Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखसंध्याछाया भिवविती हृदया...

संध्याछाया भिवविती हृदया…

भारतीय समाजाची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे सुखद चित्र हल्ली निर्माण झाले आहे. कदाचित तसे चित्र मुद्दामहून रंगवले जात असेल का? आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक, सामाजिक, बौद्धिक प्रगतीच्या वाटेवर भारतीय कुटुंबव्यवस्था अस्थिर होऊन हेलकावे खात आहे असे मानणारा एक मतप्रवाह आहे.

एकत्र कुटुंबपद्धती जवळपास मोडीत निघाली आहे. त्रिकोणी-चौकोनी कुटुंबांतून ज्येष्ठ वजा का होत आहेत? उतारवयात त्यांना आधाराची गरज असते. मात्र अनेक ज्येष्ठांना निराधार होऊन वेगळे राहण्याची किंवा वृद्धाश्रमांचा आश्रय घेण्याची वेळ येत आहे. त्याचा गैरफायदा गुन्हेगार घेत आहेत. एकट्या-दुकट्या ज्येष्ठांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न आता तीव्र स्वरुप धारण करीत आहे.‘राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्थे’च्या ‘क्राईम इन इंडिया’ या ताज्या अहवालातून ही बाब स्पष्ट होते. 2019 साली भारतात ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित 28 हजारांहून जास्त गुन्हे घडल्याचे या अहवालात नमूद केले आहे. अशा गुन्ह्यांतसुद्धा ‘मराठी पाऊल पुढेच’ पडल्याचे आकडेवारीवरून आढळते. पुरोगामी महाराष्ट्रात असे 6 हजारांहून जास्त गुन्हे घडले. इतर राज्यांच्या तुलनेत ते सर्वाधिक आहेत.

- Advertisement -

मुंबईने अव्वल स्थान पटकावून राजधानी दिल्लीवर ताण केली आहे. सर्वाधिक गुन्हे घडणार्‍या शहरांत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व नागपूरचा समावेश आहे. चोरी, मारहाण, फसवणूक, लुटालूट, खून आदी सर्व प्रकारचे गुन्हे या अहवालात नमूद आहेत. पोलीस यंत्रणेकडे ज्येष्ठांच्या सुरक्षेची जबाबदारी, तत्संबंधी जुने-नवे कायदे, खास ज्येष्ठांसाठी सरकारी योजना असूनही ज्येष्ठांवरील अत्याचारांच्या घटना दरवर्षी वाढत आहेत याकडे ‘राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्थे’ने खास लक्ष वेधले आहे. ही बाब अधिक गंभीर असून सामाजिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लावणारी आहे.‘संध्याछाया भिवविती हृदया’ ही राजकवी भा. रा. तांबे यांची गेल्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील काव्यपंक्ती यादृष्टीने भविष्यवेधी म्हणावी लागेल. हल्ली ज्येष्ठांना मृत्यूपेक्षा वृद्धापकाळच अधिक भीतीदायक वाटतो.

आजकालच्या आकस्मिक गुन्ह्यांचा उंचावता आलेख लक्षात घेता मृत्यू आणि उतारवयापेक्षा ज्येष्ठांविषयक घडणार्‍या गुन्ह्यांच्या बातम्यांचीच जास्त धास्ती ज्येष्ठांना वाटली तर आश्चर्य वाटू नये. ही परिस्थिती पाहता ज्येष्ठ मंडळींच्या कल्याणाच्या कल्पना आता बदलाव्या लागतील. केवळ मुलाबाळांवर त्यांची जबाबदारी सोपवणार्‍या कायद्यातील तरतुदींनी ही गरज भागेल का? किंबहुना ती भागत नाही असेच या अहवालावरून स्पष्ट होते. बदलत्या समाजात ज्येष्ठांना अधिक सुरक्षा कशा प्रकारे मिळू शकेल याचा विचार सामाजिक पातळीवर समाजतज्ञ आणि अनुभवी सनदी अधिकार्‍यांनी एकत्र बसून करण्याची गरज आहे. नवे कायदे करून किंवा आहेत त्यात जुजबी बदल करून परिस्थिती बदलण्याची शक्यता फार कमी आहे.

अलीकडेच केलेल्या बदलांमध्ये ज्येष्ठांचा सांभाळ न करणार्‍या त्यांच्या अपत्यांसाठी जबर दंड वा शिक्षा सुचवणार्‍या तरतुदी केल्या गेल्या आहेत, पण तेवढ्याने प्रश्न सुटेल का? कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सबल होत आहेत. शिक्षणाचे वाढते प्रमाण व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनांना अनेक फाटे फोडत आहे. सर्वसाधारपणे आयुर्मान वाढल्याने ज्येष्ठांचे वयदेखील वाढत आहे. त्यांच्या देखभालीच्या गरजाही बदलत आहेत. विभक्त कुटुंबांतील कमावते पती-पती घरासाठी कितीसा देऊ शकणार? उच्च राहणीमानासाठी कुटुंबातील प्रत्येक सज्ञान घटकाने कुटुंबाची कमाई वाढवणे आवश्यक बनले आहे. साहजिकच वृध्दांकडचे दुर्लक्षही वाढले आहे. अशावेळी ज्येष्ठांचा योग्य रितीने सांभाळ व्हावा, त्यांना सुखद व सुरक्षित जीवन जगणे शक्य व्हावे म्हणून सर्वांगीण विचार करण्याची गरज असल्याचे ‘क्राईम इन इंडिया’ या अहवालाने अधोरेखित केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या