पुढार्‍यांची पंगत आणि चहाची चाहत!

jalgaon-digital
4 Min Read

जुन्या काळी म्हणजे किमान पाच-सहा दशकांपूर्वी ‘चहा एके चहा, डोळे उघडून पाहा…’ असे एक मजेशीर बडबडगीत हमखास ऐकायला मिळत असे. त्या बडबडगीताच्या प्रत्येक कडव्यात चहा प्यायल्याने कोणकोणते तोटे होतात ते नेमकेपणे सांगितले गेले होते.

तथापि बडबडगीत एवढ्याच मर्यादित दृष्टीने त्याकडे पाहिले गेले. शाळांमध्ये वर्गात किंवा घरी असल्यावरसुद्धा लहान मुले खेळता-खेळता चहाचे हे गाणे गुणगुणत वा बडबडत. आतासुद्धा आजारांच्या कुरबुरी घेऊन दवाखान्यात जाणार्‍या माणसांना चहाचे प्रमाण कमी करण्याचा किंवा चहा सोडण्याचा सल्ला डॉक्टर मंडळी मुद्दाम देतात. तथापि रुग्णांना तसा सल्ला देणार्‍या बर्‍याच डॉक्टरांनासुद्धा चहाचा मोह आवरत नसेल.

डॉक्टरांचा सल्ला तंतोतंत पाळणारे आज्ञाधारक आणि हाता-तोंडाशी आलेल्या चहाला नाही म्हणणारे रुग्ण अजून तरी जन्मास आल्याचे ऐकिवात नाही. आजही वाड्या-वस्त्या, गावे, शहरे, महानगरे, पाले आणि झोपड्यांत राहणार्‍या गरिबांपासून बंगले आणि गगनचुंबी महालांमध्ये राहणार्‍या तालेवारांपर्यंत सर्वांचा दिवस पहिल्या चहाने सुरु होतो आणि चहानेच मावळतो. याला कालातीत सत्याचे स्वरूप आले आहे हे वास्तव नाकारता येईल का? सरकारी व खासगी कार्यालये तसेच मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या आलिशान दालनांतसुद्धा आल्या-गेल्यांच्या स्वागतासाठी चहाच्या कपांचा दबका किणकिणाट दिवसभर सुरुच असतो. सामान्य कष्टकरी असो वा मंत्री; इथून-तिथून शेवटी तो माणूसच! म्हणून तर सत्तेच्या राजकारणात चहाचे स्थान वर्षानुवर्षे अबाधित राहिले आहे.

राज्य अथवा केंद्रसत्तेत अनेक पक्षांची सरकारे आली आणि गेली, पण विधिमंडळ अथवा संसद अधिवेशनांच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांच्या नेत्यांना चहापानाला बोलावण्याचा पायंडा मात्र अबाधित आहे. कोणत्याही गडबड-गोंधळाविना अधिवेशन काळ सुरळीत पार पाडण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकार अथवा सरकारी धोरणांबाबत मवाळ भूमिका घेऊन सहकार्य करावे, हा कदाचित या चहापानामागचा सुप्त हेतू असावा. अन्यथा असे पायंडे उगाचच पडत नाहीत किंवा पाडलेही जात नाहीत. एखादे सरकार पाडण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या अथवा सरकारला पाठिंबा देणार्‍या पक्षांच्या आमदारांना चहापानाला बोलावले गेल्याची अथवा चहापानामुळे एखादे सरकार पडल्याची दुर्घटना अजूनतरी घडलेली नाही. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात शक्यतो चहापानाने केली जाते.

पाहुणचारासाठी काही वेगळ्या चवीची पेयेही अपवादात दिली-घेतली जातात हा भाग वेगळा! कोण-कोण चहाचा किती ‘चाहता’ आहे ते पाहून त्यानुसार चहाची ऑर्डर दिली जाते. कोणे एकेकाळी भलेही चहाचे दुर्गुण सांगितले गेले असतील, पण गेल्या पाच-सात वर्षांत भारतीय राजकारणात चहाची कीर्ती आणि उपयोगिता मात्र कमालीची वाढली आहे. रेल्वे फलाटावर येणार्‍या-जाणार्‍या लोकांना बालवयात मनापासून चहा पाजल्याचे देशाचे विद्यमान प्रधानसेवक स्वतः अभिमानाने सांगत असत. इतकेच नव्हे तर जनतेला चहा पाजत निवडणूक प्रचार करण्याचा नवा पायंडाही त्यांनीच पाडला होता. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये देशवासियांच्या मनावर तसा ठसा सतत कोरला जाईल, असा आगळा-वेगळा प्रयत्नही केला जात होता. सामान्य माणसांशी चहाचा संबंध बेमालूमपणे जोडून त्यातून निर्माण झालेला चाहतेपणा मतांच्या रूपाने मतपेट्यांमध्ये रूपांतरित करण्याची खेळी ‘चाय पे चर्चां’मधून धूर्तपणे केली गेली. त्यामुळे एक चहावाला थेट देशाच्या प्रधानसेवकपदापर्यंत पोहचू शकतो, असा चहाचा महिमाही तेव्हापासून गायला जातो.

म्हणूनच कदाचित ‘मराठीचिये नगरी’ असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातसुद्धा आजकाल चहाच्या उकळ्या फुटू लागल्या असाव्यात. गेल्या आठवड्यात पेशवाईची राजधानी असलेल्या पुण्यनगरीत पाणी प्रकल्पाच्या कार्यक्रमासाठी मनपातील सत्ताधारी पक्षाला सत्तापती आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाईलाजाने एकत्र बोलावण्याची नामुष्की ओढवली. वर्षापूर्वी शत्रुत्वातून ‘मैत्र‘ जुळलेले दोन नेते एका व्यासपीठावर येतील का? आल्यावर काय घडेल? याची उत्सुकता दोन्हीकडील कार्यकर्त्यांना होती, पण दोन्ही नेते दिलेल्या शब्दाखातर व्यासपीठावर आवर्जून एकत्र आले. वर्षभरापूर्वीच्या शपथविधीनंतर एकत्र चहापानाचा प्रसंग दोन्ही नेत्यांना कदाचित पुन्हा अनुभवास आला नसावा. ‘दादा तुम्ही मला चहाला बोलवा किंवा तुम्हीच माझ्या घरी चहापानाला या’ असा प्रेमळ आर्जव करण्याची संधी म्हणूनच विरोधी पक्षनेत्यांना पुणेरी नगरीत घ्यावीशी वाटली असावी.

गेल्या वर्षीच्या पहाटेच्या शपथविधीनंतर हे दोन्ही नेते कोणत्याही निमित्ताने एकत्र आले तरी आघाडीत कुजबुज सुरु होते. त्यामुळेच एकत्र चहापानाची अनावर इच्छा त्यांना दाबून ठेवावी लागते. आता मात्र ती इच्छा असह्य झाल्यानेच चहाची चाहत पुन्हा रुजू पाहत असेल का? थोरल्या‘साहेबां’नी मराठी मुलखात सत्तेचे अफलातून समीकरण मांडल्यापासून ‘मित्रां’च्या गाठीभेटी दुर्मिळ झाल्या आहेत. त्यामुळेच दोन्ही नेत्यांना‘मित्र’च्या चहाला महाग व्हावे लागले आहे.‘मित्र’ला चहा पाजता येत नाही आणि त्याच्याकडूनही हक्काने चहा वसूलही करता येत नाही. मग तो कोणी देवेंद्र असो वा अजित! कधी संपणार हा दुरावा वा वनवास?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *