न टोचून घेताच लसटोचणीची उद्घाटने?

न टोचून घेताच लसटोचणीची उद्घाटने?

‘करोना’ महामारीला धास्तावलेल्या जगाला प्रतिबंधक लसीची प्रतीक्षा होती. मात्र काही लसींचे संशोधन पूर्ण झाले आहे. काही लसींच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अद्याप सुरुच आहेत. काही देशांनी मात्र आपत्कालीन वापरासाठी लसींना मंजुरी दिली.

तेथे लसीकरणही सुरु झाले आहे. भारतातसुद्धा दोन लसींच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. त्यापैकी एक लस देशी बनावटीची म्हणजे भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणारी आहे, असे अभिमानाने सांगितले गेले आहे. मकरसंक्रांतीनंतर देशात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. जगात इतकी मोठी मोहीम कुठेही झालेली नाही, असे छाती ठोकून सांगितले जात आहे.

करोनाविरुद्धच्या युद्धात खंबीरपणे आणि निर्भीडपणे लढणार्‍या योद्ध्यांचे सर्वप्रथम लसीकरण केले जात आहे. देशात तयार झालेल्या लसी पूर्ण सुरक्षित आहेत, करोना काळात संजीवनी आहेत, देशाला आत्मनिर्भर बनवणार्‍या आहेत, असे पंतप्रधानांनी देशवासीयांना खात्रीपूर्वक सांगितले. मात्र जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी स्वतः लस टोचून घेतली असताना भारतात तसे का झाले नाही? असा रोखठोक सवाल विरोधी पक्ष करीत आहेत.

जनहितासाठी अनेक यशस्वी आंदोलने करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लस घेण्याची तयारी दर्शवली आहे. 'लसीबाबत लोकांच्या मनात भीती आहे. ती घालवायला हवी. मला मृत्युची भीती वाटत नाही. लसीबाबत लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी आपण लस टोचून घेणार आहोत. लोकांमध्ये लसीबाबत विश्वास निर्माण व्हावा म्हणून समाजातील प्रमुख माणसांनी लसीचा पहिला डोस घेतला पाहिजे.

इतरांनी लस टोचून घेतल्यावर काय होते ते पाहून नंतर आपण लस घेऊ, हा पळपुटेपणा चालणार नाही' अशा शब्दांत अण्णांनी नाव न घेता देशातील प्रमुख नेत्यांना उपदेशाची लस टोचली आहे. अण्णांनी व्यक्त केलेले मत जनहिताच्या दृष्टीने सुसंगतच आहे. तथापि शेतकरी प्रश्नांबाबत अण्णांनी देशाच्या प्रमुखांना पाठवलेल्या अनेक पत्रांना आतापर्यंत कोणताही प्रतिसाद मिळू शकलेला नाही, असे खुद्द अण्णांनीच सांगितले आहे.

तेव्हा लस घेण्याबाबतचा अण्णांचा सल्ला नेतेमंडळी किती मनावर घेतील हाही प्रश्नच आहे. लस केव्हा येणार? कोणा-कोणाला मिळणार? सर्वांना मिळणार असल्यास ती मोफत मिळणार की विकत? याची चर्चा आधी सुरु होती. आता मात्र देशातील प्रमुख सत्ताधारी नेत्यांनी लस टोचून घेण्यात पुढाकार न घेतल्यावरून राजकारण रंगले आहे. लसीच्या सुरक्षिततेबद्दल छातीठोकपणे सांगणार्‍या प्रमुख नेत्यांपैकी कोणते नेते लसीकरणासाठी पुढे येतात याची आम जनतेलासुद्धा उत्सुकता आहे. मात्र आतापर्यंत तरी एकाही नेत्याने स्वयंस्फूर्तीने लस टोचून घेतलेली नाही. दिल्ली आणि नागपुरातील काही डॉक्टरांनी विशिष्ट लस टोचून घेण्यास नकार दिल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. अशातच लस घेतलेल्या काही करोना योद्ध्यांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास जाणवू लागल्याच्या बातम्या धडकू लागल्याने लसीबाबत जनतेत संभ्रम वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय नेते स्वतःला लस टोचून घेण्यापासून चार हात लांब राहिले, पण वयाच्या शतकासमीप पोहोचलेली ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ, प्रिन्स फिलीप, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, इस्राईलचे बेंजामिन नेतान्याहू, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स सलमान बिन आदी अनेक देशांतील प्रमुख नेत्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन करोना प्रतिबंधक लस टोचून घेऊन देशांतील नागरिकांना लस पूर्णतः सुरक्षित असल्याचा विश्वास दिला आहे.

भारतात लसीकरणाचा प्राधान्यक्रम आधीच ठरवला गेला आहे. मात्र तो ठरवणार्‍या नेत्यांच्या सुरक्षेची चिंता आरोग्य यंत्रणेला वाटत नसावी का? देशातील करोना योद्धे लसीकरणाचे पहिले मानकरी ठरले आहेत. तथापि केंद्र सरकारमधील प्रमुख नेते आणि राज्याराज्यांतील प्रमुख सत्ताधारी नेत्यांनी करोना योद्ध्यांसोबत स्वतःही लस घेऊन मसबका साथ, सबका विकासफ साधताना कृतिशील मसबका विश्वासफही दिला असता तर त्यांचा उत्साह नक्कीच दुणावला असता.

लोकांनाही लसीच्या सुरक्षितपणाची खात्री पटली असती. भारतीय राजकारण्यांची चतुराई जगाला लसीकरणाच्या बाबतीतही दिसली आहे. तसाच आत्मनिर्भरतेचा निर्धारही लक्षात आला असेल का? अमेरिकन संसदेच्या "कॅपिटॉल हिल' या इमारतीवर ट्रम्प समर्थकांनी केलेलया हल्ल्याची घटना अजून ताजीच आहे. देशातील नेते ही राष्ट्राची जोखीम आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे देशाला भाग आहे.

ती जबाबदारी कशी टाळता येणार? जगातील काही राष्ट्रप्रमुखांना त्यांच्या देशातील लसीच्या सुरक्षिततेबद्दल कदाचित पूर्ण खात्री असेल, पण भारतातील लसीबाबत अनेक मत-मतांतरे व्यक्त होत आहेत. अशावेळी लसीच्या सुरक्षेबाबत पूर्ण खात्री होईपर्यंत देशाच्या प्रमुख नेत्यांनी लस घेण्याची घाई न करण्याची घेतलेली भूमिकासुद्धा समर्थनीय म्हणावी लागेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com