदराव किर्लोस्कर यांनी वर्तवले होते अशी आठवण एकदा नारळीकर यांनीच सांगितली होती. ते भाकीत खरे ठरले आहे. खगोलभौतिकी क्षेत्रातील नारळीकर यांची कारकीर्द चार दशकांपेक्षाही दीर्घ आहे. त्यांनी ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी‘ ही थिअरी मांडली.

अनेक पुस्तके आणि ग्रंथलेखन केले. ‘चार नगरातले माझे विश्व’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. या वाटचालीत त्यांना त्यांच्या पत्नी डॉ. मंगलाताई नारळीकर यांची समर्थ साथ लाभली आहे. त्याही शिक्षिका आहेत. शिक्षणक्षेत्रातील मान्यवर विदुषी आहेत. नारळीकर यांना ‘पदमविभूषण’ सारख्या नागरी सन्मानाने आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. इंग्रजी ही जागतिक स्तरावर विज्ञानाची भाषा आहे. तथापि मराठी या आपल्या मातृभाषेवरचे नारळीकर यांचे प्रेमही अद्वितीय आहे. ‘ज्ञानभाषेबरोबरच मराठी ही विज्ञानभाषा व्हावी. विज्ञान आणि गणित हे विषय विद्यार्थ्यांना मराठी भाषेतूनच शिकवले जावेत’ असा त्यांचा आग्रह असतो. द्रष्टी माणसे नुसता आग्रह धरून अथवा मत व्यक्त करून थांबत नाहीत. त्याचे मार्गही सुचवतात.

मराठी विज्ञानभाषा कशी होईल याबद्दल त्यांच्या विधायक सूचना ते वेळोवेळी सांगत असतात. विज्ञानात सतत संशोधन सुरु असते. त्याची माहिती साहित्यातून लोकांपर्यंत पोचवली जाऊ शकते. विज्ञान कथा मराठीत लिहून मराठी साहित्यातील ती उणीव दूर व्हावी असे मत त्यांनी वारंवार व्यक्त केले आहे. त्यांनी शेकडो विज्ञान कथा मराठीत लिहून मराठी सारस्वत समृद्ध केले आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘गोष्टीरूपात विज्ञान सांगितले तर ते लोकांपर्यंत चटकन पोचते. समजायला सोपे जाते. तुमच्यासारखे विज्ञान आम्हाला समजत नाही अशी काही लेखकांची भूमिका आहे. या कमतरतेवर मात करता येऊ शकते. वैज्ञानिकांशी बोलणे, त्यांच्याकडून चांगल्या कल्पना घेणे आणि त्यावर लिहिणे हा त्यावरचा एक पर्याय ठरू शकतो. मी गमतीने असे म्हणेन की, आपल्याकडच्या साहित्यसंमेलांमध्येसुद्धा विज्ञानकथांना दुय्यमस्थान दिले जाते. जणू जुलमाचा रामराम! नारळीकर यांच्या निवडीने ही कमतरताही निश्चित भरून निघेल.

वैज्ञानिक संशोधनाला मराठी साहित्यात सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त होईल. समाजातील अंधश्रद्धांचा विळखा सैल होण्यास त्याची निश्चित मदत होईल याची खात्री सर्वानाच आहे. ’साहित्य संमेलनाला वेगवेगळ्या भागातील लोक भेट देतात. त्यामुळे या व्यासपीठाचा उपयोग सर्व मराठी मुलखातून अंधश्रद्धा कमी करण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी होऊ शकतो. आपण प्रयत्नात सातत्य राखले पाहिजे. हळूहळू का होईना बदल निश्चित होतो’ असा विश्वास नारळीकरांनी व्यक्त केला आहे. नारळीकर यांच्या अध्यक्षपदी निवडीचे मराठी मुलखात सर्वदूर स्वागताचे सूर उमटले आहेत.

नाशिकच्या साहित्य संमेलनाला विज्ञानवादाची जोड मिळेल व त्यामुळे यंदाचे संमेलन साहित्याच्या कक्षा वैज्ञानिक दृष्ट्या रुंदावण्याची मुहूर्तमेढ रोवणारे ठरेल. मराठीला विज्ञानभाषा बनवण्याचे नारळीकरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी साहित्य क्षेत्र आणि समाज एकत्रितपणे कार्यारंभ करेल अशी अपेक्षा. नारळीकर यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय कारकिर्दीला ‘देशदूत’ परिवाराच्या शुभेच्छा!

- Advertisment -

ताज्या बातम्या