पुणे तिथे काय उणे?

आपल्या स्वातंत्र्यावर कोणी आक्रमण केल्यास पुण्याचा जाज्वल्य स्वाभिमान बाळगणारे पुणेकर तसे आक्रमण सहसा खपवून घेत नाहीत. मग जंगल सोडून वाट चुकलेला एखादा रानगवा पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घुसून हुंदडू लागला तर तो उद्दामपणा पुणेकर कसा दुर्लक्षित करणार?

परवा बुधवारी काही पुणेकर नेहमीप्रमाणे सकाळी फेरफटका मारायला निघाले होते. त्यावेळी कोथरुड परिसरात काहींच्या नजरेस रानगवा पडला, पण तो रानगवा आहे आणि वाट चुकून पुण्यात शिरला आहे याची कल्पना पुणेकरांना यायला थोडा वेळ लागला. रानगवा असल्याची खात्री पटल्यावर पुणेकर गप्प कसे बसणार? इतिहास काळात पेशव्यांनी अनेक लढाया लढल्या आहेत. अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. त्यामुळे गव्याचे अचानक येणे हा जणू पुण्यावरील होळकरांच्या हल्ल्यासारखा हल्लाच असल्याचे पुणेकरांना वाटले असावे. रानगव्याला पाहण्यासाठी, त्याला मोबाईलमध्ये टिपण्यासाठी बरेच जण तर काही शूरवीर हाती दगड-गोटे घेऊन त्याच्या समाचाराला धावले.

माणसांच्या क्रूरतेचा आदमास नसलेला आणि माणसांच्या झुंडीत सापडलेला तो मुका जीव बिथरला. या गल्लीतून त्या गल्लीत जिवाच्या आकांताने धावत सुटला. बिथरलेल्या गव्याने काही वाहने आणि भिंतींना टकरा मारून शक्तीप्रदर्शन घडवले. काही बंगल्यांची फाटकेही धराशायी केली, पण माघार घेतील ते पुणेकर कसले? माणसांचा जोश पाहून पुण्यातील कुत्रीही चेकाळली. त्यांनी गव्यावर जमेल तसे हल्ले चढवले. गव्याच्या सुटकेसाठी वनखात्याचे सेवक धावले, पण नेहमीप्रमाणे उशिरा! गव्याचे प्रचंड धूड पकडणे त्यांच्याही आवाक्याबाहेर गेले. अखेर धावपळ आणि झटापटीत जखमी झालेल्या गव्याला महत्त्प्रयासाने दिले गेलेले बेशुद्धीचे इंजेक्शन लागू पडले.

बेशुद्ध गव्यास वनसेवकांनी दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जंगलाची हद्द सोडून हिंस्त्र माणसांच्या टापूत, तेही ऐतिहासिक पुण्यात शिरल्यावर एखाद्या वन्यजीवाची काय हालत होते याचा मोठा वस्तूपाठ वन्यप्राण्यांना रानगव्याच्या शोकांतिकेतून मिळाला असेल, पण मुक्या जीवांना त्याचे आकलन कसे होणार? पाण्याच्या शोधात रात्री-अपरात्री विहिरीत पडलेले बिबटे, वाघ, हरीण, काळवीट आदी प्राण्यांचा जीव वनविभागाचे सेवक कौशल्याने वाचवतात. मग पुण्यात शिरलेल्या गव्याला सहीसलामत पकडण्यात ते अपयशी का ठरले असतील? बिबट्या अथवा वाघांना पिंजर्‍याआड करणार्‍या वनसेवकांकडे रानगव्याला पकडण्याचे कसब नव्हते का? गेल्या वर्षी नाशिककरांनीसुद्धा बिबट्याचा थरार अनुभवला होता, पण बघ्यांच्या कोलाहलातसुद्धा वनसेवकांनी बिबट्याला सुरक्षितपणे गजाआड केले होते.

रानगव्याला पकडून त्याचा पाहुणचार करण्याचे पुण्य पुणेकरांना मिळवता आले असते, पण पाहुणचाराचाच तिटकारा असलेल्या शहरात ती अपेक्षा कशी ठेवायची? गव्याचा मृत्यू झाल्यावर चौकाचौकांत त्याची छायाचित्रे लावून, त्या छायाचित्रांना फुलमाळा घालून, माफीनामा आणि श्रद्धांजलीचे फलक झळकवून काही प्राणीप्रेमी पुणेकरांनी प्रायश्चितही घेतले. कोणतेही नियम वा कायदे पाळणे पुणेकरांना मान्य नाही. वाहतुकीचे नियम पाळणे हा तर त्यांना घोर अपमानच वाटतो. त्यामुळेच हेल्मेटसक्ती होताच पुणेकर त्याविरुद्ध पेटून उठतात. संघटना करून आंदोलने करतात. पुण्यातील माणसांना देशाशी काही घेणे-देणे नाही. पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान तेवढा आहे. एखादा रानगवा जीवाला मुकल्याबद्दल त्याचा गवगवा करणे हे मात्र पुणेकरांना त्यांच्या किर्तीप्रमाणे व्यवस्थित जमले. त्यामुळे आजच्या बहुतेक मराठी वृत्तपत्रांत गव्याच्या गगवगव्याचा गाजावाजा झळकताना दिसला. पुण्यात यापेक्षा वेगळे काही घडले असते तरच नवल!


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *